You are currently viewing ‘गझलनंदा ‘ यांच्या गझलेतील स्त्री उद्गार

‘गझलनंदा ‘ यांच्या गझलेतील स्त्री उद्गार

*ज्येष्ठ गझलकारा सुनंदामाई पाटील “गझलनंदा” यांच्या “स्त्री” उद्गारांवरील गझलांचे ज्येष्ठ गझलकार प्रसाद कुलकर्णी यांनी केलेलं रसग्रहण*

 

*’गझलनंदा ‘ यांच्या गझलेतील स्त्री उद्गार*

——————————————–

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी

(९८ ५०८ ३० २९० )

 

मराठी गझल विद्यापीठाचे संस्थापक कुलपती आदरणीय सुरेश भट यांच्या जीवनदानी योगदानामुळे गेल्या अर्धशतकात

मराठी गझलचा विस्तार अतिशय वेगाने होत आहे. सुरेश भटांनी उर्फ दादांनी गझलेची बाराखडी लिहून गझलेचे तंत्र आणि मंत्र सांगण्याचा पूर्णांशी प्रयत्न केला. गुरू – शिष्यत्वाचे कोणतेही अवडंबर न माजवता अथवा गंडाबंदत्वाचा कोणताही आग्रह न धरता त्यांनी मराठी गझलकारांच्या दोन – तीन पिढ्या लिहित्या केल्या. त्यामुळे आजची मराठी गझल वैविध्यपूर्ण झाली आहे. या गझलबोलीत ज्यांनी सकस स्वरूपाची भर घातली त्या गझलकारांमध्ये अग्रक्रमाने समावेश करावा लागेल असे नाव म्हणजे प्रा. सुनंदा पाटील उर्फ गझलनंदा. खुद्द दादांनीच त्यांना ‘गझलनंदा ‘ हे नाव दिले आहे. आणि दादांनी दिलेले हे नाव त्यांनी कसदार , तंत्रशुद्ध , मंत्रसमर्थी गझल लिहून सार्थ ठरवले आहे. त्यांच्या गझलेतील स्त्री उद्गाराचा स्वतंत्र विचार करावा वाटणे व करावा लागणे यातच त्यांच्या गझलेचे सामर्थ्य आहे.

 

त्यांनी एका शेरात सांगितले आहे,

 

*संवेदना,सहवेदना केल्या व्यथांनी बोलक्या*

*डोळ्यांतुनी मग बोलली अलवार माझी शायरी…*

 

संवेदनशील असलेल्या गझलनंदा यांचा ‘ *माझा विचार आहे* ‘ हा गझलसंग्रह प्रसिद्ध आहे. आता ‘ *सावली अंबराची*’ हा नवा गझलसंग्रह प्रकाशित होतो आहे. याशिवाय नऊ काव्यसंग्रह , एक कादंबरीही प्रकाशित झालेली आहे. ललितलेख, कथा, मुलाखती , वृत्तपत्रीय स्तंभलेखन आदींचे प्रचंड हस्तलिखित प्रकाशनाच्या मार्गावर आहे. एकूण काय तर सुनंदा पाटील या सिद्धहस्त गझलकारा, लेखिका आहेत. सुनंदा पाटील यांनी नागपूर, गडचिरोली येथे प्रारंभीच्या काळात भूगोल आणि शिक्षणशास्त्राची प्राध्यापिका म्हणून काम केले. नंतर भारतीय स्टेट बँकेमध्ये क्लार्क म्हणून कार्यरत राहून त्या ‘उपप्रबंधक’ या अधिकारपदावरून निवृत्त झाल्या. साक्षात दादांनी गझललेखनाचे धडे दिल्याने गझलेचे तंत्र व मंत्र यात गझलनंदा परिपूर्ण आहेत. त्यांच्या समग्र गझला वाचल्यावर त्यातील वैविध्यपूर्ण आशयघनता दिसून येते. त्यातील स्त्री जाणिवांचा उद्गार स्वतंत्रपणे विचारात घ्यावा असे आतून वाटल्याने हा लेखनप्रपंच मी करत आहे. मराठी साहित्यातील कवितेत लिखित व अलिखित स्वरूपात स्त्री जाणिवांचा उद्गार नेहमीच महत्वाचा ठरला आहे. म्हणींपासून जात्यावरच्या ओव्यांपर्यन्त, संतसाहित्यापासून नवकवितेपर्यंत, नाट्यगीतांपासून भावगीतांपर्यंत , ग्रामीण कवितेपासून नागरी कवितेपर्यंत , छंदोबद्ध कवितेपासून मुक्तछंदा पर्यन्त सर्वत्र स्त्री उद्गार दिसून येतो. अन्य काव्यप्रकाराच्या तुलनेने मराठी गझल अजून वयाने लहान आहे. पण मराठी गझलेच्या स्त्री विषयक सामाजिक जाणिवांची व्यापकता गझलनंदा यांच्या गझलांमधून दिसून येते. मराठी स्त्री गझलकरांच्या गझलेत अशी सखोल व्यापकता व विविधता निदान माझ्या वाचनात तरी आलेली नाही हे नम्रपणे नमूद करतो. म्हणूनच या दुर्मिळतेची स्वतंत्र नोंद घेतली पाहिजे असे मला वाटते.

