*ज्येष्ठ लेखिका कवयित्री चित्रकारा आदर्श शिक्षिका स्वप्नगंधा सतीश आंबेतकर लिखित अप्रतिम लेख*
*शालेय सहल*
सर्वांच्या आवडीचा विषय म्हणजे सहल. सहल ही सर्वांनाच खूप आवडते. कारण रोज रोज त्याच वातावरणात राहून प्रत्येकाला कंटाळा आलेला असतो. सहलीच्या निमित्ताने घरापासून दूर आणि नेहमीपेक्षा वेगळ्या वातावरणात फिरायला मिळते. तेथील हवामान प्रेक्षणीय दृश्ये, नेहमीपेक्षा वेगळी भेटणारे माणसे, एकंदरीत सारेच कसे सुखद आणि आल्हाददायक असते.
प्रत्येक वयाच्या माणसाला सहल हा आवडता विषय असतो.
अगदी केजीतील मुलांपासून, शालेय, कॉलेजमधील, विद्यार्थी असोत शिक्षकवर्ग, किंवा कोणत्याही कार्यालयातील व्यक्ती असोत सर्वांनाच सहल
फार आवडते. घरातील लहानमोठी माणसे आबालवृद्ध सर्वांनाच सहलीची मौज लुटायला आवडते. आता सहलीसाठी सर्वांनाच वेगवेगळ्या ऋतूप्रमाणे तयारी करावी लागते. पण काही असले तरी सहलीचा आनंद प्रत्यक्ष त्या वातावरणात गेल्याशिवाय मिळत नाही हे बाकी खरे हं!
प्रत्येक शाळा, विद्यालयात साधारणपणे थंडीच्या दिवसात सहल काढली जाते. आम्ही आर्ट लाईन च्या काॅलेज मध्ये असतांना मात्र दर पंधरा दिवस किंवा महिन्यातून एक तरी लॅण्डस्केप टूर असायची व चित्रकलेच्या सर्व जामानिम्यासहित आम्हाला ती सहल करायला लागायची.
शाळा, काॅलेज मध्ये ज्या सहली असतात त्या शैक्षणिक दृष्ट्या मुलांना भौगोलिक, ऐतिहासिक, नैसर्गिक दृष्टीने ज्ञान मिळावे हा हेतू असतो. साधारण सर्वांच्या दृष्टीने विचारपूर्वक निर्णय घेऊनच सहलींचे आयोजन केले जाते. त्यात मुलांच्या वयोमानाचाही विचार केला जातो. बालवाडी ते दहावी पर्यंत च्या मुलांना कुठे सहलीला न्यावे, तसेच त्यांच्या सुरक्षिततेचा विचारही
शिक्षकांना करावा लागतो, त्याप्रमाणे नियोजन केले जाते.
मुलांना सहलीला नेण्याचा शिक्षणखात्याचे हेतू नक्की च चांगला आहे. सहलीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रेक्षणीय स्थळांची माहिती मिळते. सहलीसाठी एतिहासिक, भौगोलिक, देवस्थाने, सांस्कृतिक, निसर्ग रम्य, नदी, तलाव, धरणे, समुद्रकिनारा, वेधशाळा, वैज्ञानिक,खगोलीय .मोठे गडकिल्ले,मोठाल्या बागा, वगैरे ठिकाणी नेले जाते तसेच मुंबई दर्शन, किंवा वेगवेगळ्या शहरात अशा ठिकाणी मुलांना तेथील संग्रहाणीय माहिती मिळेल. राणीचा बाग, मत्स्यालय,लोणावळा, खंडाळा, बोगद्यातून जाणार्या मार्गातील सहली, तजमहाल, कुतुबमिनार, जयपूर, राजस्थान वगैरे अनेक ठिकाणे जी ऐतिहासिक रित्या प्रसिद्ध आहेत अशी.
