सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांसाठी अवकाळी पावसाच्या नुकसानीपोटी ४.८६ कोटींची मदत जाहीर
कॅबिनेटमधील सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश; भरपाईची रक्कम त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे आदेश
सिंधुदुर्ग :
ऑक्टोबर महिन्यात ऐन भातकापणीच्या हंगामात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले होते. कापणी केलेल्या भाताला अंकुर येणे, उभ्या पिकाचे नुकसान, तसेच भात कुजण्याच्या घटनांमुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली होती. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री नितेश राणे यांनी तातडीने पंचनाम्याच्या सूचना दिल्या होत्या आणि “भरपाई हमखास मिळेल” असे आश्वासनही दिले होते.
त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळत आता शासनाने नुकसानीपोटी ४ कोटी ८६ लाख ९ हजार रुपये एवढी भरपाई मंजूर केली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंत्री नितेश राणे यांनी शेतकऱ्यांसाठी शंभर टक्के अनुदान मिळावे, यावर ठाम भूमिका मांडली होती. अखेर शासनाने ती मान्य करून संपूर्ण रक्कम मंजूर केली आहे.
जिल्हा प्रशासनाने २८ नोव्हेंबर २०२५ रोजी शासनाकडे परिपूर्ण प्रस्ताव पाठवला होता. त्यानुसार १८ हजार ३७१ शेतकऱ्यांचे नुकसान नोंदवले गेले असून ४६३६.४७ हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याचे नमूद करण्यात आले होते. या सर्वांचा विचार करून भरपाईची रक्कम मंजूर करण्यात आली आहे. ही रक्कम लवकरच थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.
तालुकानिहाय मंजूर अनुदान
- दोडामार्ग : १३,४२,२२० रुपये
- सावंतवाडी : ७४,३२,४१५ रुपये
- वेंगुर्ला : २६,५३,०९० रुपये
- कुडाळ : २,२१,३८,३१० रुपये
- मालवण : ५८,२२,४४५ रुपये
- कणकवली : ९,४१,९६० रुपये
- देवगड : ४,५५,१७५ रुपये
- वैभववाडी : ८२,९९० रुपये
शेतकऱ्यांच्या शेतात आलेल्या संकटात त्वरित निर्णय घेऊन मदत उपलब्ध करून देत पालकमंत्री नितेश राणे यांनी दिलासा दिल्याची भावना शेतकरी व्यक्त करत आहेत.
