You are currently viewing खरंच एवढ्यासाठीच… करतात का अट्टाहास?

खरंच एवढ्यासाठीच… करतात का अट्टाहास?

खरंच एवढ्यासाठीच…
करतात का अट्टाहास?

मुलांना जन्म देऊन,
पोटाला चिमटा काढून,
लहानांचे मोठे करतात,
शिकवतात सवरतात,
रक्ताचं पाणी करतात.
मुलांचा मात्र मोठेपणी,
दूरदेशी जाण्याचा ध्यास,
खरंच एवढ्यासाठीच…
करतात का अट्टाहास?

सौभाग्याचं लेणं गहाण ठेऊन,
पोरांसाठी कर्ज काढतात.
मुलांच्या भवितव्यासाठी,
शेतीवाडीही विकतात.
म्हातारपणी आधार बनतील,
या भाबड्या आशेवर जगतात.
मुलांना आई बापापेक्षा,
जडतो पैश्यांचा हव्यास.
खरंच एवढ्यासाठीच…
करतात का अट्टाहास?

मुलांवीना पोरक्या घरात,
एकट्याचंच जिणं जगतात.
पहाटेच्या किरणांशी हसतात,
मावळतीचे तांबडे पाहत,
चंद्राच्या सोबतीने झोपतात.
मुलांना असते स्वप्नात,
नभातील चांदणीची आस.
खरंच एवढ्यासाठीच..
करतात का अट्टाहास?

वयाबरोबर दिवस रात्रही,
हळूच वार्धक्याकडे झुकतात.
मुलाबाळांना पाहण्यासाठी,
डोळ्यांची बुबुळेही सुकतात.
खणाणणारे दुरध्वनी आपसूक,
चेहऱ्यावर हास्य फुलवतात.
मुलांना सोशल मीडियाच्या,
व्हाट्सअप्प फेसबुकची प्यास.
खरंच एवढ्यासाठीच…
करतात का अट्टाहास?

(दिपी)✒️
दीपक पटेकर
८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा