You are currently viewing तरंदळे तलावात युवक-युवतीचा मृतदेह

तरंदळे तलावात युवक-युवतीचा मृतदेह

तरंदळे तलावात युवक-युवतीचा मृतदेह;

प्रेमप्रकरणातून आत्महत्येची शक्यता

कणकवली

कणकवली तालुक्यातील तरंदळे येथे बुधवारी (१० डिसेंबर) सकाळी तलावात युवक आणि युवतीचे मृतदेह आढळून आल्याने परिसरात  खळबळ उडाली आहे. दोघांनी एकमेकांना पकडून तलावात उडी घेऊन आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात असला तरी, नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

मध्यरात्री सुमारे १.३० वाजता तलावात दोन मृतदेह तरंगताना दिसल्याची माहिती मिळताच कणकवली पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी दोन्ही मृतदेह बाहेर काढून कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर दोघांनाही मृत घोषित केले.

मृत झालेल्या युवतीची ओळख पटली असून ती इयत्ता बारावीची विद्यार्थिनी असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र दोघांची नावे आणि इतर तपशील अद्याप जाहीर करण्यात आलेले नाहीत. घटनेची बातमी कळताच नातेवाईकांनी रुग्णालय परिसरात मोठी गर्दी केली.

प्राथमिक माहितीवरून हे कृत्य प्रेमसंबंधातून झाल्याची चर्चा आहे. तथापि, या टोकाच्या निर्णयामागील नेमके कारण काय, इतर काही वेगळे पैलू आहेत का, याबाबत कणकवली पोलिसांचा सखोल तपास सुरू आहे. पुढील तपासात आत्महत्येचे खरे कारण स्पष्ट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा