बांधकाम विभागाच्या अहवालावर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा निर्णय टांगणीला
सावंतवाडी
सावंतवाडीतील प्रस्तावित मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज प्रकल्पाचे भवितव्य आता बांधकाम विभागाचा व्यवहार्यता अहवाल आणि जिल्हा शल्यचिकित्सकांचे प्रतिज्ञापत्र यावर अवलंबून आहे. अभिनव फाऊंडेशनने दाखल केलेल्या जनहित याचिकेच्या पार्श्वभूमीवर १८ डिसेंबर रोजी मुंबई उच्च न्यायालयात याप्रकरणी महत्त्वाची सुनावणी होणार आहे.
न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी प्रतिज्ञापत्र सादर करणे अपेक्षित असून, त्यासाठी बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता पूजा इंगवले-देसाई यांचा व्यवहार्यता अहवाल निर्णायक ठरणार आहे. त्यांनी मंगळवारी प्रत्यक्ष जागेची पाहणी केली. यावेळी भूमी अभिलेख विभागाचे उपअधीक्षक विनायक ठाकरे, बबलू गवस, नगरपालिका कर्मचारी नासीर आणि विनायक जाधव उपस्थित होते.
दरम्यान, जिल्हाधिकारी तृप्ती घोडमिसे यांच्या आदेशानुसार रविवारी व सोमवारी भूमी अभिलेख विभागाने युद्धपातळीवर जागेची मोजणी केली. टाउन प्लॅनिंग नकाशानुसार आरक्षण क्रमांक ५-अ हा भूखंड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व मेडिकल कॉलेजसाठी आरक्षित आहे. ही जागा नेमकी किती आहे आणि ती प्रस्तावित प्रकल्पासाठी योग्य आहे की नाही, याचा अहवाल तयार करण्यात आला आहे.
बांधकाम विभागाचा व्यवहार्यता अहवाल आणि जिल्हा शल्यचिकित्सकांचे प्रतिज्ञापत्र या दोन्ही कागदपत्रांच्या आधारे १८ डिसेंबर रोजी न्यायमूर्ती मकरंद कर्णिक आणि न्यायमूर्ती अजित कडेथानकर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे. त्यामुळे इंगवले-देसाई यांच्या अहवालात काय निष्कर्ष निघतात आणि डॉ. पाटील न्यायालयात काय भूमिका मांडतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
