मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :
महाराष्ट्र स्त्री मुक्ती परिषदेला ५० वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर येत्या २०, २१ आणि २२ डिसेंबर २०२५ रोजी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे तीन दिवसीय राज्यव्यापी स्त्री परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेत गेल्या पाच दशकांतील स्त्री चळवळीचा सखोल आढावा घेण्यात येणार असून, पुढील ५० वर्षांच्या स्त्रीवादी संघर्षाची दिशा निश्चित केली जाणार आहे. ही परिषद केवळ वर्धापन दिनाचा उत्सव नसून, सध्याच्या राजकीय, सामाजिक आणि आर्थिक वास्तवाचे भान ठेवत नव्या पिढीला संघर्षासाठी सज्ज करण्याचा ठाम निर्धार असल्याचे महाराष्ट्र स्त्री मुक्ती परिषदेतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
या परिषदेसाठी अत्यंत लोकशाही पद्धतीने सुकाणू समितीची स्थापना करण्यात आली असून, तिची पहिली बैठक ११ जानेवारी २०२५ रोजी पार पडली. राज्यभरातील सुमारे ७० महिला संघटना या प्रक्रियेत सहभागी आहेत. महाराष्ट्रातील विविध जिल्हे, तालुके आणि सामाजिक घटकांचे व्यापक प्रतिनिधित्व या परिषदेत दिसून येणार आहे. ग्रामीण, दलित, आदिवासी, कष्टकरी महिला, अल्पसंख्याक तसेच ट्रान्सजेंडर समुदायांचे प्रश्न समजून घेणे, त्यांचे नेतृत्व घडवणे आणि स्त्री चळवळीचा पाया अधिक भक्कम करणे हा परिषदेचा केंद्रबिंदू असल्याचे परिषदेच्या सचिव ॲड. निशा शिबूरकर यांनी सांगितले.
सध्याच्या सामाजिक वातावरणाबाबत परिषदेत तीव्र चिंता व्यक्त करण्यात आली आहे. समाजात वाढत चाललेली आक्रमकता, हिंसा आणि द्वेष यांना मिळणारे अप्रत्यक्ष प्रोत्साहन तसेच स्त्रियांच्या हक्कांवर होत असलेले हल्ले याविरोधात ठाम भूमिका घेण्याची गरज अधोरेखित करण्यात आली. महिला आयोगासारख्या घटनात्मक संस्थांची स्वायत्तता कमी होणे, कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी न होणे, महिला बजेट तसेच संशोधन प्रक्रियेत स्त्री संघटनांचा अपुरा सहभाग या मुद्द्यांवर परिषदेत स्पष्ट आणि चिकित्सक चर्चा होणार आहे. कायदे अस्तित्वात असतानाही अंमलबजावणीत दिसून येणारी पुरुषप्रधान मानसिकता, असंवेदनशील प्रशासकीय यंत्रणा आणि न्यायप्रक्रियेतील विलंब यावरही सखोल विचारमंथन केले जाणार आहे.
परिषदेचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे व्यासपीठावर सावित्रीबाई फुले, त्यांच्या सहकारी फातिमा शेख आणि हिंदू धर्माचा त्याग करून ख्रिश्चन धर्म स्वीकारलेल्या पंडिता रमाबाई यांच्या प्रतिमा लावण्यात येणार आहेत. यामागे सर्व धर्मांतील स्त्रियांना एकत्र आणण्याचा आणि स्त्री चळवळीच्या सर्वसमावेशक व परिवर्तनवादी परंपरेचा ठाम संदेश देण्याचा उद्देश असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले.
परिषदेच्या पहिल्या दिवशी घरगुती हिंसाचार, कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक छळ, वैवाहिक व कौटुंबिक हिंसाचार, जातीय व सांप्रदायिक हिंसाचार तसेच भारतीय संविधानासमोरील सध्याची आव्हाने यांवर गटचर्चा आणि परिसंवाद आयोजित करण्यात येणार आहेत. दुसऱ्या दिवशी आर्थिक व राजकीय सद्यस्थिती, सार्वजनिक वाहतूक, पर्यावरण व विकास, नवीन कामगार कायदे, केअर वर्क तसेच ट्रान्स आणि इंटरसेक्स समुदायांचे प्रश्न यांवर तज्ज्ञ आपले विचार मांडणार आहेत. यासोबतच नाटक, माहितीपट आणि नृत्यनाट्य अशा सांस्कृतिक कार्यक्रमांची प्रभावी मांडणीही करण्यात आली आहे.
परिषदेच्या तिसऱ्या आणि शेवटच्या दिवशी, २२ डिसेंबर २०२५ रोजी, यशवंतराव चव्हाण सेंटरवरून आझाद मैदानापर्यंत कूच काढण्यात येणार असून, त्यानंतर महाराष्ट्र स्त्री मुक्ती परिषदेची जाहीर सभा होणार आहे. या सभेत विविध समुदायांची निवेदने सादर केली जातील. तसेच परिषदेचे ठराव मांडून पुढील संघर्षाची स्पष्ट दिशा जाहीर केली जाणार आहे.
या तीन दिवसीय परिषदेत सुप्रिया सुळे, ॲड. इंदिरा जयसिंग, डॉ. सईदा हमीद आणि कुमार केतकर यांच्यासह अनेक ज्येष्ठ विचारवंत, अभ्यासक व कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. तसेच तीस्ता सेटलवाड, ॲड. वृंदा ग्रोवर यांसारखे कायदेविषयक तज्ज्ञही परिषदेत मार्गदर्शन करणार आहेत. परिषदेला शारदा साठे (अध्यक्ष), डॉ. चयनिका शाह (उपाध्यक्ष), ॲड. निशा शिबूरकर (सचिव) आणि डॉ. छाया दातार (खजिनदार) यांच्यासह महाराष्ट्रातील विविध महिला संघटना व कार्यकर्त्यांचे नेतृत्व लाभणार आहे.
स्त्रियांची प्रगती ही केवळ वैयक्तिक यशापुरती मर्यादित न राहता समूहभावना, समता, विविधता आणि एकजूट यांवर आधारित असली पाहिजे, या ठाम भूमिकेवर परिषद उभी आहे. त्यामुळे ही परिषद आगामी काळातील स्त्रीवादी परिवर्तनासाठी एक सशक्त, प्रभावी आणि दिशादर्शक व्यासपीठ ठरेल, असा निर्धार आयोजकांनी व्यक्त केला आहे.
