कर्नाटकची ट्रॉलिंग नौका जप्त; सिंधुदुर्गात परप्रांतीय नौकांवरील सहावी मोठी कारवाई
देवगड :
दि. २० डिसेंबर २०२५ महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत परप्रांतीय नौकांकडून होणाऱ्या बेकायदा मासेमारीविरोधात मत्स्यव्यवसाय विभागाने आज पहाटे निर्णायक कारवाई केली. देवगड समोरील सागरी क्षेत्रात ट्रॉलिंग पद्धतीने अनधिकृत मासेमारी करणारी कर्नाटक राज्यातील एक ट्रॉलर पकडून जप्त करण्यात आली.
पहाटे ०४:३० वाजता सुमारे १४ वाव अंतरावर गस्तीदरम्यान ही नौका आढळताच पळ काढण्याचा प्रयत्न झाला. मात्र, सतर्क पथकाने पाठलाग करून नौका ताब्यात घेतली. महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम, १९८१ व सुधारित अधिनियम, २०२१ अंतर्गत कारवाई करून नौका जप्त करण्यात आली.
जप्त नौकेचा तपशील :
नाव: महारथी
नोंदणी क्रमांक: IND-KA-02-MM-६११६
मालक: श्रीमती. ज्योती एन. हरीक्रांता
राहणार: उडुपी, कर्नाटक
परवाना: केवळ कर्नाटक जलक्षेत्रासाठी वैध
ही नौका महाराष्ट्र हद्दीत वैध परवान्याविना ट्रॉलिंग करताना सापडली. तांडेलसह ७ खलाशी उपस्थित होते. नौका सुरक्षितरीत्या देवगड बंदरात आणण्यात आली असून, सापडलेल्या मासळीचा लिलाव प्रक्रिया सुरू आहे. प्रकरणाचा सविस्तर अहवाल माननीय सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसायांकडे सादर केला जाणार आहे. सुनावणीनंतर संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई होणार आहे.
ही मोहीम श्री. किरण वाघमारे (अंमलबजावणी अधिकारी व सहाय्यक मत्स्य विकास अधिकारी, देवगड) यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. पथकास श्री. टुकरुल, श्री. खवले, श्री. फाटक, श्री. बांधकर, श्री. नेसवंकर, श्री. सावजी यांचे सहकार्य लाभले. संपूर्ण कारवाई सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, सिंधुदुर्ग – श्री. सागर कुवेसकर यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण झाली.
उल्लेखनीय म्हणजे, चालू मासेमारी हंगामात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील परप्रांतीय नौकांवरील ही ६ वी मोठी कारवाई आहे. या सातत्यपूर्ण धडक मोहिमांमुळे स्थानिक मच्छीमारांचे हित जपले जात असून सागरी जैवविविधतेचे संरक्षण अधिक बळकट होत आहे.
ही कठोर अंमलबजावणी मंत्री नितेश राणे यांच्या दिशानिर्देशनाखाली सुरू असून, विभाग कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करत असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे
