You are currently viewing सावंतवाडीत आयुर्वेदिक उपकेंद्राला मंजुरीची गती

सावंतवाडीत आयुर्वेदिक उपकेंद्राला मंजुरीची गती

सावंतवाडीत आयुर्वेदिक उपकेंद्राला मंजुरीची गती; आमदार दीपक केसरकर व युवा रक्तदाता संघटनेच्या पाठपुराव्याला यश

सावंतवाडी :
सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात आयुर्वेदिक उपचार केंद्र सुरू करण्याच्या मागणीला अखेर गती मिळाली असून या उपक्रमासाठी आवश्यक मंजुरीची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. माजी शालेय शिक्षण मंत्री व सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे तसेच युवा रक्तदाता संघटनेच्या आग्रहामुळे हा महत्त्वाचा प्रस्ताव पुढे सरकला आहे.

अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान, दिल्ली येथे आमदार केसरकर यांनी 4 नोव्हेंबर 2025 रोजी पत्राद्वारे मांडलेला प्रस्ताव व नंतर केलेला नियमित पाठपुरावा याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. धारगळ येथील आयुर्वेद संस्थानाचे संचालक डॉ. प्रजापती यांनी माहिती देताना सांगितले की, सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात त्यांच्या संस्थानाचे उपकेंद्र सुरू करण्यास तातडीने मंजुरी देण्यात आली असून यामुळे रुग्णांना मोफत आयुर्वेदिक औषधोपचार उपलब्ध होणार आहेत.

आयुर्वेद संस्थानच्या चौथ्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. प्रजापती म्हणाले, “सिंधुदुर्ग जिल्ह्यातून येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी असल्याने स्थानिक पातळीवर सेवा उपलब्ध करणे गरजेचे होते. त्यामुळे सावंतवाडी रुग्णालयात डॉक्टर, फार्मासिस्ट व आवश्यक कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीसंबंधीचा प्रस्तावही सादर केला आहे. मंजुरी मिळाल्यानंतर करार प्रक्रिया पूर्ण करून केंद्र लवकरच सुरू केले जाईल.”

या उपक्रमासाठी सतत प्रयत्नशील राहिलेल्या युवा रक्तदाता संघटनेचे संस्थापक अध्यक्ष देव्या सूर्याजी तसेच धारगळ आयुर्वेद संस्थानात सेवेत असलेले भूमिपुत्र पंचकर्म थेरपिस्ट व शिवसेना शाखाप्रमुख गौरव कुडाळकर यांनीही महत्त्वपूर्ण पाठपुरावा केला आहे.

सावंतवाडी व परिसरातील नागरिकांसाठी हे केंद्र अत्यंत उपयुक्त ठरणार असून अनेक रुग्णांची गैरसोय दूर होण्यास मदत होणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा