You are currently viewing सायबीन

सायबीन

*ज्येष्ठ लेखक कवी भूमिपुत्र वाघ लिखित अप्रतिम कथा*

(सत्य कथेवर आधारीत)

*सायबीन*

*लेखक:- भूमिपुत्र वाघ*

 

पात्र :- सायबीन (सरूबाई) लेखकाची मोठी बहीण.

वहिनी (रुक्मिणी) :- लेखकाची मोठी भाऊजई.

आबई:- लेखकाची आई.

 

डाव्या गुडघ्यावर हाताचा तोल सांभाळत एकेक पायऱ्या चढत रकमा वहिनी घरात येत असताना मोठाड आवाज करत करत “आवं सायबिन हाईत का घरात”!!!!!.म्हणत वर आल्या.आतल्या घरातून पटकन कबई बाहेर आली.तिनं वहिनींना पाहिलं.वैनी हाय मी या या बसा.दोघींनीही एकमेकिंच्याकडे प्रसन्न नजरेने पाहिलं.डाव्या हाताने डोक्यावरचा पदर सावरत वहिनी आत आल्या.वहिनींनी माझ्याकडे बघून,अण्णा तुम्ही कधी आलावं?मी म्हणलं थोडा वेळ झालाय.कबई आली तशी आत गेली.तांब्याभर पाणी आणलं.वहिनींच्या हातात दिलं.वहिनीनीं कबईकडं बघत उजव्या हाताने तांब्या घेतला.आणि पोटभर पाणी पिल्या.लाईटीच्या शेगडीवर कबईनं चहा मांडला.चहा तयार झाला.आतून कबई चहा घेऊन आली.तिघांनाही चहा घेतला.मग गप्पा सुरू झाल्या… वहिनी म्हणाल्या काय करावं या दुष्काळाला!!वर्षा मागं वर्ष निघाल्यात.पाऊस काय पडनां.पिक इना.लेकरा बाळाची,जनावराची हायराणी झालीय.गेल्या वर्षी नाही. आमदा नाही. कवा पडल काय माहित?असं कधीच झालं नव्हतवं.आमदा मातर लईच आवस्था बिघडलीय.असं म्हणत वहिनींनी मान फिरवली आणि माझ्याकडे बघत म्हणल्या तुमच्याकडे कसं हाय?मी म्हणलं सगळीकडे खूपच परिस्थिती बिघडून गेलीय.लोकांच्या हाताला काम नाही.जनावरांना चारा नाही.शिवारात पाण्याचा ठिपूस नाही.डोळ्यादेखत चिमण्या- पाखरं, जनवार मरतायेत.सरकार लोकांना काम देत नाही.नां दुष्काळ जाहीर करी नां.गोरगरीबाची मात्र हायराणी चालू आहे.अन्नधान्य महागलं. ते गरिबांना घेणं मुश्किल झालय.दुष्काळ कधी संपलं आता तरी नक्की सांगता येत नाही.वहिनींनी पुनः बोलायला सुरु केलं. 72 चा दुष्काळबी असाच पडला व्हता.लोकांनी गावच्या गावं सोडली. आवं कुकू नसलेल्या बाई सारखी गावं दिसत व्हती.देवळ झाडायला माणूस नव्हता.का झाडाला पान उरलं न्हवतं.जनवारं,वासरं डोळ्यात देखत परान सोडत व्हती.तवा सायबीन लय लहान व्हत्या.आपुणबी गाव सोडलेलं.लातूर जवळ हरंगुळ गावात शेतावर राहिलो.तिथं तळं चालू व्हतं. सगळ्यात मोठी पाटी सायबिनीनं डोक्यावर घ्यावी.मातीनं भरलेलं टोपलं घिऊन तळ्याचा भराव चालावा.दिवसभर चालून चालून पायाच्या घोट्याला सूज यायची.तरीबी सायाबीन चालत असायच्या.सगळे लोक लेकराकडे बघून कौतुक करायचे.असं बोलत असताना तिघांचेही डोळे पानावले… माझ्याकडे बघत वहिनी म्हणाल्या अण्णा!!आयुष्यभर लै कष्ट सोसलवं…. ह्या जीवानं… ऊन वादळं सोसली.पण समाधान कधीच झालं नाही.. तुम्ही संमदी लहान लहान होतात.खाणारी तोंड जास्त.कमवणारी कमी.कधीच पैशाला पैसा लागला नाही. का चांगलं तटपर अंगाला मिळालं नाही.मी तर आबईची जुनी झालेली लुगडी,त्याच्यातले चांगले चांगले तुकडे फाडून बाजूला काढावे. एकाला एक जुडून जुडून त्याला शिवावं.आन तेच ल्यावं.लय दिवस हलाकीचं व्हतं.आन आताबी तसंच वाटायला लागलाय.काय देवबी कोपल्यासारखा झालाय.काय करावं कायबी समजनां.जनावारांना चारा नाही.दूध तरी कशी देत्याल.म्हणतं खांद्यावरचा पदर डोळ्याला लावत आलेल्या आसवानां रान मोकळं करून दिलं.. पुन्हा बोलायला लागल्या वर्षानुवर्ष बिराड पाठीवर घेऊन फिरले.वाईट वकटं दिवस अनुभले,पण नवऱ्याच्या पायावर पाय दिऊन जगत राहिले. लातूर,सोलापूर,तासगावा,पंढरपूर,

