You are currently viewing इन्सुलीत बेकायदा दारू वाहतूक प्रकरणी सावंतवाडीचा तरुण ताब्यात

इन्सुलीत बेकायदा दारू वाहतूक प्रकरणी सावंतवाडीचा तरुण ताब्यात

इन्सुलीत बेकायदा दारू वाहतूक प्रकरणी सावंतवाडीचा तरुण ताब्यात

साडे आठ लाखांचा मुद्देमाल जप्त

एक्साईजच्या इन्सुली पथकाची कारवाई

बांदा
गोवा बनावटीच्या दारूची बेकायदा वाहतूक करणाऱ्या बोलेरो टेम्पोवर इन्सुली दत्त मंदिरजवळ राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या इन्सुली पथकाने मोठी कारवाई केली. या कारवाईत गोवा बनावटीच्या विदेशी दारूचे ३५ बॉक्स आणि एक चारचाकी वाहन असा एकूण ८ लाख ४९ हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.​ याप्रकरणी दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या तन्झिल सईद शेख (वय २७, रा. सावंतवाडी) याला ताब्यात घेण्यात आले आहे.

राज्य उत्पादन शुल्काच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, इन्सुली परिसरात संशयास्पद वाहनांची तपासणी केली जात होती. गुरुवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास गोव्याहून सावंतवाडीच्या दिशेने येणाऱ्या महिंद्रा बोलेरो कॅम्पर (एमएच ०८ डब्लू १८५६) या वाहनाला तपासणीसाठी थांबवण्यात आले. वाहनाची झडती घेतली असता पाठीमागच्या हौद्यात भाजीपाल्याच्या रिकाम्या कॅरेटखाली लपवून ठेवलेला दारूसाठा आढळून आला.

यात ​विदेशी दारूचे ३५ बॉक्स किंमत अंदाजे ३ लाख ४९ हजार ३२० रुपये व महिंद्रा बोलेरो कॅम्पर वाहन किंमत ५ लाख रुपये असा ​एकूण ८ लाख ४९ हजार ३२० रुपयाचा मुद्देमाल ताब्यात घेतला.

ही कारवाई आयुक्त डॉ. राजेश देशमुख, सहआयुक्त प्रसाद सुर्वे, विभागीय उपायुक्त विजय चिंचाळकर आणि सिंधुदुर्गच्या अधीक्षक कीर्ती शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पथकात दुय्यम निरीक्षक धनंजय साळुंखे, विवेक कदम, जवान रणजीत शिंदे, दीपक वायदंडे, सतिश चौगुले, अभिषेक खत्री आणि सागर सुर्यवंशी यांचा समावेश होता. पुढील तपास दुय्यम निरीक्षक विवेक कदम करत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा