पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या अनुषंगाने आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन
सिंधुदुर्गनगरी
गोव्यातील हडफडे येथील क्लबमध्ये दि.६ डिसेंबर २०२५ रोजी आगीची घटना घडली होती. प्रथमदर्शनी ही आग सिलेंडरच्या स्फोट होऊन भडकल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. या आगीत घडलेली मनुष्यहानी विचारात घेता, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हॉटेल/ रिसॉर्ट/ होम स्टे यांचे चालक व मालक यांच्यासाठी वास्तव्यास येणारे पर्यटक तसेच तिथे काम करणारे कामगार यांच्या सुरक्षिततेच्या अनुषंगाने जिल्ह्यातील हॉटेल, रिसॉर्ट, होम स्टे यांचे चालक व मालकानी पुढीलप्रमाणे खबरदारी घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले आहे.
गॅस सिलेंडर व त्याच्या कनेक्शनची सुरक्षा–
हॉटेल, रिसॉर्ट, होम-स्टे येथे वापरल्या जाणाऱ्या एलपीजी सिलेंडर, रेग्युलेटर, पाईप इत्यादींची तपासणी करून ते सुस्थितीत असल्याची खात्री करावी. गॅस पाईपची वैधता, कालमर्यादा तपासून आवश्यक असल्यास तातडीने बदल करावा. कुकिंग एरिया हवेशीर ठेवावा.
आगीच्या वेळी सुरक्षित सुटकेचे मार्ग (Emergency Exit)–
आपत्कालीन परिस्थितीत सुटकेचे मार्ग (Emergency Exits) स्पष्टपणे दर्शविणारे बोर्ड व दिशादर्शक बाण (glow sign boards) लावावेत. संबंधित मार्ग नेहमी अडथळामुक्त ठेवावेत.
अग्निशामक यंत्रे बसविणे व देखभाल–
इमारतीत आवश्यक क्षमतेची अग्निशामक यंत्रे (Fire Extinguishers) बसविण्यात यावीत. बसवलेल्या अग्निशामक यंत्रांची वेळोवेळी तपासणी करून ती कार्यक्षम स्थितीत ठेवावीत.
कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण–
सर्व कर्मचाऱ्यांना अग्निशामक यंत्र हाताळण्याचे, आग भडकली तर कसे वागावे आणि पर्यटकांना सुरक्षित मार्गाकडे कसे न्यावे याचे प्रशिक्षण द्यावे. वर्षातून किमान एकदा आग प्रतिबंध व नियंत्रण सराव (Fire Drill) आयोजित करावा.
विद्युत यंत्रणा तपासणी–
हॉटे, रिसॉर्ट, होम-स्टे मधील संपूर्ण विद्युत वायरिंग, स्विच बोर्ड, लोड क्षमता इत्यादींची अधिकृत इलेक्ट्रिशियनमार्फत तपासणी करून शॉर्टसर्किट होणार नाही याची दक्षता घ्यावी.
सीसीटीव्ही व निगराणी व्यवस्था–
किचन, गॅस स्टोरेज एरिया, प्रवेश-निर्गमन मार्ग इत्यादी ठिकाणी सीसीटीव्ही बसवावेत व त्याची नोंद व्यवस्थित राखावी.
आपत्कालीन संपर्क क्रमांक प्रदर्शित करणे–
अग्निशमन दल, नजीकचे रुग्णालय, पोलीस ठाणे यांच्या संपर्क क्रमांक लॉबी, रिसेप्शन व किचन येथे लावावेत.
गॅस स्टोरेज क्षेत्र सुरक्षित करणे
अतिरिक्त गॅस सिलेंडर नियमानुसार सुरक्षित अंतरावर, हवादार जागेत व आगप्रतिबंधक उपायांसह ठेवावेत. किचन व स्टोरेज भागात धूम्रपान पूर्णपणे प्रतिबंधित करावे.
सागरी पर्यटनाच्या अनुषंगाने आवश्यक सूचना–
समुद्राच्या ठिकाणी असलेल्या हॉटेल, रिसॉर्ट, होम-स्टे चालक व मालक यांनी पर्यटकांसाठी पुढील प्रकारच्या सूचना नोटीस बोर्ड वर ठळकपणे लिहून ठेवाव्यात.
समुद्र सफारीसाठी जाताना लाईफ जॅकेट परिधान करावे. भरती-ओहोटीची माहिती घेऊनच समुद्री पर्यटनाचा आनंद घ्यावा. समुद्र किनारी पर्यटनासाठी जाताना लहान मुले, वृद्ध माणसे व महिला यांची विशेष काळजी घ्यावी. समुद्र किनारी पर्यटनाचा आनंद घेताना स्थानिक नागरिकांकडून देण्यात येणाऱ्या दक्षतेविषयक सूचनांकडे लक्ष द्यावे. समुद्री पर्यटनाचा आनंद घेताना पर्यटकांनी मद्यपान टाळावे.
सागरी पर्यटनाच्या अनुषंगाने वरील सूचना पर्यटकांना स्पष्टपणे निदर्शनास येतील अशा हॉटेल, रिसॉर्ट, होम-स्टे चालक व मालक यांनी लावाव्यात. तसेच अग्निसुरक्षेच्या अनुषंगाने आवश्यक त्या सर्व प्रकारच्या सुरक्षात्मक उपाययोजना हॉटेल, रिसॉर्ट, होम-स्टे चालक व मालकांनी अवलंबून कोणतीही दुर्घटना घडून जीवितहानी होणार नाही याची दक्षता घ्यावी, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देशित केले आहे.
