You are currently viewing जना सज्जना

जना सज्जना

*साहित्य प्रेरणा कट्टा आजगावचे समन्वयक भोवतालकार ज्येष्ठ साहित्यिक विनय सौदागर लिखित काकल्याचे तर्कट*

भाग: ४३

 

*जना सज्जना*

 

“सज्जन आसणा बरा काय वायट?” काकल्याने आल्या आल्या प्रश्न टाकला.

“का? काय झालं?” मी प्रतिप्रश्न केला.

“खय काय झाला? माझ्या प्रश्नाचा तुज्याकडे काय उत्तर आसा ता सांग. ” काकल्याने पुन्हा विचारले.

“अरे सज्जन असायलाच हवं. तसं वागायलाही हवं.” मी म्हणालो.

“मगेऽऽ, खयच्या सज्जनान कोणाचा काय बरा केला ता तरी सांग.” काकल्या पुढे सरकला.

आता माझी पंचाईत झाली. निश्चित असं काही उदाहरण मला आठवेना.

“तूया गप झालंस, म्हंजे माजो प्रश्न बरोबर हा.” काकल्या मला डिवचू लागला.

मी म्हणालो, “अरे, कितीतरी संत-सज्जन आहेत. त्यानी समाजाचं भलंच केलय. साने गुरुजीं सारखे समाजप्रेमी, शास्त्रींसारखे लोकनेते हेही सज्जन होतेच. त्यांचा समाजाला फायदाच झालाय.”

“हयतो तू घोळ मारतंस. संत येगळे. सज्जन येगळे. आसो ,ता जावनेत. गावातलो येखादो सज्जन सांग, आनी त्येनी कोनाचा काय बरा केला ताय सांग. ”

मी गप्प रहाणे पसंत केले. थोड्या वेळाने त्याला म्हटलं,”बरं, तुझं मत काय?” कारण तेच तो सांगायला आला होता. तसा सावरून बसत तो म्हणाला,” माका इचारशित तर सज्जन आसणा तितक्यासा बरोबरच नाय. ते धड सवताचा बरा करणत नाय, धड लोकांचाय नाय. ऐन मोक्याच्या येळाक गप रवतले, नायतर दडान रवतले. तेंच्या अश्या वागण्यामुळेच समाज चुकीच्या माणसांच्या हातीत जाता. ”

काकल्याने निराळाच विचार जन्माला घातला होता आणि तो अगदीच तथ्यहिन नव्हता. मी आसपास पहातो, तेव्हा सज्जन माणसे कार्यरत होऊ नये, म्हणून समाज काळजी घेत असतो असे दिसते. त्यांना नामोहरम करणे, त्यांचे काम बंद पाडणे, शक्य झाल्यास त्याना जीवनातून उठवणे असे चाललेले दिसते. त्यामुळेच सज्जन कशात भाग घेत नसावेत.

“इतिहास काय सांगता. ह्यो समाज नाथांच्येर थुकलो, ह्या समाजान सावित्रीबाईच्येर श्याण उडयल्यान. मंबाजीर गुंडे मारल्याचा आयकाक नाय, पून तुकारामाक सदेह वरतेन धाडल्यानी. मी तुका याक सांगतय. सोन्यात जसा थोडा तांब्या होया तसा सज्जनात पून थोडी मिलावट होयीच. नायतर जलम फुक्कट. धड तोय सारखो जगणा नाय,धड समाजाचा भला करणा नाय.” माझं डोकं गरगरवून काकल्या चालू पडला.

 

*विनय वामन सौदागर*

आजगाव, सावंतवाडी.

9403088802

प्रतिक्रिया व्यक्त करा