*‘माझा महाराष्ट्र’ शॉप्पी प्रकल्पासाठी शिव उद्योग संघटना सज्ज*
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :
आता महिला उद्योजक, उत्पादक बचत गट आणि गृहउद्योगांच्या हस्तकौशल्यातून निर्माण होणाऱ्या महाराष्ट्राच्या मातीचा सुगंध असलेल्या उत्पादनांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळणार आहे. दीपक विठ्ठल काळीद यांच्या नेतृत्वाखाली शिव उद्योग संघटना, वैदिकस्वाद फूड्स प्रायव्हेट लिमिटेड, अमेरिका आणि मॅक्सलॉर्ड ग्लोबल इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य मेळावे आयोजित करण्यात आले आहेत. या उपक्रमाचा मुख्य उद्देश – महिला सक्षमीकरणाला बळ देणे आणि उद्यमशील महिलांना योग्य बाजारपेठ उपलब्ध करणे.
२५ नोव्हेंबर २०२५ रोजी मुंबईत आणि ५ डिसेंबर २०२५ रोजी रत्नागिरीत पार पडलेल्या मेळाव्यांमध्ये महिला उद्योजकांनी तयार केलेल्या विविध उत्पादनांची निवड करण्यात आली. आपल्या जिल्ह्यात किंवा विभागात बहिणींच्या उत्पादनांना या प्रकल्पाशी जोडण्यासाठी इच्छुकांनी त्वरित संपर्क साधावा, कारण प्रथम संपर्क साधणाऱ्या जिल्ह्याला अथवा विभागाला प्राधान्य दिले जाईल.
८ मार्च २०२६ पासून नियोजित ‘माझा महाराष्ट्र’ शॉप्पी तसेच ऑनलाइन ई–कॉमर्स संकेतस्थळ सर्वसामान्यांसाठी सुरू होणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रभरातून गुणवत्तापूर्ण उत्पादनांची निवड करण्याचे काम वेगाने सुरू आहे. प्रकल्पांतर्गत स्वीकारण्यात येणारी उत्पादने:
• सर्व प्रकारचे खाद्यपदार्थ
• लोणची, चटण्या, पापड, मसाले इत्यादी
• नानकटाई, बिस्किटे व इतर बेकरी उत्पादने
• फणस, रातांबे, आंबा आदी फळांवर आधारित प्रक्रिया उत्पादने
• मध, मोह व इतर वनउत्पन्नांपासून तयार पदार्थ
• हळद, तेलबिया, खाद्यतेले व कृषीआधारित उत्पादने
• सर्व प्रकारच्या गृहउद्योगांतून तयार वस्तू
उत्पादकांकडे फूड लायसेन्स, उत्पादनांचे प्रयोगशाळा अहवाल आणि सुस्थित पॅकिंग असल्यास, त्वरित नमुने पाठवावेत, असे आवाहन प्रकाश ओहळे, सरचिटणीस – ९७०२०५८९३० यांनी केले आहे.

