You are currently viewing यशोधरा

यशोधरा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम लेख*

 

*पौराणिक व्यक्तिरेखा स्वगत*

 

*यशोधरा*

 

राजमहालाच्या सौधावर मी उभी आहे यशोधरा….मनात्या भावभावनांचे उठलेले तरंग बघत….कोलिय राजघराण्याची सौंदर्यसंपन्न लावण्यवती राजकन्या होती मी.राजकन्येत असावे त्या सर्व कलागुण व विद्येत

मी पारंगत होते.यथावकाश माझं वडील दंडकोशींनी माझं स्वयंस्वर ठरवलं …देशोदेशीचे सुकुमार राजपुत्र राज्यात आले,त्यातल्या कपिलवस्तूच्या शुध्दोधनपुत्र सिध्दार्थवर माझी दृष्टी खिळली.

का कुणास ठाऊक ,तो मनापासून आवडला.मी वरले त्याला मनोमन.‌.पण पण होता तिरंदाजीचा….त्यात तो अजेय ठरला व मी सिध्दार्थाची राणी झाले.मला आकाश ठेंगणे‌वाटू लागले….भव्य राजवाडा,रमणीय वाटिका..आणि सोबत मनासारखा पती मिळाला होता…दिवस कसे आनंदात ,मयुरपंख लेऊन चालले होते…

आनंदात मी न्हाऊन निघाले असतांनाच गोड वार्ता समजली.मी आता आई होणार होते…आयुष्याला पूर्णत्व लाभणार होतं..लवकरच युवराज राहुलचा जन्म झाला.सर्वत्र आनंदी आनंद नांदत असताना..

सिध्दार्थ वेगळ्या विचारात होते.

मनन ,चिंतन ,ध्यान…पण मला ते जाणवले नाही,बाळाच्या संगोपनात…एक दिवस मी बाळासोबत निद्रिस्त असताना सिध्दार्थ अचानक गृहत्याग करून निघून गेले..कळले तेव्हा वेळ निघून गेलेली…माझं त्यांच्यावर निरतिशय प्रेम असतांना माझा,मुलाचा त्याग करून ते गेले…ही गोष्ट मला कशी रुचेल?

त्याहीपेक्षा मला विश्वासात न घेणं

माझ्या जिव्हारी लागलं…काळीज विदीर्ण झालं त्या क्षणी….

मी समंजस होते,समजून घेतली असती त्यांची इच्छा,त्यांचा संकल्प पण त्यांनी मला फक्त बोलायला सांगायला हवं होतं….

हा घाव मिटणारा नव्हता….ते सत्याच्या ,शाश्वताच्या शोधात मला,पुत्राल व सगळ्यांनाच त्यागून दूर गेले होते….

मला जगावं लागलं ,राहुलसाठी,राज्य,जबाबदारीसाठी…तो राज्याचा उत्तराधिकारी होता.सिध्दार्थबद्दल अधेमधे कानावर येई,ते ज्ञानप्राप्तीने सिध्दार्थ गौतम बुध्द झाले होते.तथागत म्हणून लोक त्यांना ओळखत.अनेक वर्षे गेली आणि तथागत राज्यात आल्याची वार्ता माझ्या कानावर पडली.सगळ्यांना ते भेटले.राहुललाही आशीर्वाद दिला आणि मला भेटीला बोलावलं….

खरंच माझं मन कसं मानेल,त्यांनी न सांगता माझा त्याग केलेला,अत्यंत प्रेम करूनही मला अविश्वासाशी सामना करावा लागला….त्यांच्या उच्च ध्येय्यासाठी त्यांनीही तेव्हा विरह वेदना सोसली असावी,पण माझं आयुष्य,त्याचा विचार कोणीच कसा केला नाही?

शेवटी त्यांच्या त्या बुध्द स्वरुप तेज:पुंज रुपाचं दर्शन घ्यायला निघाले,पत्नी म्हणून नाही तर योगिनी व्हायचं मनात पक्कं ठरवून!…नियतीने हेच दान माझ्या पदरात घातलं होतं…!!

 

*अरुणा दुद्दलवार@✍️*

प्रतिक्रिया व्यक्त करा