 

गझल हा शब्द स्त्रीलिंगी आहे. पण या क्षेत्रात पुरुषांची मक्तेदारी आहे. इथे मक्तेदारी याचा अर्थ संख्यात्मकतेने जास्त असा आहे. कसदारपणा असा नाही. अर्थात मद्य, मदिरा, मदिराक्षी यांचे प्रारंभीच्या काळात गझलेशी असलेले अतूट वाटणारे नाते आता इतिहास जमा झाले आहे. आता गझल केवळ त्या परिघात न फिरता माणसाचा माणूस म्हणून विचार अग्रक्रमाने करू लागली आहे. हे बदल आपोआप घडलेले नाहीत, तर परिस्थितीने व भवतालाने केलेले आहेत. त्याचे प्रतिबिंब गझलेत उमटू लागले आहे. गझलनंदा यांच्या गझलेत ते विशेषत्वाने, विविधतेने , ताकदीने दिसते आहे.

 

*पाच शेरांनी मला समृद्ध केले*

*फक्त जखमांचा जरा विस्तार झाला..*

 

हा जखमांचा विस्तार आणि शेरच समृद्ध स्त्री उद्गार आहे असे मी मानतो. गझल म्हणजे काय ? याच्या व्याख्या अनेकांनी अनेक केल्या आहेत. त्यापैकीच एक लोकप्रिय व सर्वमान्य व्याख्या म्हणजे, एखादा शिकारी जेव्हा हरणाच्या मागे लागतो, तेव्हा हरीण जीव घेऊन पळत असते. प्रसंगी एखाद्या झाडीत अडकत सुद्धा असेल. अशावेळी जेव्हा त्याच्या लक्षात येते की आता इथून आपली सुटका नाही , तेव्हा त्याच्या कंठातून जो विवश स्वर उमटतो त्याला गझल म्हणतात. गझलनंदा यांची गझल केवळ विवशता मांडत नाही. त्यांच्या गझलेने विवशता , जखडलेपण, हे मांडत असताना स्वातंत्र्याचा , समतेचा , लढाऊपणाचा नाराही दिलेला आहे. गझलनंदा यांच्या गझलेत स्त्री विषयक दृष्टिकोन, रूढी – परंपरा, होरपळ, प्रेमळता, कोमलता, हळवेपण, ममत्व, समतेची आस, स्त्री शक्तीचे चैतन्य, बाईपण आणि माणूस म्हणून जगण्याची असोशी व त्यासाठीची उपाययोजना यांची मांडणी दिसते. रूढ अर्थाने ज्याला स्त्रीवादी भूमिका वगैरे संबोधले जाते तशी ही मांडणी नाही. तर यात सहजीवनातील प्रगल्भतेची आस आहे. त्याचवेळी स्त्री कमजोर नाही हे स्पष्टपणे सांगणारी आहे. स्त्रीचं व्यक्तिमत्व सक्षम असलं तरी चुकीच्या रूढी परंपरा तिला अक्षम करू पाहतात. त्यावरचे कोरडे इथे दिसतात. अन्याय गाडून न्याय्यता यावी हा आग्रह इथे आहे. एका गझलेत गझलनंदा म्हणतात,

 

*मी शेवटच्या ओळीचे आभार मानते बाई*

*तू लिही नव्याने कविता कविताच सांगते बाई..*

 

*पायात साखळी रुळली मज पैंजण वाटत होते*

*शृंखला नव्याने कळली तोडून टाकते बाई..*

 

*आले न बांधता त्याला भाळाचे बंधन तुटले*

*मी दोरा वटवृक्षाला गुंडाळत बसते बाई..*

 

*मी रोज तुझ्या दाराशी शिंपिली आसवे माझी*

*अन्याय दवावर झाला हे आता कळते बाई..*

 

*दुःखाच्या अष्टदिशांनी रणशिंग फुंकले होते*

*मी झाशी तेव्हा झाले आता कळवळते बाई..*

 

हे शृंखला तोडणे फार महत्वाचे आहे. कुसुमाग्रज यांनी एके ठिकाणी सर्वात मधुर स्वर शृंखला खळखळा तुटण्याचा आहे असे म्हटले आहे. तो मधुर स्वर घेऊन गझलनंदा यांची गझल वाटचाल करतांना दिसते.

 

बाईकडे सृजनशीलता असूनही तिच्यावर बाईपणाचे ओझे लादले जाते ते निर्विवादपणे चुकीचे आहे. वास्तविक आपल्या रक्तामांसातून जिवाला जन्म देणे हे बाईचे बलस्थान आहे. पण पुरुषप्रधानतेने त्यालाच कमजोरी मानण्याचे स्वार्थी राजकारण , समाजकारण , कुटुंबकारण पुढे रेटले. ‘ न स्त्री-स्वातंत्र्यम् अर्हती ‘ या आदेशाने प्राचीन काळापासूनच स्त्रीचे ऐहिक जीवन बांधले गेले . तर पारमार्थिक क्षेत्रामध्ये ती पापयोनी ठरवली गेली . पती जिवंत असल्यास त्याची सेवा आणि नसल्यास त्याची स्मृती हाच स्त्रीच्या परमार्थाचा मार्ग शतकानुशतके गृहीत धरला होता. स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोनच अमानवी स्वरूपाचा होता आणि त्याच वेळी तिला जन्मदात्री संबोधून तिची पूजा करण्याचा प्रकारही सुरू राहिला. जेणे करून तिचे शोषणाकडे लक्ष जाऊ नये , वा स्वतंत्र माणूस म्हणून तिने स्वतःचा विचारच करू नये.

 

गौतम ऋषींची पत्नी अहिल्या, पांडवांची पत्नी द्रौपदी, रामाची पत्नी सीता, हरिश्चंद्राची पत्नी तारा आणि रावणाची पत्नी मंदोदरी यांना पंचकन्या म्हणून ओळखले जाते. ‘पंचकन्या स्मरे नित्यम ‘ म्हणत त्यांना प्रात:स्मरणीय मानले गेले. वास्तविक या सर्व स्त्रियांनी स्मृतिकाळापासून स्त्रियांवर लावलेल्या निकषांचे तंतोतंत पालन केले आहे. आपली होणारी अवहेलना त्यांनी कमालीच्या सोशिकपणे सहन केली आहे. याच विषयांवर कविता लिहून प्रा .सुनंदा पाटील यांचा यापूर्वी *” मी शिळा होणार नाही “* हा काव्यसंग्रह आलेला आहे . मराठीचे जेष्ठ समीक्षक साहित्यिक डॉ. द . भि . कुलकर्णी यांनी ” भारतीय आदिबंधाला आव्हान देणारी कविता ” म्हणून गौरविले आहे. ज्ञानेश्वरांपासून सर्व संतांनी स्त्रियांना आत्मोद्धाराचा मार्ग मोकळा करून दिला. ज्योतिबा -सावित्री यांनी तो व्यापक व कालसुसंगत करण्याचा प्रयत्न केला. स्त्रीकडे माणूस म्हणून बघावे हा आग्रह गझलनंदा यांच्या गझलेत आहे. चुकीच्या रूढी – परंपराबाबत त्यांनी काही प्रश्न उभे केले आहेत. तर काही बाबी अधोरेखित केल्या आहेत.

 

” *मीच राधा कृष्ण मी झालेच मीरा*

*श्वास माझा गीत गाई सावळ्याचे..*

 

*माझ्याच सावलीचा जो गाव पाहिला मी*

*झाला मला तिथेही मज्जाव पाहिला मी..*

 

हे जसे गझलनंदा म्हणतात तसेच,

 

*त्यागासाठी नाव जानकी सदैव येतेओठावरती*

*जिच्या नशिबी चिरा न पणती सती उर्मिला कुणा न दिसते..*

 

*तू कधी पार्वती, तूच लक्ष्मी मुली*

*नेमकी ‘ स्त्री ‘ नसे का घरण्यातली..*

 

असं सांगत उर्मिलेचे , स्त्रीचे दुर्लक्षित पण महत्वाचे स्थान अधोरेखित केले आहे. आपल्या देहावरही स्त्रीला मालकी ठेवू दिली नाही त्यामुळे तिचा कोंडमारा झाला. गझलनंदा यांनी तो टोकदार पणे मांडला आहे.

