महाराष्ट्रातील नव्हे देशातील प्रत्येक सनदी व राजपत्रित अधिकाऱ्यांची काम करण्याची पद्धती वेगवेगळी असते. मिशन आयएएसच्या निमित्ताने अनेक सनदी व राजपत्रित अधिकाऱ्यांशी भेटण्याचा मला योग आला. सध्या चर्चेत असलेले तुकाराम मुंढे जेव्हा नवी मुंबई येथे महानगरपालिका आयुक्त होते तेव्हा त्यांनी कॉफी विथ कमिश्नर असा कार्यक्रम आयोजित केला होता. त्या माध्यमातून ते नवी मुंबई महानगरपालिकेतील वेगवेगळ्या उद्यानात जायचे. तिथे लोकांना भेटायचे .त्यांचे प्रश्न समजावून घ्यायचे व ते सोडविण्याचा प्रयत्न करायचे. हा एक लोकाभिमुख प्रयत्न होता.
असाच एक चांगला प्रयत्न आमच्या अमरावती शहरांमध्ये अमरावती महानगरपालिकेच्या नवीनच आलेल्या आयुक्त डॉ. सौम्या शर्मा चांडक यांनी राबविला आहे. सौम्या शर्मा मॅडमनी अंगीकारलेला मार्ग हा लोकाभिमुख आहे. त्या रुजू झाल्यापासून त्यांनी अमरावती शहरातील वेगवेगळ्या भागांमध्ये भेटी देऊन अधिकाऱ्यांना सूचना देऊन व तेथील नागरिकांची संवाद साधून प्रशासन लोकांपर्यंत कसे पोहोचू शकेल याचा एक आदर्श घालून दिला आहे.
सकाळी लवकर उठणे व त्या त्या नगरात जाणे आणि तिथल्या काय समस्या आहेत त्या समजावून घेणे .संबंधित अधिकाऱ्यांना संपर्क साधून या समस्यांचे निराकरण करणे. संबंधित अधिकाऱ्यांना तशा सूचना करणे हे यातून साध्य केले जाते.
अमरावतीला काही महिन्यांपूर्वी अमरावती महानगरपालिकेमध्ये आयुक्त म्हणून आलेल्या डॉ.सौम्या शर्मा चांडक यांनी अल्पावधीमध्ये लोकाभिमुख उपक्रम राबवून उत्कृष्ट कार्य केलेले आहे. अनेक वेळा लोक सनदी किंवा राजपत्रीत अधिकाऱ्यांना भेटायला जातात. अनेक वेळा अधिकारी मीटिंगमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये किंवा दौ-यावर असतात . पण हा सकाळचा मार्ग निवडल्यामुळे बऱ्याच लोकांना सरळ आयुक्तांना भेटता येते व त्या त्या भागातील समस्या त्यांना सांगता येतात.
एक उपक्रमशील आयएएस अधिकारी म्हणून मनपा आयुक्तांचा उल्लेख करावा लागेल. खरं म्हणजे महाराष्ट्रातील उर्वरित मनपा आयुक्तांनी देखील त्यांच्या या उपक्रमाचे अनुकरण करायला हरकत नाही इतका तो सुंदर आहे.
त्यांनी अलीकडेच राबविलेला उपक्रम तर खूपच सुंदर आहे. दर रविवारी नागरिकांनी सकाळी चौकामध्ये एकत्र यायचे. विविध उपक्रम राबवायचे .योगासन.
हास्यासन .गाणे .धावणे अशा कितीतरी गोष्टींचा त्यात समावेश आहे. या उपक्रमाला अमरावतीकरांनी उचलून धरले आहे. यात सहभागी होणारे लोक येणाऱ्या रविवारची वाट पाहत असतात. अधिकारी लोकाभिमुख होण्याचा हा एक चांगला मार्ग आहे. लोक एकत्र येतात. अधिकारी एकत्र येतात आणि त्यातूनच बऱ्याचशा समस्यांचे निराकरण होते. अनेक वेळा प्रत्येकाचेच काम होते असे नाही. पण अधिकारी आपल्याशी बोलला .आपली विचारपूस केली. आपला कागद ठेवून घेतला म्हणजे समोरच्या व्यक्तीला बरेचसे समाधान मिळते. ते समाधान लोकांना देण्यामध्ये आमच्या मनपायुक्त सौम्या शर्मा मॅडम यशस्वी ठरलेल्या आहेत.
महानगरपालिकेचा आयुक्त म्हणजे एक तारेवरची कसरतच असते. त्यामुळे आयएएस अधिकारी मनपा आयुक्त किंवा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर जायला फारसे उत्सूक नसतात .कारण तिथे त्यांना लोकप्रतिनिधींना पदाधिकाऱ्यांना नगरसेवकांना जिल्हा परिषद सदस्यांना व पदाधिकाऱ्यांना प्रत्यक्ष सामना करावा लागतो. महाराष्ट्रातील बऱ्याचश्या महानगरपालिका ह्यामुळे वादग्रस्त झालेल्या आहेत. एखाद्या चांगले काम केले तरी त्याला योग्य तो प्रतिसाद मिळणे गरजेचे असते. अनेकवेळा चांगले काम करूनही लोकप्रतिनिधींच्या रोषाला बळी पडावे लागते. ज्येष्ठ सनदी अधिकारी श्री तुकाराम मुंढे हे याचे मूर्तीमंत उदाहरण आहे.
