सावंतवाडीत प्रथमच श्री स्वामी समर्थांच्या चरणपादुकांचे ऐतिहासिक दर्शन खुले
सावंतवाडी
सावंतवाडी शहरात प्रथमच श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पावन चरणपादुकांचे ऐतिहासिक दर्शन भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे. अक्कलकोट संस्थानचे नरेश श्रीमंत मालोजीराजे (द्वितीय) भोसले यांना स्वतः श्री स्वामी समर्थ महाराजांनी प्रदान केलेल्या या चरणपादुका अक्कलकोट राजघराण्याकडून सावंतवाडी येथे आणण्यात आल्या आहेत.
या विशेष दर्शन सोहळ्याचे आयोजन सावंतवाडी राजवाड्यातील दरबार हॉलमध्ये करण्यात आले आहे. राजघराण्याचे खेम सावंत भोसले, शुभदादेवी भोसले, लखम राजे भोसले आणि श्रद्धा राणी भोसले यांच्या हस्ते विधीवत पूजन करून दर्शनास प्रारंभ करण्यात आला. मोठ्या संख्येने स्वामीभक्तांनी उपस्थित राहून या दुर्मिळ दर्शनाचा लाभ घेतला.
सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार श्री. दीपक केसरकर यांनीही राजवाड्यात भेट देत श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणपादुकांचे श्रद्धेने दर्शन घेतले.
हा दर्शन सोहळा सायंकाळी ८ वाजेपर्यंत सर्व भाविकांसाठी खुला असून, अधिकाधिक स्वामीभक्तांनी या पावन आणि ऐतिहासिक दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
ठिकाण : राजवाडा दरबार हॉल, सावंतवाडी
वेळ : सकाळी १०.३० ते सायंकाळी ८.००
दिनांक : १६ डिसेंबर २०२५
