You are currently viewing कौशल्यातून उद्योजकतेकडे वाटचाल : माटुंग्यात विद्यार्थिनींसाठी ‘उद्योजक मेळावा’

कौशल्यातून उद्योजकतेकडे वाटचाल : माटुंग्यात विद्यार्थिनींसाठी ‘उद्योजक मेळावा’

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई शहर, श्रीमती मनिबेन एम. पी. शाह कला व वाणिज्य स्वायत्त महिला महाविद्यालयातील बॅचलर ऑफ अकाउंटिंग अँड फायनान्स विभाग तसेच ‘दे आसरा’ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने माटुंगा येथील विसनजी रावजी ऑडिटोरियममध्ये ‘उद्योजक मेळावा’ या लघुउद्योजक प्रशिक्षण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यास विविध क्षेत्रांतील उद्योजक, प्राध्यापकवृंद तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

 

कार्यक्रमाच्या प्रारंभी महाविद्यालयातील कला शाखा प्रमुख डॉ. सरिता कासरलकर यांनी कौशल्य विकासाचे महत्त्व अधोरेखित करत स्वयं-लघुउद्योजकतेकडे कसे वळावे, याविषयी आपले विचार मांडले. तसेच त्यांनी सेवा मंडळ एज्युकेशन सोसायटीची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली. यानंतर महाविद्यालयाच्यावतीने प्रमुख अतिथी ‘दे आसरा’ फाउंडेशनचे सहसंस्थापक व मानसशास्त्रज्ञ डॉ. आनंद गोडसे आणि अजय कौटिकवार, तसेच सन्माननीय अतिथी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त शैलेश भगत, जिल्हा कौशल्य अधिकारी विद्या शिंगे व त्यांच्या सहकाऱ्यांचे स्वागत करून यथोचित सन्मान करण्यात आला.

 

प्रास्ताविकात सहायक आयुक्त शैलेश भगत यांनी कौशल्य विकास, उद्योजकता आणि रोजगार निर्मितीमध्ये शासनाची भूमिका स्पष्ट करत या उपक्रमामागील उद्देश विषद केला व प्रमुख मार्गदर्शकांचा परिचय करून दिला. यावेळी डॉ. आनंद गोडसे यांनी स्व-कौशल्याचे यशस्वी उद्योजकतेमध्ये रूपांतर करताना मानसिक व शारीरिक क्षमतांचा विकास कसा करावा, तसेच व्यवसाय वृद्धीसाठी प्रभावी नेटवर्किंगचे महत्त्व काय आहे, याविषयी सखोल व प्रेरणादायी मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे अजय कौटिकवार यांनी सोशल मीडिया मार्केटिंगच्या प्रभावी वापरातून व्यवसाय कसा विस्तारता येतो, याबाबत विविध उदाहरणांसह माहिती देत नवउद्योजक व विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.

 

या उपक्रमास महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. अर्चना पत्की यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. माधवी पवार यांनी आपल्या ओघवत्या शैलीत केले, तर आभार प्रदर्शन बॅचलर ऑफ अकाउंटिंग अँड फायनान्स विभागाचे समन्वयक प्रा. दत्तात्रय गावडे यांनी केले. या उद्योजक मेळाव्यात १० महिला उद्योजिका, २५ उद्योजक तसेच १६० पेक्षा अधिक विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून कार्यक्रम यशस्वी केला. या उपक्रमामुळे विद्यार्थिनींमध्ये उद्योजकतेबाबत सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होऊन कौशल्याधारित व्यवसायाच्या संधींबाबत नवी दिशा मिळाली असून, कार्यक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा