शिवसेनेची वेंगुर्ले तालुका व शहर कार्यकारणी बरखास्त;
सचिन देसाई यांच्याकडे प्रभारीची जबाबदारी
सावंतवाडी –
शिवसेनेच्या वेंगुर्ले तालुक्यातील राजीनाम्यांच्या मालिकेनंतर संपूर्ण तालुका व शहर कार्यकारिणी बरखास्त करण्यात आल्याची माहिती जिल्हाप्रमुख संजू परब यांनी पत्रकार परिषदेत दिली. तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, उपजिल्हाप्रमुख सुहास कोळसुलकर आणि महिला तालुकाप्रमुख दिशा शेटकर यांनी दिलेल्या राजीनाम्यांनंतर हा निर्णय घेण्यात आला असून महिला पदाधिकाऱ्यांचे राजीनामेही स्वीकारण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, विद्यमान उपजिल्हाप्रमुख सचिन देसाई यांच्याकडे प्रभारी तालुकाप्रमुख पदाची जबाबदारी सोपविण्यात येणार असल्याचे परब यांनी सांगितले. जिल्हा परिषद निवडणुकीनंतर नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात येईल, असेही त्यांनी नमूद केले.
अलीकडेच तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर यांनी वैयक्तिक कारणास्तव पदाचा राजीनामा जिल्हाप्रमुखांकडे सुपूर्द केला होता. त्यानंतर सुहास कोळसुलकर, दिशा शेटकर तसेच युवती तालुकाप्रमुख योगिता कडुलकर यांनीही आपले राजीनामे दिले होते. या घडामोडींना पूर्णविराम देत जिल्हाप्रमुखांनी संपूर्ण कार्यकारिणी बरखास्त केल्याची घोषणा केली.