 

*”का देहही नसावा माझ्याच मालकीचा*

*शामेस शाप होता पाचात वाटणीचा..*

 

*ते द्युत खेळणारे कौंतेय पाच होते*

*तेथे बळी ठरावी शामाच सोंगट्यांची..*

 

रांधा ,वाढा , उष्टी काढा आणि वंश वाढवा एवढ्याच मर्यादेत स्त्रीचे परंपरेने खच्चीकरण केले. तिला घर मिळालं ते कायम काचेसारखं मिळालं. अर्थात काचेसारखं पारदर्शक नाही तर तडा जाण्याची, खळकन तुटण्याची भीती असणारच. हे सांगताना त्या निरनिराळ्या शेरांत म्हणतात,

 

*येथे परंपरांची अजुनी खुली न दारे*

*बसता चुलीपुढे मी मज जाळतील कोणी..*

 

*पौबारा म्हणतानाही नारीवर नजर कुणाची*

*फेडाया वस्त्रे केवळ द्यूतातच फासा होता..*

 

*लाकडाचे दार होते लावलेले*

*भिंत काचेचीच आहे पण घराची…*

 

*खाट दिसते रिकामी रडे माजघर*

*विहिर भरली पुन्हा काय शेतातली ?*

 

वैधव्य वा एकटेपण म्हणजे काहीतरी स्त्रीनेच केलेला मोठा गुन्हा आहे अशी विकृत समाजमानसिकता आहे. पारंपरिक सणही तिच्यापुढे प्रश्न उभे करतात. त्यामुळेच गझलनंदा यांच्या गझलेतून काही प्रश्न उभे केलेले दिसतात.

 

*आयुष्याला कुठे कुठे मी ठिगळे लावू ?*

*भाळावरची रेघ उसवली शिवल्यानंतर…*

 

*श्वेत भाळाला किती असतात शंका?*

*साजरा दसरा करू की मी दिवाळी?…*

 

*फासला होता कपाळी रंग माझ्या*

*वाढले ना काम कुंकू शोधण्याचे..*

 

*विरहामध्ये साकळलेल्या आयुष्याचे काय करू मी ?*

*गेली वर्षे या उरलेल्या आयुष्याचे काय करू मी ?.…*

 

*वैधव्याचे दान मिळाले*

*सप्तपदीचा धुरकट जागर..*

 

*पांढऱ्या वस्त्रास माझ्या डाग छोटा लागला**

*चावडीवर काल चर्चा खूप त्याची रंगली…*

 

*किती काळजी जातानाही ठेव म्हणाला कुंकू कायम*

*ललाटरेषा झाकायाचे साधन आहे लालच कुंकू..*

 

स्त्रीचे परंपरेत जखडलेपण अशा प्रभावीपणे त्या मांडतात. साकळलेल्या आयुष्याचे काय करायचे हा प्रश्न मांडून

तिच्या व्यक्तिगत, कौंटुंबिक , सामाजिक दुःखाला आवाज देतात. त्या काही शेरांतून लिहितात,

 

*स्त्री प्रश्नाचे उत्तर होते सायंकाळी*

*सकाळ होता पुन्हा नव्याने प्रश्न भेटतो..*

 

*लाभते पक्षास जोडी, भेटतो प्राण्यास साथी*

*एकटेपण शाप आहे जन्म स्त्रीचा का निराळा*

 

*हृदयी कळा उराव्या ही काळजात लेणी*

*बाईस लाभलेली ही वारशात लेणी…*

 

*जन्म कारावास माझा शृंखला बांधून पायी*

*जन्म का कैद्यास देऊ ती जरी मुलगीच होती …*

 

*सरणावरी मज लाभल्या गोष्टी हव्या ज्या वाटल्या*

*प्रेतास साडी लाल अन् कुंकू नवे भांगातले…*

 

गझलनंदा यांची गझल स्पष्टपणे म्हणते, तुमची पंचारती तुम्ही ओवाळून घ्या. माझी मंद तेवती समई मला प्रकाशमान करण्यास सक्षम आहे. सर्व आघाड्यांवर लढून स्त्री यशस्वी होते पण घरात मात्र तिच्या आसवांनी दुःखाच्या घागरी भारतातच. माणूसकीच्या दिखाऊ व स्वार्थीपणाची त्यांना चीड आहे. त्यांचे पुढील शेर ते स्पष्ट करतात.

