*ज्येष्ठ लेखक कवी भूमिपुत्र वाघ लिखित अप्रतिम लेख*
*बदलत गेलेली समाजसेवेची कार्यपद्धती…*
समाजसेवा ही पूर्वी पार चालत आलेली रूढ आहे.एकमेकांच्या गरजा भागवण्यासाठी उदात्त भावनेने केलेली मदत म्हणजे समाजसेवा होय.
पूर्वी माणसं जंगल,वाड्या,वस्त्या, डोंगर कडा,कपारी,जिथे अन्न,पाणी, निवारा,सुरक्षितता या गोष्टीची पूर्वता होईल अशा ठिकाणी माणसं एकत्र राहायची.तिथे तेव्हा जात नव्हती. धर्म नव्हता.वंश नव्हता.परंपरा नव्हती.काहीही नव्हतं.असायची फक्त माणुसकी.एकमेकांच्या मदतीने एकमेकांची सुरक्षितता,अन्न, पाण्याच्या गरजा भागविल्या जायच्या.पुढे पुढे टोळ्या वाढत गेल्या.स्वार्थ वाढत गेला.मग राग, द्वेष,अहंकार यातून माणूस स्वतःचे बल वाढवण्यासाठी प्रयत्न करायला लागला.एका टोळीची दुसऱ्या टोळीवरती आक्रमणे व्हायला लागली.खून मारामाऱ्या व्हायला लागल्या.लुटा लूटी व्हायला लागल्या
अन्न,द्रव्य,पाणी,आणि जमीन याच्या अधिकारासाठी मारामाऱ्या होत असत.यातून विभाग निर्माण झाले.प्रांत निर्माण झाले.जमिनीचे क्षेत्र निश्चित झाली.हे झालं तरी सातत्याने क्षेत्र वाढविण्यासाठी आणि मनुष्यबळ वाढविण्यासाठी युद्ध,मारामाऱ्या, लुटालूट कायमच चालत राहिली.जमिनीचे क्षेत्र काबीज करणे पुढे पुढे,टोळीचे प्रमुख ते स्वतःला राजे समजायला लागले,सरदार,प्रमुख समजायला लागले.
तेंव्हा जगण्याचं मूळ स्त्रोत होतं, ते म्हणजे जमीन,शिकार, मासेमारी,जंगलातील फळे कंदमुळे इत्यादी.जमीन कसतात त्यांना शेतकरी म्हणायला लागले.युद्ध करायचे ते क्षेत्रीय झाले,व्यापार करायचे ते वैश्य झाले,यातूनच ब्राह्मण,क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र अशी चातुरवर्ण व्यवस्था निर्माण झाली.जमिनीची अवजारे निर्माण करणं,शेळ्या बकऱ्या राखणे,कातडी मिळविणे अशा प्रत्येकाच्या कर्मावरून पुढे जाती निर्माण झाल्या आणि त्या दृढ झाल्याचे दिसते.कामावरून जातीची निर्मिती झाली.तेथून बलुतेदारी आलुतेदारी अशी परंपरा सुरू झाली.तेव्हा सुद्धा एकमेकांच्या गरजा भागविण्यासाठी एकमेकांना मदत करणे.आणि एकामेकांच्या मदतीवरती सर्वांची उपजीविका भागवणे असाच धर्म,रीत,रिवाज,आणि परंपरा अस्तित्वात होती.जी आजही काही प्रमाणात थोडी का होईना टिकून आहे.
पुढे पुढे मानवांचा विकास होईल तसतशा सुविधा निर्माण होत गेल्याचे दिसते.गाव घराची शहराची हळूहळू रचना आणि विकास विकास होत गेला…
अशा या अवस्थेमध्ये विषमतेची दरी सुद्धा साहजिकच निर्माण होत गेल्याचे दिसते.एका बाजूला गरीब गरीब होत गेले तर,दुसऱ्या बाजूला श्रीमंत श्रीमंत होत गेले.यामध्ये महत्त्वाचा घटक हा शिक्षण मानला गेला.ज्यांच्याकडे प्रॉपर्टी होती ते शिकत गेले आणि मोठे झाले. ज्यांना शिक्षणाची दारे बंद होती त्याना शिकता आलं नाही,ते मागे मागे राहत गेले.यातूनच जातीय विषमतेची मोठी दरी निर्माण झाल्याचे दिसते.
अशा वेळेला सामाजिक काम म्हणजे दुर्बलांच्या मदतीला धावून जाणे. त्याच्या अडचणीमध्ये सहभागी होणे.त्यांच्या विकासाला हातभार लावणे.यासाठी लोक एकत्र यायचे.समाज एकत्र यायचा.नंतर राजे रजवाडे आले.सरकार आलं. आता लोकशाही आहे…
पूर्वीपार चाललेली समाजसेवा म्हणजे दुर्बलांच्या मदतीला जाणे. एवढाच भाग बऱ्यापैकी अस्तित्वात होता.जसा काळ बदलत गेला तसं तशा जाती दृढ होत गेल्या. धर्म दृढ होत गेले.आणि मग आपल्या जातीसाठी समाजसेवा करायची. आपल्या धर्मासाठी समाजसेवा करायची हा दृष्टिकोन रीत रिवाज नंतर बदलत गेल्याचे दिसते आहे.
जेव्हा समाजवादी म्हणून आम्ही चिंतन करतो.अभ्यास करतो. समजून घेतो.आणि दुर्बलांच्या विकासासाठी हातभार लावण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा समाजवाद्यांना जात नसते,धर्म नसतो.त्यांची दृष्टी असते फक्त उपेक्षित आणि शेवटच्या दुर्बल घटकांच्या मदतीला धावून जाणे.
काही संस्था,काही लोक,काही जाती,काही धर्मातील लोक फक्त आपल्यासाठी कार्य करतात.ते कार्य कारणे चुकीचे असे नाही.परंतु एका बाजूला समाजवादी म्हणायचं,आणि दुसऱ्या बाजूला फक्त जातीसाठी काम करायचं.हा जो विचार आहे,तो विचार एवढा प्रभावी वाटत नाही. किंवा मनालाही पटतही नाही.रुचत नाही.
खरंतर गरज असते शेवटच्या माणसांच्या विकासासाठी,काम करण्याची.मग कसली जात.आणि कसला धर्म.आणि कसल्या जाती आणि कसल्या रीती.खरं तर जो जो शेवटचा माणूस आहे.त्याच्या विकासाला हातभार लावण्यासाठी, त्याच्या अडचणीला मदत करण्यासाठी,पुढे येणे अत्यंत आवश्यक आहे.आहेरे यांनी नाहीरे च्या मदतीला जायचं.काम करायचं. त्यांना आपल्या सोबत घेऊन विकासाच्या वाटेवरती चालण्याची क्षमता निर्माण करून द्यायची,यातून एक वाट मोकळी होऊ शकते.हा पोक्ता विचार प्रत्येक माणसाच्या मनामध्ये रुजला गेल्या तर उपेक्षितांच्या विकासाला हातभार लागू शकेल…
चला तर एक नवं राष्ट्र निर्माण करण्यासाठी आपण समाजवादी म्हणून पुढे चालत राहणे आवश्यक आहे.जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन दुर्बलांच्या विकासासाठी कार्य करत गेलो तर या देशात कोणी गरीब राहणार नाही. भुके कंगाल होणार नाही…