सौम्या शर्मा मॅडम अमरावतीला रुजू झाल्यापासून त्यांनी कामाचा तडाखा लावला आणि तो अजूनही कायम आहे. म्हणजे त्यांचा उत्साह अजून टिकून आहे आणि तो टिकून राहणारही आहे .अनेक वेळा अधिकारी चांगले उपक्रम राबवतात. काही उपक्रमांची लोक दखल घेतात .काही उपक्रम मात्र लोकांपेक्षा पदाधिकाऱ्यांना आवडत नाहीत .अनेक वेळा मग अधिकाऱ्यालाही असं वाटते की आपण उगीचच हे उपक्रम राबवित आहोत. सौम्या शर्माच्या बाबतीत मात्र असे झाले नाही. त्यांचा प्रत्येकच उपक्रम समाजाने उचलून धरला आहे.
कोणताही सनदी किंवा राजपत्रित अधिकारी जेव्हा काम करतो तेव्हा प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. तशा त्यांच्या कामालाही असतात .एखादा उपक्रम लोकांना आवडतो .तर त्याचवेळी दुसऱ्या लोकांना तो आवडत नाही .अतिक्रमणाच्या बाबतीत असेच होते. गावातील अतिक्रमण दूर करणे हे मनपा आयुक्तांचं काम आहे .पण अतिक्रमण दूर करायला गेले तर मग लोकप्रतिनिधी पदाधिकारी सदस्य यांचे फोन सुरू होतात .एकीकडे अतिक्रमणामुळे लोकांना होणारा त्रास तर दुसरीकडे अतिक्रमण तोडल्यामुळे त्या बाधित लोकांना येणाऱ्या अडचणी व त्यांचे पुनर्वसन हे देखील तेवढेच महत्त्वाचे असते आणि हा समतोल साधने गरजेचेही असते.
सौम्या शर्मा मॅडम यांनी अमरावती महानगरपालिकेतर्फे युवकांसाठी युवतींसाठी श्री संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन मध्ये एक दिवसाची स्पर्धा परीक्षा कार्यशाळा घेऊन स्पर्धा परीक्षेला बसणाऱ्या मुलांना प्रोत्साहन दिले आहे.महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण विभागातर्फे अमरावतीच्या श्री संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनामध्ये महिलांसाठी उपक्रम राबवून एक नवा पायंडा पाडला. त्याचबरोबर अमरावतीचा पक्षी कोणता यासाठी लोकांमध्ये जनजागृती केली आणि लोकांच्या संमतीने अमरावतीचा पक्षी ठरवला. आपण जेव्हा लोकांना मान देतो. तेव्हा लोक त्याला अनुकूल प्रतिसाद देतात .हे सूत्र आयुक्त मॅडमला गवसले आहे. आणि म्हणून वेगवेगळ्या उपक्रमात त्यांनी लोकांना सहभागी करून घेतलेले आहे.
सौम्या शर्मा मॅडम यांचा माझा परिचय नागपूर विभागाच्या विभागीय आयुक्त श्रीमती विजयालक्ष्मी बिद्री यांच्यामार्फत नागपूरला त्या जिल्हा परिषदेला मुख्य कार्यकारी अधिकारी असताना झाला होता. अमरावतीला आल्यावर आमची प्रत्यक्ष भेट झाली नाही. पण चांगला आयुक्त कसा असतो याचे एक उदाहरण म्हणजे त्यांनी त्यांच्या स्वीय सहाय्यकामार्फत मला निरोप पाठवला .मिशन आयएएस त्यांना समजावून घ्यायचे आहे .त्यासाठी तो निरोप होता. आम्ही लवकरच भेटणार आहोत. आणि मिशन आयएएस अमरावती शहरासाठी कसे लागू करता येईल यासाठी विचार विनिमय करणार आहोत आणि मला खात्री आहे जो आयुक्त समाजाभिमुख असतो तो निश्चितच लोकांसाठी तर काम करतोच पण त्याला स्वतःला देखील मी चांगले काम केले आहे याचे जे समाधान मिळते ते शब्दातीत असते.
अमरावती शहराचा खरा विकास करू इच्छिणाऱ्या व त्या दृष्टिकोनातून सातत्याने अभिनव नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून त्याला गती देणाऱ्या सौम्या शर्मा मॅडम यांना हार्दिक शुभेच्छा.
प्रा. डॉ.नरेशचंद्र काठोळे
संचालक
मिशन आयएएस
अमरावती कॅम्प
9890967003
