देवगड ग्रामीण रुग्णालयाची राज्यात अनोखी कामगिरी;
प्रति मशिन तीन डायलेसीस सेशन नियमित, जिल्हा शल्यचिकित्सकांकडून अभिनंदन
देवगड
जिल्ह्यातील विविध आरोग्य संस्थांमधील इनहाऊस डायलेसीस युनिटचा नोव्हेंबर २०२५ चा आढावा घेतला असता, देवगड ग्रामीण रुग्णालयातील डायलेसीस युनिटने उल्लेखनीय कामगिरी केल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रति दिन प्रति मशिन तीन डायलेसीस सेशन पूर्ण करणारे देवगड हे राज्यातील एकमेव ग्रामीण रुग्णालय ठरले आहे.
जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाकडून देवगड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक प्रकाश पाटोदेकर तसेच डायलेसीस तंत्रज्ञ व अधिपरिचारिकांचे अधिकृतपणे अभिनंदन करण्यात आले आहे. पालकमंत्री व स्थानिक आमदार नामदार नितेश राणे यांनी या युनिटसाठी आवश्यक मशिनरी व कर्मचारी उपलब्धतेकडे सातत्याने लक्ष दिल्यामुळे हा कक्ष सुरळीतपणे कार्यान्वित राहिल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
जिल्हा शल्यचिकित्सकांनी काढलेल्या पत्रानुसार, जिल्ह्यातील इतर रुग्णालयांमध्ये अपेक्षित संख्येच्या तुलनेत प्रत्यक्ष डायलेसीस सेशन कमी झाल्याचे दिसून आले. मात्र, देवगड ग्रामीण रुग्णालयात उपलब्ध असलेल्या दोन डायलेसीस मशिनवर दररोज प्रत्येकी तीन सेशन यशस्वीरित्या पार पाडण्यात आली. नोव्हेंबर २०२५ या महिन्यात येथे एकूण १४६ डायलेसीस सेशन पूर्ण झाली असून अपेक्षित १५० सेशनच्या जवळपास पोहोचलेली ही कामगिरी आरोग्य यंत्रणेसाठी प्रेरणादायी ठरली आहे.
सध्या संपूर्ण राज्यात देवगड हे एकमेव डायलेसीस युनिट असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने स्पष्ट केले आहे, जिथे प्रति मशिन दररोज तीन सेशन नियमितपणे घेतली जात आहेत. त्यामुळे देवगड ग्रामीण रुग्णालयातील डायलेसीस सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांचे विशेष कौतुक करण्यात आले आहे.
दरम्यान, इतर उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयांनी देवगडच्या कामगिरीचा आदर्श घ्यावा, अतिरिक्त शिफ्ट वाढवाव्यात, मशिन दुरुस्ती तात्काळ करावी, तसेच रुग्ण नोंदणी पीएमएनडीपी पोर्टलवर रिअल टाइम करावी, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.
देवगड ग्रामीण रुग्णालयाची ही कामगिरी किडनी रुग्णांसाठी दिलासादायक ठरत असून, जिल्ह्याच्या आरोग्य सेवेचा दर्जा उंचावणारी असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
