कविवर्य केशवसुत साहित्य नगरीत २८ पासून रंगणार सिंधुदुर्ग जिल्हा साहित्य संमेलन
श्रीराम वाचन मंदिरचे आयोजन : ज्येष्ठ व युवा मान्यवरांचा होणार गौरव
सावंतवाडी :
महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाच्या अनुदानातून श्रीराम वाचन मंदिर, सावंतवाडी या संस्थेने आयोजित केलेल्या पहिल्या सिंधुदुर्ग जिल्हा साहित्य संमेलनामध्ये जिल्ह्यातील विविध क्षेत्रांत महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या ज्येष्ठ व युवा मान्यवरांना त्यांच्या कार्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सन्मानित करण्यात येणार आहे.
रविवार, दि. २८ डिसेंबर रोजी येथील राणी पार्वती देवी हायस्कूलच्या कविवर्य केशवसुत साहित्य नगरीत साजऱ्या होणाऱ्या उद्घाटन कार्यक्रमात या मान्यवरांना शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, पुस्तक आणि रोख रक्कम एक हजार रुपये देऊन गौरविण्यात येईल.
विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी सन्मानित करण्यात येणाऱ्या ज्येष्ठ मान्यवरांमध्ये दशावतार लोककला क्षेत्रातील विठ्ठल गावकर, ओटवणे, साहित्य क्षेत्रातील ना. शि. परब, वेंगुर्ले, चित्रकथी क्षेत्रातील आबा रणसिंग, कुडाळ, मौखिक गीते क्षेत्रातील गणपत परब, सावंतवाडी, वैद्यक क्षेत्रातील डाॅ. अशोक सुर्वे, सावंतवाडी, पत्रकारिता क्षेत्रातील संजीवनी दत्तात्रय देसाई, कुडाळ, वाड्मयीन कार्यकर्ते प्रभाकर भागवत, सावंतवाडी, शिक्षण क्षेत्रातील विजयालक्ष्मी हनुमंत भोसले, बांदिवडे-मालवण, समाजसेवा क्षेत्रातील बबन परब, अणाव, ग्रंथपाल आनंद देवळी, मळगाव आणि क्रीडा क्षेत्रातील अनिल हळदिवे, कणकवली यांचा समावेश आहे.
तर युवाप्रेरणा पुरस्काराने सन्मानित करण्यात येणाऱ्या तरुणांमध्ये पर्यावरण क्षेत्रासाठी प्रसाद गावडे आणि मेगल डिसोजा, मालवण, सामाजिक कार्यासाठी रवी जाधव, शेतीसाठी प्रमोद दळवी, विलवडे, हाॅटेल व्यवसायासाठी पुजा गवस आणि चित्रकलेसाठी अक्षय सावंत यांचा समावेश आहे.
श्रीराम वाचन मंदिर, सावंतवाडी येथे झालेल्या संमेलन संयोजन समितीच्या बैठकीमध्ये प्रा. प्रवीण बांदेकर, ॲड. संदिप निंबाळकर आणि रमेश बोंद्रे यांनी ही सन्माननीय नावांची घोषणा केली. यावेळी राजेश मोंडकर, अभिमन्यू लोंढे, सुमेधा नाईक, विठ्ठल कदम, मधुकर मातोंडकर, किशोर वालावलकर, मनोहर परब, विजय ठाकर, मंजिरी मुंडले आदी मान्यवर उपस्थित होते. या सन्मान सोहळ्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध कला आणि कार्याचा गौरव होणार असून साहित्य संमेलनाची शोभा वाढणार आहे.