 

*तुम्हीच ओवाळून घ्या तुमच्या पुढे पंचारती*

*मी लावली तेजाळती समई जुनी माझ्या घरी*

 

*कित्येक युद्धे जिंकिली होती तिने समरांगणी*

*रात्रीतुनी भरती घरी का आसवांच्या घागरी..*

 

*फुलावे वाटले होते कळीलाही गुलाबाच्या*

*विचाराने झुरत बसली नजर पाहून काट्याची…*

 

*गाठ सुटली रेशमाच्या शालजोडीची*

*घोंगडी करते रफू नाजूक शेल्यावर..*

 

*पैंजणांच्या मिषे प्रेम द्याया तिला**

*आज पायामध्ये साखळी घातली..*

 

*माझ्या जुन्या व्रणांचा मी त्रास काय सांगू ?*

*घरच्याच माणसांचा विश्वास काय सांगू ?…*

 

*शेळीस बांधलेले खुंटीस एकटीला*

*वस्तीत लांडग्यांचा झाला सुकाळ आहे…*

 

*वासनेचे पीक हा अपवाद होता*

*पाहिले होते मणी माळेत सारे.*

 

*लाज सांभाळून जगणे दिव्य आहे*

*झाकली संवेदना वस्त्रात माझी..*

 

*माणसातल्या माणुसकीचा प्रत्यय आला मजला सत्वर*

*डोळे पुसण्या जो तो आतुर पदर नव्याने सावरला मी..*

 

*भंगल्या स्वप्नांसवे का मी उद्याचे स्वप्न पाहू ?*

*पाहते दिवसाउजेडी वासनेचा रंग काळा..*

 

पैंजणांचे साखळदंड होणे , डोळे पुसण्याच्या निमित्ताने पदराला हात घालू पाहणारी विकारी वासनीवृत्ती हा व असा अन्याय अधोरेखित करून त्यावर उपायही शोधताना गझलनंदा यांच्या गझला दिसतात व स्त्री शक्तीचे महत्वही अधोरेखित करतात. स्त्रीला दुय्यम मानणाऱ्या संकुचित सनातनी विचारांविरोधात ठामपणे लढण्याचा आशावाद इथे आहे.

 

*जेथे सनातन्यांनी मरणे कठीण केले*

*तेथे जगावयाचा माझा विचार आहे..*

 

*” सांग रामाला नको सीतेस टाकू*

*जानकी येथे पुन्हा जळणार नाही*

 

*पडता पडता सावरलेली चढून गेले चढण जराशी*

*शिखराचा मज ध्यास लागला कधीच मीही ढळले नाही..*

 

हा सनातन्याविरोधी ठाम लढण्याचा संकल्प , सीतेची पुनरावृत्ती न होणे आणि शिखर सर करण्याचा ध्यास हा फार मोठा आशादायक विचार मराठी गझलेत गझलनंदा यांनी मांडला आहे. एकटीने राहण्याची याची खात्री त्या देतात,

 

*ऊर्मिलेशी बोलले कित्येकदा मी*

*एकटीने राहणे नाही नव्हाळी…*

 

*नशिबात एकटीचा होता प्रवास माझ्या*

*स्वीकारले कधी ना जगणे उदासवाणे…*

 

*कुंकवाच्या संपण्याने फारसे बिघडत नसावे*

*रिक्त जागेच्या ठिकाणी घे सुपारी कनवटीला…*

 

स्त्रीवर अन्याय करण्याची विकृत परंपराच आहे . पण आता पणतीची सहनशीलता मशालीत रुपांतरित झाली आहे असे त्या सांगतात. मी मातीची असले तरी ठिसूळ नाही. दुःखाला उकळी फुटणार हे उघड आहे. म्हणून ती मनावर झाकणी ठेवू पाहते आहे. मन मोकळं होत असताना त्याला झाकून घेणं अवघड असते. पण गझलनंदा यांची गझल ते करते.

 

*अन्यायाला नावच नव्हते परंपरेच्या गावी*

*पणती आता मशाल बनली म्हणून का घाबरता ?….*

 

*मी जरी बनली अशी नुसत्याच मातीची*

*लागले धक्के तरी ना मोडुनी जावी…*

 

*दुःख सांभाळून घेते साचलेली पापणी*

*वाफ अडवाया मनावर एक ठेवू झाकणी..*

 

स्त्रीवर कायम दुय्यमपण लादू पाहणाऱ्यांना गझलनंदा तिची सृजनशीलता हेच नवनिर्मितीचं मांगल्यरूप आहे असं सांगतात. स्त्रीचं गर्भी असणं हीच उद्याच्या जगाच्या अस्तित्वाची पूर्वअट आहे. त्या म्हणतात,

 

*हे माऊली मुलीला गर्भात ठेव तू*

*आहे भविष्य गर्भी सांगायला हवे..*

 

*आई म्हणते बरेच झाले मुलगी झाली*

*तिच्या पित्याला किमान आता बाई कळली..*

 

पणती, चांदणी या प्रतिमा बाजूला सारून सूर्य झाल्याचा प्रखर अभिमान इथे व्यक्त होतो. ती पायधूळ नाही. समाज काहीही विशेषणे लावून खच्चीकरण करत असला तरी बाई म्हणून ती ठामपणे उभी आहे. तिला दुःखाची वाफ करून खळखळून हसायचे आहे.

