मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :
डहाणूकर कॉलेज, घैसास सभागृह, विलेपार्ले येथे डाॅ. मनीषा कामत यांच्या “मनोमनी” काव्यसंग्रहाचे प्रकाशन शनिवार, १३ डिसेंबर २०२५ रोजी संध्याकाळी सुप्रसिद्ध अभिनेत्री चिन्मयी सुमीत राघवन यांच्या हस्ते यशस्वीपणे पार पडले. मनीषा कामत ह्या पूर्वाश्रमीच्या मनीषा कुळकर्णी, पार्ले टिळक विद्यालयातून शिक्षण पूर्ण करून डाॅ. झाल्या आणि सध्या अमेरिकेत स्थायिक आहेत.
डॉ. मनीषा कामत यांनी काही एकांकिका लिहिल्या असून त्यात लहान भूमिका केल्या आहेत. त्यांचे पती सलील प्रतापराव कामत हे संगणक अभियंता म्हणून अमेरिकेत स्थायिक असून, तबला व ढोलक वाजवण्यात तसेच गायनात कुशल आहेत.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. मनीषा यांनी लिहिलेल्या नांदीने, संपदा मनीष नाडकर्णी यांनी आपल्या सुमधुर गायनाने केले. कवयित्री डाॅ. मनीषा आणि सलील कामत यांची मुलाखत मनीष अविनाश नाडकर्णी यांनी घेतली. तर डॉ. मनीषा यांची मुलगी कु. ऋचा हिने आईची कविता सादर केली.
सुप्रसिद्ध संगीत शिवस्वराज्यगाथा या कार्यक्रमाचे कवी, संगीतकार व गायक अनिल शशीकांत नलावडे यांचाही समारंभात सहभाग होता. पार्ले टिळक विद्यालयाच्या शिक्षकांचा हृद्य सत्कार कार्यक्रमाचे आकर्षण ठरला. डाॅ. मनीषा आणि सलील कामत यांना आशीर्वाद देण्यासाठी गोरेबाई, देवबाई, नवाथेबाई, तांबोळीबाई, वेलणकरबाई, वावीकरबाई, बापटबाई, पेठेबाई आणि चुरीबाई उपस्थित होत्या.
प्रकाशन सोहळा डाॅ. मनीषा आणि सलील कामत आणि त्यांच्या कुटुंबीय तसेच मित्रपरिवाराच्या सहकार्याने साजरा करण्यात आला. उपस्थित रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमानंतर जुने मित्र आणि नातेवाईक गप्पा मारत अल्पोपहाराचा आस्वाद घेत राहिले आणि छायाचित्रांच्या स्वरूपात समारंभाच्या आठवणी कायमच्या जतन केल्या.
प्रकाशन समारंभादरम्यान डॉ. मनीषा यांच्या काव्यरुपांचे सादरीकरण, नांदी सादरीकरण, शायरी, कविता वाचन आणि शिक्षकांचा सत्कार हे सर्व मनःस्पर्शी अनुभव ठरले. हा प्रकाशन समारंभ उपस्थित प्रत्येकाच्या हृदयात कायम राहील, अशी भावना व्यक्त करत सर्वांनी डाॅ. मनीषा कामत यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आणि त्यांच्या काव्यसंग्रहासाठी शुभेच्छा दिल्या.
