*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य तथा अध्यक्ष कोमसाप सावंतवाडी लेखक कवी दीपक पटेकर (दीपी) लिखित पुस्तक परीक्षण*
*”शब्दांच्या पलीकडले”*
🖊️लेखक: सुरेश श्यामराव ठाकूर,
आचरा, मालवण
भ्रमणध्वनी: ९४२१२६३६६५
प्रकाशक: प्रमोद कोनकर, सत्वश्री प्रकाशन, रत्नागिरी
मूल्य: ₹.२००/-
नेहमी बोलण्यात येणाऱ्या १११ शब्दांचे कूळ आणि मूळ यांच्याविषयी वाचकांशी हितगूज करणारे एक संग्राह्य पुस्तक म्हणजे *”शब्दांच्या पलीकडले”*..!
मालवण तालुक्यातील आचरा, पिरवाडी येथील निवृत्त शिक्षक ज्यांनी आयुष्यभर ज्ञानसेवेचे व्रत अंगिकारले आणि शब्दांच्या पलीकडले शब्दांचे अर्थ अगदी सहज भाषेत सांगून शब्दांचे कूळ आणि मूळ वाचनाची आवड असणाऱ्या वाचनप्रेमींना ज्ञात करून दिले ते म्हणजे साहित्य श्रीमंतीचा वसा घेऊन निष्ठेने साहित्याची दिंडी खांदावर घेत साहित्य पंढरीची वाट चालणारे शब्दांचे अन् साहित्याचे पुजारी, शब्दांच्याही पलीकडले असलेले आदरणीय श्री.सुरेश श्यामराव ठाकूर गुरुजी..!
कोकण मराठी साहित्य परिषद आणि अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला शाखा मालवण या दोन्ही साहित्यिक संस्थांची धुरा समर्थपणे वाहत ठाकूर गुरुजींनी अनेक लिहित्या हातांना बळ दिले, लिहिण्याची प्रेरणा बनले. “शतदा प्रेम करावे” हा त्यांचा पहिला ललितबंध, तर “सिंधुसाहित्यसरिता”, “बीज अंकुरे अंकुरे”, “ये ग ये ग सरी” या पुस्तकांचे त्यांनी संपादन केले आणि कोमसाप मालवणच्या जवळपास १०० लिहित्या हातांना लेखक, कवी म्हणून नावलौकिक मिळवून दिला. तरीही कुणाचेही ऋण व्यक्त करण्यापेक्षा त्यांच्या ऋणात राहण्यात आनंद मानणाऱ्या ठाकूर गुरुजींनी घेण्यापेक्षा देण्यातच धन्यता मानली. वेळोवेळी विविध उपक्रम राबवित असतानाच “बोलतो मराठी” या साहित्यिक उपक्रमातून शब्दांचे कूळ आणि मूळ समजावून सांगताना निर्मित झालेले त्यांचे पुस्तक म्हणजे “शब्दांच्या पलीकडले”…!
ऋषितुल्य व्यक्तिमत्व, कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांनी या पुस्तकाला शुभेच्छा तर दिल्याच परंतु “मराठी शब्दांचे कूळ व मूळ धुंडाळण्याचा व्यासंगी प्रपंच…” असे म्हणत लेखकांवर कौतुकाची थाप मारली आणि वडीलधारेपणाचे आशीर्वाद दिले आहेत.
पुस्तकाला माजी शिक्षण तथा मराठी भाषामंत्री आम.दिपक केसरकर यांचे स्वीय सहायक श्री.रामचंद्र आंगणे (उपशिक्षणाधिकारी- प्राथमिक, जि.प. सिंधुदुर्ग) यांनी प्रस्तावना देताना जणू शब्दांनाच औक्षण घातले आहे. शब्दांच्या पलीकडले मधून १११ शब्दांच्या कूळकथा, मूळकथा लिहिताना लेखकांनी शब्दांची व्युत्पत्ती, शब्दांचा प्रवास, प्रवासाची रंजकता आणि वर्तमानात घडत असलेले प्रसंग कथन पद्धतीने सांगितलेले आहेत.
पुस्तकातील मोजक्याच शब्दांवर मी या लेखातून प्रकाश टाकण्याचा अल्पसा प्रयत्न करतो…
पुस्तकातील पहिला शब्दच ज्ञानाचे भांडार उघडणारा आहे तो म्हणजे *”प्रकांडपंडित”…*
या शब्दाविषयी बोलताना त्यांनी दुर्मिळ अशा व्यक्तिमत्त्वाचे दर्शन घडवले ते म्हणजे प्रकांडपंडित तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी..!
प्रत्येक वृक्षाला मूळ, खोड, फांद्या आणि फुले- फळे हे चार भाग असतात. फांद्या फुटेपर्यंतच्या मजबूत खोडाला “प्रकांड” म्हणतात. मराठीत त्याला “कांड” असेही म्हणतात. प्रकांडपंडित म्हणजे ज्ञानशाखांच्या मूलभूत आणि पायाभूत संकल्पनांचे संपादन केलेले ज्ञानऋषी.. जणू ज्ञानाचा विस्तृत वटवृक्षच..!
*”कंदील आणि गॅसबत्ती”*
कंदीलाच्या प्रकाशात अभ्यास करणारी आणि गॅस बत्तीच्या उजेडात जत्रा फिरणारी पिढी आज कोकणात शेवटचीच उरली आहे. प्रकाश म्हणजे उजेडाशी संबंधित असणारे हे दोन्ही शब्द काही वर्षांपूर्वी पर्यंत रोजच्या जीवनातील घटक झालेले होते. कंदील हा शब्द मराठी भाषेत आला तो *किंदील* या अरबी शब्दापासून. मालवणी बोलीत कंदीलला “लाटान” आणि “फाणास” हे दोन सुंदर शब्द आहेत. परंतु, कंदील प्रमाणेच हे शब्द देखील अडगळीत गेलेले दिसतात. लॅन्टर्न या इंग्रजी शब्दापासून लाटान आणि फानुस या फारशी शब्दापासून आला तो फाणास.
कंदीला नंतर प्रगत पाऊल म्हणजे गॅसबत्ती..
गॅस या लॅटिन आणि बत्ती या अरबी शब्दापासून गॅसबत्ती हा शब्द तयार झाला. इंग्रजीमध्ये त्याला पेट्रोमॅक्स हा शब्द आहे, परंतु अजून तरी गॅसबत्तीला मराठी शब्द सापडलेला ऐकिवात नाही. या शब्दाची आठवण सांगताना त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्ला येथे मानसेश्वराची जत्रा साजरी होते, त्या जत्रेला गॅसबत्तीची जत्रा असे म्हटले जाते. तिथे पेट्रोमॅक्स बत्त्या लावण्याची प्रथा असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले आहे.
*त्रेधातिरपीट….*
हा शब्द आला कुठून? असे कोणी विचारले तर ऐनवेळी आपली त्रेधातिरपीट उडू नये म्हणून लेखकाने हा शब्दप्रपंच केला आहे. त्रेधातिरपीट हा शब्द त्रिधा, त्रिपुट या दोन संस्कृत शब्दापासून तयार झाला. त्रिधा म्हणजे तीन प्रकारे बुद्धीची, विचारांची आणि कृतीची संभ्रमावस्था.. म्हणजे त्रेधा उडणे.
हा वाक्यप्रचार म्हणजे भिल्ल, कातकरी, धनुर्धारी यांनी मातृभाषेला दिलेली देणगी आहे. त्रिपुट या मूळ संस्कृत शब्दाचा अर्थ बाण असा आहे. बाणाचे तीन भाग असतात, एक पुढचे पाते, मधली दांडी आणि शेवटचा पिसे असलेला भाग. या तीन भागांनी बनलेल्या बाणाला त्रिपुट असे म्हणतात. पण, ऐनवेळी सावज समोर आल्यावर त्या बाणाचे तीन तुकडे झाले (त्रि + धा), तर धनुर्धारीची जी दयनीय अवस्था होते ती म्हणजे त्रेधातिरपीट..!
*”बर्फ..”*
बर्फ या मूळ फारशी शब्दाला मराठीत हिम म्हणतात हे देखील आपल्याला चटकन आठवत नाही.. यालाच फारसी भाषेचा मराठीवरील पगडा असे म्हणतात. हिम हा शब्द मूळ संस्कृत भाषेतला; सदैव ज्या पर्वतावर हिम असते तो हिमालय..! टायटॅनिक सारख्या जगातील सर्वात मोठ्या जहाजाला जलसमाधी देणारा हिमनग देखील आपल्या स्मरणातून कधीच जात नाही. तरीही बर्फाला मराठीत शब्द हिम हे मात्र आपल्या डोक्यावर बर्फाचा खडा ठेवूनही चटकन आठवत नाही.
*”झबले”…..*
झ.. झबल्यातला हे आपण शालेय जीवनापासून ऐकत असलो तरी हा शब्द अरबी फारसी मधून आला आणि मराठीच्या पाळण्यात सुखाने नांदत आहे. प्रत्येक शब्दाचा पोत, लहेजा, नजाकत वेगळी असली तरी अशा शब्दांनी भाषेचे महावस्त्र विणले जाते.
*”गडगंज”…*
हा देखील फारसी शब्द.. गड म्हणजे पुष्कळ आणि गंज म्हणजे देखील पुष्कळ. एकाच अर्थाची द्विरुक्ती होऊन आलेला हा फारसी शब्द मराठीची गडगंज श्रीमंती बनला.
*”अनागोंदी”….*
हा मुळात कन्नड भाषेतील शब्द अन म्हणजे हत्ती आणि गोंदी म्हणजे गल्ली.. अरुंद गल्लीतून हत्ती रेटून नेताना होणारा गोंधळ म्हणजे अनागोंदी… शेजारच्या प्रदेशातून आला तरी अभिजात मराठीत मिरवत बसला.