 

*मीच झाले सूर्य हा तेजाळलेला*

*का जपावे हे दिवे मी चांदण्यांचे..*

 

*मी धुळीची रेघ नाही*

*अंबराचा बाज आहे.*

 

*कुणी म्हणावे देवी, दासी, सदैव मादी*

*बाई म्हणुनी ठाम उभी मी जगण्यासाठी..*

 

*दुःखाचीही वाफ व्हायला उन्हात जाते*

*अखेरचे मी रडून घेते हसण्यासाठी…*

 

हे सगळे पाहिल्यावर त्यांच्या सक्षमतेमागे त्यांची शुद्ध जीवननिष्ठा दिसून येते.

 

इथल्या व्यवस्थेने स्त्रीला नेहमीच दुय्यम मानले. लहानपणी पित्याने , तरुणपणी पतीने आणि म्हातारपणी पुत्राने रक्षण करावे असे स्मृतीकारांनी सांगितले आहे. स्त्री ही वस्तू असून तिला संरक्षणाची गरज आहे असे यात गृहीत धरले आहे. एकीकडे गृहिणी , सखी , माता , पतिव्रता अशा मोठाल्या पदव्या तिला बहाल केल्या. आणि दुसरीकडे तिला स्वतःचे व्यक्तिमत्त्व नसून ती पुरूषाच्या आधारेच ओळखली जाईल अशी परिस्थिती निर्माण केली. पतीला परमेश्वर मानण्यातच तिच्या जन्माची सार्थकता आहे. त्याशिवाय तिला मोक्ष प्राप्तीचे दुसरे साधन नाही असे बजावून ठेवले गेले. आणि तिची पद्धतशीर समाजमान्य होरपळ सुरू केली. ही होरपळ गझलनंदा यांच्या गझलांतून प्रभावीपणे व्यक्त होते. ही होरपळ कौटुंबिक, सामाजिक पातळीवरचे दाखले देत त्या स्पष्ट करतात. त्याचे काही शेर असे आहेत,

 

*मला पाहून वहिनीने अचानक दार लावावे*

*कधीची भोवते आहे घराला चूक भावाची..*

 

*ओठ शिवावे कसे तिला हे कधीच कळले*

*मनात नसले तरी जरासे बोलत जा तू..*

 

*अंघोळीला बसले थोडे अश्रू गळले*

*नकोच होते दुसरे पाणी न्हाण्यासाठी*

 

*इथे वेदना नद्या जाहल्या तिच्या व्यथांच्या*

*तरी न भरला स्त्री दुःखाचा सागर येथे..*

 

*मी काल सावलीला सांगून ठेवलेले*

*पायातळीच माझ्या तू थांब ना जराशी ..*

 

*स्पर्शामध्ये किती सोसली विटंबनेची धगधग ज्वाला*

*देह कोळसा होतानाही कुटाळकीचा सूर न सरला..*

 

*नाही कधीच केले हल्ले जनावरांनी*

*थोडी भितीच आहे येथील सोयऱ्यांची..*

 

*परजून शस्त्र होते डोळ्यात वासनांचे*

*मी ओळखून गेले हा एक वार आहे..*

 

*वाचवाना कळी बोलले रोपटे*

*ओल सरली असे काय नात्यातली..*

 

एकदा सासरी धाडले की माहेर पोरकं होणं, ओठ शिवून जगणं, गरम आसवांनी न्हाणे व्हावे एवढे दुःख , वेदनांच्या नद्या वाहत होत्या पण तरीही दुःखाचा सागर भरत नाही ही वेदना, सावलीला पायाखाली थांबून थोडा विसावा दे असे केलेले आर्जव आणि योनीशुचितेच्या पुरुषी अहंकारातून जन्माला आलेल्या कल्पनेतून स्त्रीच्या वाट्याला येणारी कुटाळकी ही सारी होरपळ या गझलांतून दिसून येते. स्त्री देहाचा वैषयिक विचार करणाऱ्या विकृतीचा धिक्कार करण्यासाठी अनेक शतकांपूर्वी अक्कामहादेवींनी वस्त्रांचा त्याग केला होता. स्त्रीचे शोषण करणारी आणि तिला दुय्यमपणाच्या दुर्बल स्थानावर खिळवून ठेवणारी पुरुष प्रधान समाजरचना स्त्रीदेहाकडे ज्या दृष्टीने आणि वृत्तीने पाहते , तिला मुळातून नाकारणारी भूमिका संत साहित्यातूनही आपल्याला दिसून येते. आज एकविसाव्या शतकातही त्यात बदल झालेला नाही हे गझलनंदा यांची गझल अधोरेखित करते.