सहल काढतांना शिक्षक मुलांच्या वयोमानाप्रमाणे सहलीची ठिकाणे ठरवतात, आधी सर्व सुविधांची माहिती करुन घेतात. किती दिवसांची सहल ते ठरवतात. विद्यार्थ्यांना काय, किती झेपेल, आर्थिक दृष्टीनेही विचारविनिमय करुनच निर्णय घेतला जातो. तेथील सर्व माहिती जाणकार शिक्षक आधी काढून आणतात. त्यानंतर मुलांना, पालकांना सूचना दिल्या जातात. सहलीच्या ठिकाणा प्रमाणे किती खर्च येईल. राहण्याची सोय, खाण्यापिण्याची सोय ही पहावी लागते, प्रवासात लागणार्या वस्तू या सर्वांची यादी विद्यार्थ्यांना दिली जाते. कोणते कपडे, थंडीत लागणारे उबदार कपडे,शूज वही पेन , सर्व माहितींची यादी दिली जाते. तसेच प्रथमोपचार बाॅक्स शाळेतून घ्यावे लागायचे. मुलांना सहलीचा आनंद मिळायचा, शिक्षकांनाही मिळायचा. पण मुलांना पुन्हा सुखरुप पालकांच्या हाती सुपुर्द करेपर्यंत जीवात जीव नसायचा.
शाळेत शिक्षिकेची नोकरी करतांना हे सर्व पाठ झालेले असायचे.
सहलीला योग्य वेळी, योग्य त्या ठिकाणी वेळेवर पोहोचायला मिळाले की जीव थोडासा भांड्यात पडायचा. निघण्यापूर्वी मुलांची प्रेझेंटी
घेणे, बस सुटतांना नारळ फोडणे, बसला हार घालणे, हळदकुंकू वाहणे, देवाच्या नावाचा जयजयकार करीत बस निघायची.
बस किंवा गाडीत मुलांची दंगामस्ती थोडीफार असायची, अंताक्षरी सर्वांचा
आवडता खेळ, शिक्षकांनाही मुले त्यात सामील करुन घ्यायची. मनमोकळे वातावरण, अभ्यासाचे टेन्शन नाही, मिळून मिसळून वागणारे, कडक तरीही प्रेमळ शिक्षक मुलांची काळजी घेणारे, निसर्गाचे सुंदर वातावरण, मोकळी हवा,
मित्र मैत्रिणींचा ताफा, आनंद, उत्साह, मधेमधे, थोडाफार खाऊ, विनोदी गप्पा, आणि बाहेर सुंदर धुक्याचीशाल पांघरलेला निसर्ग. पक्ष्यांचे, आवाज, शहरातून गाडी जाताना दिव्यांची रोषणाई.
गावातून गाडी जाताना
अंधुकसे वातावरण, लांब गेलेली शाळा सारेच कसे आवडते दृश्य. आई बाबांची आठवण आली तरी सहलीतून परत आल्यावर खूप खूप गमती जमती आईला सांगायला मिळणार असतात. तो आनंद वेगळाच असतो.
शिक्षण खात्याने हा एक चांगला निर्णय घेतल्यामुळे विद्यार्थ्यांना कमी खर्चात शैक्षणिक माहिती, फिरण्याचा आनंद मिळतो. त्याचबरोबर घराबाहेर कसे वागावे, मित्र मैत्रिणींचा सहवास, आनंद, मैत्री शेअरिंग या सगळ्या गोष्टी कळतात, मुले बाहेरच्या जगाशी नाते जोडू पाहतात, सहकार्याची, भावना निर्माण होते, निसर्ग आणि वेगळ्या वातावरणामुळे मुलांची आकलन शक्ती, ग्रहणशक्ती वाढते.
शालेय सहलींमुळे विद्यार्थ्यांना बरेच नवनवीन ज्ञान मिळते.
ज्ञानार्जनासाठी सहलीचा फारच मोठा वाटा आहे असे मला वाटते.
तुम्हालाही माझे हे विचार पटले तर अभिप्राय द्या.
निबंध वाढतच जाईल, म्हणून सहल इथेच थांबवते.
🦋🦚🦢🦩🦤🐓🦋
स्वप्नगंधा सतीश आंबेतकर
कलाशिक्षिका.