*”खैरात”…*
म्हणजे दान, कुरवंडी. फारसी मधून मराठीत आलेला हा शब्द म्हणजे खिरापत हा शब्दाच्याच कुटुंबाचा घटक असावा. काहीही असो पण शब्दांची खैरात मराठीला अभिजात भाषा करते हे मात्र नक्कीच..!
*”खुर्द आणि बुद्रुक”…*
पर्शियन भाषेतून हे दोन्ही शब्द आलेत. खुर्द म्हणजे लहान आणि बुद्रुक म्हणजे मोठा. बुजुर्ग या पर्शियन शब्दावरून कदाचित बुद्रुकची निर्मिती झाली असावी.
*”अडसर”…*
हा शब्द ग्रामीण बोलीतून आला आहे. भव्य टोलेजंगी वाड्याच्या महाद्वाराच्या एका भिंतीकडून दुसऱ्या बाजूला भिंतीत जाणारा विशाल लाकडी दांडा असे, त्याला अडसर असे म्हणत. किल्ल्याच्या दिंडी दरवाजांना आजही तो असतो.
*”डबघाई”..*
खरा शब्द डफघाई..डफावर शाहीर घाईघाईत थाप मारतो तेव्हा आता डफघाई सुरू झाली म्हणजे पोवाडा संपणार हे ज्ञात होते. त्यावरून आलेला डफघाई मराठीत डबघाई म्हटला गेला.
*”खोगीर भरती”..*
खोगीर हा फारसी शब्द..घोड्याच्या पाठीवर असलेले जीन (पालाण) म्हणजे खोगीर. घोडेस्वार त्यात आपले सामान ठेवतो पण, काहीवेळा त्यात कागद, चिंध्या सारखे अनावश्यक सामान भरून खोगीर वर बसण्यासाठी व्यवस्था केली जायचे..ती खोगीर भरती.
*”सिंहाचा खारीचा वाटा”…*
सिंहाचा वाटा आंग्ल भाषेतून तर खारीचा वाटा मराठमोळ्या रामकथेतून आला.
*”रुमाल”…*
हा मूळचा फारसी शब्द.. रु म्हणजे चेहरा..माल म्हणजे फडके.. यावरून तयार झाला रुमाल..!
*”घोडं पेंड खातं..”*
मुळात खोडा पेंड खात नाही. तर तो शब्द “घोडं पेण खातं ” असा आहे. पेण म्हणजे थांबणे. घोडेस्वार घोडदौड करताना मध्येच विसावा घेतात, त्यामुळे नियोजित ठिकाणी पोचण्यास अडथळा येतो यावरून ही म्हण रुजू झाली.
पुस्तकातील प्रत्येक शब्दावर व्यक्त होणे नक्कीच लांबट लागल्यासारखे होईल. त्यामुळे काही शब्दांवर व्यक्त झालो.
ठाकूर गुरुजींनी अशा १११ शब्दांना जणू त्यांचे मूळ, कूळ, जन्मस्थान, पूर्वज, भूतकाळ, वर्तमान सर्वांची जाण करून दिली. यामध्ये अनेक आपल्या रोजच्या बोलीतील शब्द आहेत. ज्यांच्याबद्दल आपल्याला केवळ अर्थनिरूप माहिती असते. परंतु त्याची व्युत्पत्ती कुठून..? कधी..? कशी झाली..? याची पुसटशी कल्पना देखील नसते. तरीही आपण फारशी, अरबी, आंग्ल, इटालियन भाषेतून मराठीत आलेल्या शब्दांवर अभिजात मराठीची पगडी घालून मिरवतो त्यांची “अथ पासून इतिपर्यंत” सखोल माहिती दिली आहे. हे सर्व करत असताना सव्यापसव्य, छत्रचामर, अकांडतांडव, पायपोस, पासंग, पुरोपकंठी अशा विस्मृतीत गेलेल्या अनेक शब्दांना पुन्हा आठवणींच्या कप्प्यातून बाहेर काढले आहे.
ठाकूर गुरुजींच्या शब्दांच्या पलीकडले पुस्तकांचे वाचन केल्यावर नक्कीच चोखंदळ वाचकांना रोजच्या व्यवहारात, बोलण्यात येणारे परंतु दुर्लक्षित राहिलेल्या शब्दांचे कूळ, मूळ आणि शब्दांच्याही पलीकडे दडलेला त्यांचा प्रवास शोधण्याची आवड लागेल..आणि खऱ्या अर्थाने हेच तर ठाकूर गुरुजींच्या या पुस्तक निर्मितीतील फलित असेल. वाचकांनी शब्दांच्या पलीकडे असलेला गुरुजींच्या शब्दांचा प्रवास वाचावा आणि त्यातून प्रेरणा घेऊन लिहित्या हातांना बळ यावे अशी सदिच्छा व्यक्त करतो.
लवकरच शब्दांच्या पलीकडलेचा दुसरा भाग लिहिण्याची आपणांस संधी मिळू दे ही श्री रामेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो…
||शुभंभवतु||
🖊️दीपक पटेकर (दीपी)
अध्यक्ष, को.म.सा.प. सावंतवाडी
८४४६७४३१९६
