*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री शोभा वागळे यांनी गझलकार रमण रणदिवे यांच्या केलेले गझल रसग्रहण*
रमण रणदिवे सर हे कवी, गझलकार, संगीतकार, गायक असून मुळचे सोलापूरचे असून सध्या पुण्यात राहतात. सरांनी लहानपणी नववीच्या वर्गात असताना गंमत म्हणून एक कविता लिहून ‘सकाळ’ ह्या वृत्तपत्रास पाठवली व संपादकांनी रविवारच्या पेपरात ती छापून आणली. तेव्हापासून कविता लिहिण्याचा सरांचा उत्साह वाढला आणि १९६५ पासून गीत, काव्य, गझल लेखन ते करू लागले. नंतर गझल सम्राट, भट साहेबांच्या मागदर्शनाने व सहवासाने त्यांची गझल पक्की होऊन गझल लेखनही परिपक्व झाले.
त्यांचे बरेच कविता संग्रह व बाकीची पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
त्यांना जवळ जवळ ५४ पुरस्कारांनीही सन्मानित केले आहे. त्यातले काही महत्त्वाचे पुरस्कार म्हणजे राज्य शासन, साहित्य परिषद, साहित्य सम्राट, जीवन गौरव काव्य पुरस्कार, गझल-दीप, गझल भूषण, गझल गौरव, पुणे रत्न इत्यादी.
सरांना चित्रपट गीते, अल्बमसाठीचे गीत लेखन इत्यादींसाठी काव्य जीवनगौरव पुरस्कारही प्राप्त झाले आहेत. २०१० साली सोलापूर येथे झालेल्या गझल संमेलनाचे त्यांनी अध्यक्षपद भूषविलेले आहे. विविध वृत्तपत्रातून त्यांचे आस्वादक समीक्षा लेखन ही प्रकाशित झाले आहे.
त्यांच्या अनेक रचना संगीतकार, गजानन वाटवे, यशवंत देव,भास्कर चंदावरकर, राम कदम, श्रीधर फडके, सलील कुलकर्णी ह्यांनी स्वरबध्द केल्या आहेत. तसेच गायक सुरेश वाडकर, रविंद्र साठे, गायिका वैशाली सामंत, रंजना जोगळेकर, अनुराधा मराठे इ. अनेक गायक/गायिकांनी रचना गायल्या ही आहेत.
सरांची आनंदकंद ही अक्षरगण वृत्तातली गझल मी रसग्रहणास घेतली आहे.
माणसाचे जीवन जगणे हे क्षणभंगुर असते. कायम स्वरुपी कुणी असत नाही. तो मग माणूस असो किंवा पशू पक्षी, वनस्पती अथवा जे काही सजीव आहे ते एक ना एक दिवस नाहीसे होणारच हे अंतिम सत्य आहे. तरी या क्षणभंगुर क्षणात जगणे कसे असावे हे प्रत्येकावर अवलंबून असते. अशाच आशयाची गझल आपण पाहुया :-
*गझल :-*
*क्षणभंगूर जगणे*
चिरकाल कोण येथे जगणे जगून गेला ?
ज्याला निरोप आला तो तो निघून गेला
कुठल्याच माणसाला कळले कधीच नाही
हलकेच प्राण-पक्षी केव्हा उडून गेला ?
प्रत्येक माणसाचे जगणे असेच असते
पाण्यावरी बुडबुडा आला,फुटून गेला
आले निघून गेले दुनियेत कैक सारे
कोणी हसून गेला,कोणी रडून गेला
रत्नाकराप्रमाणे असते अथांग जगणे
कोणी तरून गेला,कोणी बुडून गेला
कळला न जिंदगीचा कावा कधीच त्याला
नव्हतीच आग कोठे तरिही जळून गेला
मातीतल्या घटाची मातीत राख होते
कुंभारही अखेरी मातीमधून गेला
*–रमण रणदिवे*
9765810699
रसग्रहण :-
माणसाचा जन्म झाला की त्याचा जीवन प्रवास संपल्यावर मूत्यू होतच असतो. जन्म-मृत्यूच्या चक्राच्या नियमानुसार जन्मणारा कधी तरी मरणारच असतो.