 

ही सारी होरपळ सोसूनही स्त्रीकडे निसर्गदत्त असलेले ममत्व, प्रेमभाव गझलनंदा यांची गझल प्रभावीपणे मांडते. पोटाची भूक आणि मनाची आग आईच मिटवू शकते हे तिचं सांगणं आहे.

 

*ओठांमधली साखर होते आई*

*भूक लागता भाकर होते आई*

 

*आयुष्याचे काटे खुपती मजला*

*मऊसूतसे अस्तर होते आई..*

 

*खरा सहारा केवळ आई*

*कुशीत घेतेस घाबरल्यावर.*

 

*काजळ निथळे डोळ्यामधले*

*दुःख मनाचे सांगितल्यावर..*

 

*जाळ झाला कसा रांधता वाढता*

*फक्त आई बघे आग देहातली…*

 

स्त्री दुःखाची दरी ओलांडून गझलनंदा यांची लेखणी विप्रलंभ शृंगाराकडे वळते . त्यांना प्रेम हा विषय वर्ज्य नाही . स्त्री सुलभ प्रेमभावना तीही अतिशय हळूवारपणे , श्वासांनी , ओठांनी लिहून जातात.

 

प्रेमभावना व्यक्त करताना त्या लिहितात, तुझे ओठ ओठी असणं हेच एक सुंदर गाणं आहे. तू भेटलास की मी गंधाळते , वेगळा मोगरा लागतच नाही. पहाटेच्या दवाप्रमाणे ओठावरचा मध चाखावा, पावसाचे चिंब करणारे क्षण तिला आठवत आहेत. थोडी कुरबुर झाली तरी ते भांडण गळामिठीने मिटवणारी सखी या गझलेत भेटते. ही सखी प्रेममयी होऊन भेटते आणि ते सुंदर , हळुवारपणे शब्दबद्धही करते.

 

*मला सांगायचे होते तुला जे काल ओठांनी*

*कसा ओठांवरी लिहिला तराणा लाल ओठांनी..*

 

*कुणी कुणाच्या गालावरचा गुलाब व्हावे*

*पहाट होता ओठांवरचा मध चाखावे…*

 

*मीही भिजून यावे तूही पुन्हा भिजावे*

*ओलेच पावसाचे क्षण रोज आठवावे..*

 

*हे ओठ का म्हणू मी प्रेमामधील गाणे*

*ओठी जुळून आले शब्दांविना तराणे..*

 

*आज पहाटे ओठी घेते ओठामधले तुझे तराणे*

*कसे गायचे म्हणून आता तुझे असावे किती बहाणे..*

 

*तुला वाटते मोगरा माळते मी*

*तुला पाहुनी आत गंधाळते मी*

 

*एवढे मी मागते मुरलीधराला*

*बासरी करशील का ओठात! माझी ?..*

 

*ये सख्या देहात तू ही रात माझी*

*आज भिजण्या मागते बरसात माझी..*

 

*ओठांनी मी रंग लावला रात्री ओठावरती*

*त्या रंगाची फुले उमलली आता गालावरती..*

 

*मी वैराचे दोर कापले*

*गळामिठीचा करून वापर..*

 

*कशास घेतलेस तू मिटून ओठ हे*

*अबोल आज जाहले रुसून ओठ हे*

 

*कुणी न पाहिले असे कुठे न आरसा*

*म्हणून घे हळूच तू पुसून ओठ हे*

 

हे प्रेम कोमलतेतून आणि जबाबदारीच्या भानातून येत असतं. गझलनंदा यांच्या गझलेत ते ठायी ठायी दिसतं. ती केवळ शब्दांनी दुखावते हे लक्षात घेऊन शब्द जपून वापरा असे ती सांगते. तसेच जबाबदारीचं ओझं पेलत पेलत इतरांसाठीच जगत आले. स्वतःसाठी जगणंच राहून गेलं ही खंतही इथे आहे.

