तेरेकर रापण संघाला मोठा आर्थिक फटका; ४० मच्छीमार कुटुंबांचा उदरनिर्वाह धोक्यात
आचरा :
तोंडवळी तळाशील येथील रस्त्यालगत ठेवलेल्या तेरेकर रापण संघाच्या होड्यांना सोमवारी सायंकाळी सुमारे चारच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत होड्या ठेवण्याच्या मांगरीसह सर्व होड्या जळून खाक झाल्या. पर्यटनासाठी आलेल्या एका पर्यटकाच्या निदर्शनास ही आग येताच त्याने तातडीने ग्रामस्थांना याबाबत माहिती दिली.
माहिती मिळताच स्थानिक मच्छीमार व ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र किनाऱ्याकडून वाहणाऱ्या जोरदार वाऱ्यामुळे आगीने काही क्षणांतच रौद्र रूप धारण केले. परिणामी, होड्या ठेवण्याच्या मांगरीसह तेथील सर्व होड्या व साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.
या आगीत पारंपरिक रापणी मासेमारीसाठी वापरण्यात येणाऱ्या होड्या पूर्णपणे नष्ट झाल्या आहेत. त्यामुळे परिसरातील सुमारे ४० मच्छीमार कुटुंबांचा संपूर्ण उदरनिर्वाह हिरावला गेला आहे. आग नेमकी कशामुळे लागली, हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी वाऱ्यामुळे आग वेगाने पसरल्याचे सांगण्यात येत आहे. काही वेळातच संपूर्ण परिसरात धुराचे लोट पसरले होते.
या घटनेत होडी ठेवण्याच्या मांगरीत असलेल्या दोन होड्या, एक फायबरची पात, सुमारे २०० किलो वजनाचे नायलॉन रोप, होड्या ओढण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पाच उंडल्या असे सर्व साहित्य जळून खाक झाले. यामध्ये दोन होड्या, फायबर पात, रोप व उंडल्या मिळून सुमारे १० लाख रुपयांचे नुकसान झाले असून मांगरीचे सुमारे २ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
घटनेची माहिती मिळताच माजी सरपंच संजय केळूसकर, जयहरी कोचरेकर, संजय तारी, तोंडवळी सरपंच नेहा तोंडवळकर, उपसरपंच हर्षद पाटील, ग्रामसेवक युती चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य नरेंद्र मेस्त, भुपाल मालंडकर, पोलिस पाटील जगदीश मुळे आदी मान्यवर घटनास्थळी दाखल झाले. तसेच भाई आडकर, महेश मालंडकर, स्वप्नील तारी, विनायक कोचरेकर यांच्यासह तळाशील ग्रामस्थांनी आग विझवण्याच्या कामात सक्रिय सहभाग घेतला.
या आगीत जळून खाक झालेल्या पारंपरिक रापणीच्या होड्यांवरच सुमारे ४० मच्छीमार कुटुंबांचा उदरनिर्वाह अवलंबून होता. रापणी मासेमारी हे या कुटुंबांचे एकमेव उत्पन्नाचे साधन आहे. होड्या व इतर मासेमारीची साधने नष्ट झाल्याने त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न गंभीर बनला आहे. अनेक कुटुंबांमध्ये वृद्ध, महिला तसेच शिक्षण घेत असलेली मुले असून दैनंदिन खर्च, शिक्षण व कर्जफेडीचा भार कसा पेलायचा, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
विशेष म्हणजे, या आगीत जळालेल्या दोन होड्या नुकत्याच नव्याने तयार करण्यात आल्या होत्या. या होड्यांवर मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात आला होता. मात्र उत्पन्न मिळण्याआधीच त्या आगीत नष्ट झाल्याने तेरेकर रापण संघाला मोठा आर्थिक फटका बसला आहे. नवीन होड्या तयार करण्यासाठी संघातील सदस्यांनी मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करून ही गुंतवणूक केली होती.
शासनाने तातडीने मदत न केल्यास या मच्छीमार कुटुंबांवर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता मच्छीमारांनी व्यक्त केली असून, नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी जोर धरत आहे.
