तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात कळसुलकर इंग्लिश स्कूलच्या युवराज धुरीचे दैदीप्यमान यश
सावंतवाडी :
राज्य विज्ञान मंडळ नागपूर, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग आणि पंचायत समिती सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ५३ व्या सावंतवाडी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात कळसुलकर इंग्लिश स्कूलच्या युवराज संदीप धुरी याने दिव्यांग गटातून प्रथम क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले.
हे विज्ञान प्रदर्शन ३ व ४ डिसेंबर रोजी संस्कार इंटरनॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल, निरवडे येथे पार पडले. या प्रदर्शनात तालुक्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पक आणि नाविन्यपूर्ण वैज्ञानिक प्रतिकृती सादर केल्या.
इयत्ता आठवीत शिक्षण घेणाऱ्या युवराज धुरी याने ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ (पाणी अडवा, पाणी जिरवा) या विषयावर आधारित प्रतिकृती सादर केली होती. भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन कसे करता येईल, याचे प्रभावी आणि सुस्पष्ट सादरीकरण त्याने केले. त्याच्या या प्रयोगाची दखल घेत परीक्षकांनी त्याची दिव्यांग गटात प्रथम क्रमांकासाठी निवड केली.
युवराजला विज्ञान शिक्षिका श्रीमती एस. यू. बांदेलकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्याच्या या यशाबद्दल सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी, कळसुलकर इंग्लिश स्कूल व आय. बी. सय्यद कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक एस. व्ही. भुरे, पर्यवेक्षक एस. एस. वराडकर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्याचे अभिनंदन केले आहे.