 

*स्त्री शब्दांनी जखमी होते काही लागत नाही*

*शस्त्र कशाला तिला मारण्या आज दुजे वापरता..*

 

*माझ्यासाठी जगावयाचा प्रश्नच उरतो*

*दुसऱ्यांसाठी पुरेपुरसे जगून झाले..*

 

गझलनंदा यांच्या गझलेला समतेची आस आहे. विचारांची . दरी विचारांनीच भरावी लागते. कुंकू महत्वाचं असतं, पण म्हणून हळदीला लाचार का म्हणावं ? (खरंतर हळदी पासूनच कुंकू तयार केलं जातं.) हाताची मेंदी सुंदर असतेच असते, पण त्याखालील कर्तुत्वाच्या रेषा दुर्लक्षित करून कसे चालेल ?आणि बाईंने कर्तृत्वाने घर उभारले तरी ते तिचे मानलें जात नाही. म्हणूनच समतेचे भाषण करून समता येत नसते तर ती प्रस्थापित करावी लागते. हे ही गझल ठामपणे सांगते. स्त्रीबद्दल ओकले जाणारे गरळ अतिशय प्रखर पणे गझलनंदा मांडून जातात . वानगीदाखल हे शेर बघा …

 

*जरासा पूल बांधावा विचारांचा घरामध्ये*

*तुझ्या माझ्यात असलेली दरी रुंदावली आता*

 

*घरट्याच्या तालावरती बाईची फरफट सारी*

*कुंकाच्या किंचित खाली का हळदीची लाचारी..*

 

*घर दोघांचे स्वप्नामधले रोज बघावे सायंकाळी*

*स्वप्न भंगता पुन्हा सकाळी नव्या व्यथांचे दार वाजते..*

 

*मेंदीमध्ये तळहाताच्या रेषा लपल्या*

*कर्तुत्त्वाची उदास गाथा कुणास सांगू ?*

 

*चल चिमणीच्या घरट्यासाठी वळचण देऊ*

*माझे घरटे माझे नाही मीच जाणते..*

 

*सांभाळले घराला जैसे जमेल तैसे*

*मज शेवटी कळाले मी मात्र भार आहे..*

 

*भावास सोबतीला घेऊन चालले मी*

*पुसले मला जगाने हा कोण यार आहे?*

 

*समतेचे भाषण झाले अन् कितीक पडल्या टाळ्या*

*बाईच्या आयुष्याचे पण कोडे सुटले नाही..*

 

एकूण काय तर गझलनंदा यांची गझल म्हणजे मराठी गझलेतील स्त्री जाणिवांचा एक महत्वाचा उद्गार आहे यात शंका नाही. हा उद्गार प्रभावीपणे काढण्यासाठी त्यांना गझल जवळची वाटते. गझलच उपाय वाटतो हेही महत्वाचे आहे. एका गझलेत त्या म्हणतात,

 

*कोणालाही फुटला नाही कधीच पाझर येथे*

*स्त्री दुःखाच्या काळोखाचा सदैव वावर येथे..*

 

*कुणी हिणवती अबला म्हणुनी सबल अस्मिता*

*डोळ्या मधुनी आज निथळते अविरत घागर येथे..*

 

*बापाचेही घर दुसऱ्याचे तिला नसावे घरटे*

*लेक सुनेच्या घरी न झाली माता स्थावर येथे..*

 

*शक्ती म्हणुनी जगावयाचे जगात मजला आहे*

*उपाय आहे गझलेचा मज दुसरा यावर येथे…*

 

गझलनंदा या मराठी गझलविश्वात त्यांच्या लेखनामुळे एक मान्यवर, कसदार गझलकारा म्हणून ओळखल्या जातात. त्या जरी म्हणत असल्या,

.

*कुणी लिहावे माझ्यावरती इतकी ओळख नाही*

*मी लिहिलेले पुस्तक माझे मीच वाचुनी गेले…*

 

हे अर्धसत्य आहे. कारण त्यांचा स्वभाव फारसा पुढे पुढे करण्याचा नाही हे खरे. पण त्यांच्या गझलांचे वाचक सर्वदूर आहेत. कारण त्यांचं नाव मराठी गझलेत आदराने घेतलं जातं. त्यांनी दादांचा वसा व वारसा घेऊन मराठी गझल पुढे नेली आहे व नेत आहेत. अनेक नव्या लिहिणाऱ्याना त्या मार्गदर्शन करत असतात. कोणावरही लिहिण्यासाठी त्याची ओळख नव्हे तर लिहिण्यातील शब्दांनी करून दिलेली ओळख महत्वाची असते. गझलनंदा यांचा हा स्त्री उद्गारही मराठी गझलेतील एक वेगळी शक्ती म्हणूनच ओळखला जाईल यात शंका नाही. कारण हा उद्गार अस्सल आहे, सशक्त आहे. समता प्रस्थापनेची आस असणारा आहे. लेखन हा शरीर व मनाला व्यापून टाकणारा अनुभव असतो असे म्हणतात. हे लेखन वाचल्यावर त्यांची अनुभूती आपल्याला वाचक म्हणूनही येते.

प्रतिक्रिया व्यक्त करा