*खातू मसाले यांच्याकडून घारपी शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप*
*बांदा*
सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव ठेवत सुप्रसिद्ध खातू मसाले यांच्या वतीने घारपी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साधनांची उपलब्धता व्हावी, तसेच त्यांच्या शैक्षणिक प्रगतीला चालना मिळावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व २०२६ची दिनदर्शिका अशा विविध साहित्यांचे वितरण करण्यात आले. साहित्य मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह दिसून आला.
शाळेचे मुख्याध्यापक श्री जे.डी.पाटील यांनी या उपक्रमाचे कौतुक करताना सांगितले की,
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी अशा प्रकारचे सहाय्य अत्यंत महत्त्वाचे ठरते. शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्यासाठी समाजातील घटकांनी पुढाकार घेतल्यास विद्यार्थ्यांना मोठा आधार मिळतो. हे साहित्य प्राप्त होणेसाठी विषयतज्ज्ञ महेंद्र चव्हाण यांचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमास शिक्षक मुरलीधर उमरे,आशिष तांदुळे, धर्मराज खंडागळे, अंगणवाडी सेविका संजना गावकर,मदतनीस अमृता कविटकर, संचिता सावंत आदि उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या हितासाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
