*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
फक्त एकदा…
झुळूक आहे वाऱ्याची तू
स्पर्शून जाते अंगाला
गंध ठेवूनी जाते मागे
लाजविशी निशिगंधाला…
चाफा चंपक आणि चमेली
तुजपुढती ग सारे फिके
दंवबिंदू तू पानावरती
पहाटवेळी धुके धुके…
आरसपानी सौंदर्याने
भुरळ घालते नित्य मला
अवकाशी मग जातो पाहा ना
मनोरथांचा माझा झुला…
निळ्या नभातील निळवंती तू
निळ्या तळ्यातील नीलपरी
सांग कसा ग तोल सावरू
फक्त एकदा ये ना घरी…
डोळाभरूनी पाहिन तुला मी
हृदयकोंदणी ठेवीन
आठवणीतच बघ तुझ्या मी
झुलतंच झोका राहीन…
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