‘क्षणभंगुर जगणे’ या गझलेचा मतलाच बघा :-
*चिरकाल कोण येथे जगणे जगून गेला?*
*ज्याला निरोप आला तो तो निघून गेला*
जन्मास आलेला कायम स्वरुपी कुणीच राहत नसतो. जीवन हे क्षणभंगुर असते. ज्याचा जीवन प्रवास संपतो तो निरोप घेऊन मृत्यूच्या अधीन जातो. चिरकाल किंवा अमरत्व घेऊन कुणी जगला आहे का? असा गझलकार प्रश्न विचारतात. म्हणजेच ज्याच्या जीवनाचा प्रवास संपलेला असतो, ज्याला मृत्यूचे बोलावणे येते, तो निरोप घेऊन मृत्यूच्या अधीन होणार हे निश्चित असते असे गझलकार मतल्यात सांगतात.
दुसरा शेर :-
*कुठल्याच माणसाला कळले कधीच नाही*
*हलकेच प्राण-पक्षी केव्हा उडून गेला ?*
माणसाचा मृत्यू हा विचित्रच असतो. ज्याचा मृत्यू होणार त्याला जरा सुद्धा कल्पना न देता हलकेच त्याच्या शरिरातला प्राण एका पक्षा सारखा उडून जातो. त्याचा श्वास कधी त्याला सोडून दूर गेला हे त्या माणसाला कळतही नाही.
इथे गझलकारास सांगायचं असेल की घरातून बाहेर गेलेला माणूस कधी कुठल्या अपघातात सापडेल व तो मृत्यूच्या आहारी जाईल ह्याची काही कुणी शाश्वती देऊ शकत नाही. कार, रेल्वे, विमान अपघात, तर कधी नुसते रस्त्यावरून चालताना सुद्धा पाठीमागून कुठल्या गाडीने धडक दिल्याने कोणत्या क्षणी मृत्यूची झडप पडेल काही सांगता येत नाही. माणसाचा श्वास शरिरातून कधी जाईल हे सांगणे कठीणच!
तिसरा शेर :-
*प्रत्येक माणसाचे जगणे असेच असते*
*पाण्यावरी बुडबुडा आला, फुटून गेला*
प्रत्येक माणसाचे जीवन हे एक प्रकारे पाण्याच्या बुडबुड्या प्रमाणेच असते. पाण्यावरचा बुडबुडा जरा मोठा होता होता पटकन फुटून जातो. त्याच प्रमाणे माणसाचे जगणे क्षणभंगुर असते. त्याचे अस्तित्व तेवढेच असते जेवढे पाण्यावरचा बुडबुडा. जन्मला, जगला नि बुडबुड्यासारखा फुटून गेला!
चौथा शेर :-
*आले निघून गेले दुनियेत कैक सारे*
*कोणी हसून गेला,कोणी रडून गेला*
जनसंख्या सतत वाढत आहे. कैक सारे जन्मतात. जीवन प्रवासात नेटाने पुढे जातात. काही जणांचा प्रवास सुखदायक होत असतो. त्यांचे जीवन सुख समृद्धीचे असल्याने ते समाधान व हास्य घेऊन जातात. तर काही जण जीवन प्रवासाच्या संघर्ष लढ्यात त्रस्त होऊन पिडीत व दु:खी झाल्याने रडून जातात. शेवटी सर्वांचेच जाणे हे ठरलेलेच आहे. हसून वा रडून!