वाखरी.कुठे कुठे फिरले नसलं,वडातांनीत जीवन जगत राहिले.पर उमीद खचू दिली न्हाई. एवढं हुऊनबी देवानं नवऱ्याची साथ संगत ठिवली न्हाई.न्हेलं तेनं.तेच्च होतं.आपण कोण कुणाचं? वहिनींचे डोळे घळा घळा वहात होते.कबई मदेचं बोलली.वहिनी गपा बरं.सावरा स्वतःला होईल सगळं चांगलं.आपलंचं हाय का? सुख- दु:खाच्या पायऱ्या चढल्याशिवाय कसं!! देवाला कळत नाही का? वहिनी पुटपुटत म्हणाल्या, आता काय चांगलं व्हायचं राहिलंय. हळूहळू तिघेही निशब्द झालो…..

दुखातून सावरण्यासाठी मी विषय बदवला.वहिनीला म्हटलं.वहिनी तुम्ही कबईला सायबीन कधीपासून म्हणताय.लगीन झाल्यापासून म्हणते की….हो का? हो…पूर्वी नणंदेला खूप सन्मान दिला जायचा.नेमकं काय म्हणावं म्हणून आम्ही सगळ्याच भावजया कबईला सायबीन म्हणतोत.मनाला हा शब्द खूप भावला.गरीबी असो,श्रीमंती असो.एकमेकांचा आदर करणे,प्रेम निर्माण करणे त्यालाच तर प्रपंच म्हणतात.पुढे वहिनी म्हणाल्या खरं सांगू का अण्णा!!आम्ही नणंद भावजया सारखं कधीच वागलो नाही.एकमेकींना सांभाळलं.सुखा दुःखात सहभागी झालो.त्या लहान असल्या तरी आम्हाला मैत्रिणीसारख्या वाटायच्या.त्यांनी कधी मनाला दुःख दिलं नाही. सायबिनीचं मालक सारखं मारहाण करायचं.त्रास द्यायचं.तवा सायबीनीला ह्यांचा ( मोठया भावाचा) आधार वाटायचा.कितीतरी वेळा जीवावर आलं.पण मरणाला वाट दिली नाही.एकदा तर सायबिनीच्या डोक्यावर तिच्या मालकांनं खीळ मारली.सारं अंग रक्तांनं भिजून गेलं.मरण पाठीवर घेऊन तेवढा त्रास सहन केला.ना दवाखाना ना उपचार… म्हणून सायबिनीचा आम्हा समद्याना अभिमान वाटतो.वहिनी पुढे बोलत होत्या.एकूण आठरा एक्कर जमीन.एकही मजूर कधीच लावला नाही.तेवढं सगळं शेतातलं काम दोघानीच करावं.रात्र म्हनूनी का दिवस म्हनूनी.कामाला वेळच नसायची.म्हणून सारा प्रपंच सावरला…

उन्हाच्या झळा वाढत होत्या. दुष्काळाचं सावट डोक्यावर दिसत होतं.दारात असणारी एवढी मोठी चिंच,ती सुद्धा पार सुकून गेलेली.तिचा पार खराटा होऊन गेलेला.झाडांला पान उरलं नव्हतं.. वहिनींनी बाहेर नजर टाकली. सायबीन येतेवं,म्हनत पुन्हा दोन्ही हात खाली फरशीवर टेकवत दरवाज्याचा आधार घेत चालत्या झाल्या….

प्रतिक्रिया व्यक्त करा