शेतकरी संघटनांची जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी
सिंधुदुर्गनगरी :
किमान यावर्षी तरी शेतकऱ्यांना प्रति किलो काजूला २०० रुपये हमीभाव द्यावा किंवा काजू बीसाठी बोनस अनुदान मंजूर करावे, अशी ठाम मागणी छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा शेतकरी व काजू उत्पादक संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन आज शेतकऱ्यांच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.
बदलत्या हवामानामुळे गेल्या चार-पाच वर्षांत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी व बागायतदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शासनाच्या विविध योजनांतर्गत जिल्ह्यात काजू लागवड मोठ्या प्रमाणात वाढली असली, तरी काजू बीला अपेक्षित दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे.
महाराष्ट्र शासनाच्या ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत वेंगुर्ला तालुक्यातील फळ संशोधन केंद्रात विकसित केलेल्या प्रगत जातींची काजू कलमे लावून अनेक शेतकऱ्यांनी आपल्या बागा उभारल्या आहेत. मात्र या काजू बागांची देखभाल, जतन व उत्पादन प्रक्रियेसाठी मोठा खर्च येतो. तरीही उत्पादित काजू बीला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत.
तसेच बदलत्या हवामानामुळे होणाऱ्या नुकसानीसाठी शासनाकडून अपेक्षित भरपाई मिळत नसल्याची तक्रारही निवेदनात करण्यात आली आहे. त्यामुळे शासनाने काजू बीसाठीची जोखीम कालावधी ३० एप्रिलपर्यंत वाढवावी. वन्य प्राण्यांमुळे होणाऱ्या नुकसानीची भरपाई देण्यात यावी. तसेच फळ पिकांवरील वाढत्या कीड व रोगांवर प्रभावी नियंत्रणासाठी फळ संशोधन केंद्रामार्फत प्रभावी कीटकनाशकांवर संशोधन करावे, अशीही मागणी करण्यात आली आहे.
या वेळी जिल्हा शेतकरी संघटनेचे श्यामसुंदर राणे, देवेंद्र सावंत, समीर गावकर, सोमनाथ परब, संतोष तांबे आदी उपस्थित होते.