पाचवा शेर :-
*रत्नाकराप्रमाणे असते अथांग जगणे*
*कोणी तरून गेला,कोणी बुडून गेला*
या शेरात माणसाच्या जीवन प्रवासाला गझलकाराने रत्नाकराची उपमा दिली आहे. जसा महासागर अफाट व अथांग असतो तशाच प्रमाणे माणसाचे जीवन असते. हा महासागर तारून जाणे ही सोपी गोष्ट नाही. माणसाचे अथांग जगणे म्हणजे माणसाने आयुष्याकडे एका मोजक्या दृष्टिकोनातून न पाहता, त्याकडे एक विशाल अत्यंत खोल व गूढ समुद्र आहे हे जाणूनच त्याचाही अंदाज घेऊन भरपूर अनुभव घेऊनच आगेकूच करायला हवी तरच त्या रत्नाकरातले (आयुष्यातली) मौल्यवान रत्ने
मिळवून तो समुद्र तारून जाऊ शकतो. अन्यथा ते शक्य झाले नाही तर गटांगळ्या खात बुडून मरणे निश्चित आहे असेच गझलकार सांगत आहेत असे वाटते.
सहावा शेर :-
*कळला न जिंदगीचा कावा कधीच त्याला*
*नव्हतीच आग कोठे तरिही जळून गेला*
माणसाचे आयुष्य सुखमय व्हायला पाहिजे तर त्याला जिंदगीचा कावा कळायला हवाच. माणसाच्या जीवनात अनेक अडथळे आणि समस्याही येत असतात. त्या सर्व शत्रूंना गनिमीकाव्याने, अत्यंत हुशारीने, प्रभावी युक्तीने
हाताळायला हवे. तरच त्याचा निभाव लागेल. नाहीतर त्यास मानसिक त्रास किंवा अपेक्षाभंग झाल्याने अथवा भावनांच्या तीव्र दाहाने, पश्चात्तापाने तो जाळून जाईल ह्यात शंकाच नाही. इथे आयुष्यातील त्रासांना आग अशी उपमा देल्याने अपेक्षाभंगाने निराश झालेल्या व्यक्तीला प्रत्यक्ष आग नसतानाही अपेक्षा पूर्ण न झाल्याने किंवा मानसिक तणावामुळे ‘जळल्यासारखे’ वाटते असेच गझलकार या शेरात सांगत असावे.
शेवटचा शेर :-
*मातीतल्या घटाची मातीत राख होते*
*कुंभारही अखेरी मातीमधून गेला*
या शेवटच्या शेरात गझलकार सांगतात की मातीपासून मडके बनवणारा कुंभाराचा घट मातीचा असतो आणि शेवटी त्या घटाची माती सूध्दा राख म्हणजे मातीच होते. त्याच प्रमाणे माणूस कितीही शक्तीशाली, महान किंवा श्रीमंत असला तरी शेवटी त्याचे शरीर पंचमहाभूतांपैकी एक असलेल्या मातीतच विलीन होते. जन्म – मृत्यूच्या चक्राचा नियम सर्वांना सारखाच लागू पडतो. त्या पाशातून कुणाचीच सुटका होत नसते. देह नश्वर आहे. तो हाडा मासाचा बनलेला असल्याने कायम टिकत नाही. जीवनातील ऐश्वर्य क्षणभंगुर आहे आणि देहाची अंतिम स्थिती माती आहे. मातीतून मडके बनवणारा कुंभार सुद्धा शेवटी मातीतच जातो. प्रत्येकाला शेवटी मातीमध्येच मिसळावे लागते, म्हणजे मृत्यू अटळ आहे. देहाचा अंत मातीमध्येच होतो हा एक नश्वरतेचा आणि विनम्रतेचा बोध आहे, जो कुंभाराच्या मातीपासून भांडे बनवण्याच्या प्रक्रियेतून जीवनाच्या अंतिम सत्याकडे म्हणजे मुत्यूकडेच इशारा करत आहे. मातीचा घट नी माणसाचे शरीर ही सुंदर रूपके गझलकारनी घेतलेली आहेत.
*या गझलेत जगून, निघून, उडून, फुटून, रडून, बुडून, जळून मातीमधून असे कवाफी घेतले आहेत.*
आणि *गेला* ही रदीफ घेतली आहे.
धन्यवाद🙏🌹
शोभा वागळे
मुंबई.
8850466717
