*१ महिन्यात जलजीवन मिशनची कामे सुरु न झाल्यास जि. प. च्या पाणीपुरवठा विभागावर मोर्चा काढणार- वैभव नाईक*
*निधी आणण्यात स्थानिक आमदार कमी पडले*
*माजी आमदार वैभव नाईक यांनी जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी साधला संवाद*
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ४ वर्षे जलजीवन मिशन योजना सुरु असून या योजनेंतर्गत ७१८ नळयोजनेची कामे सुरु आहेत. यामध्ये जुन्या नळयोजनेच्या दुरुस्तीची कामे पूर्ण झाली आहेत परंतु नवीन नळयोजनेचे एकही काम जिल्ह्यात पूर्ण झालेले नाही. या योजेनेसाठी केंद्र आणि राज्य सरकारने पैसे न दिल्याने आणि ठेकेदारांकडे दुर्लक्ष केल्यामुळे हि योजना अपूर्णावस्थेत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात हि योजना पूर्णपणे फेल होण्याची स्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील सत्ताधारी लोकप्रतिनिधींना याची कोणतीही काळजी नाही. त्यांनी कधीही आढावा बैठक घेतली नाही. कामे अपूर्ण असल्याने उन्हाळ्यात पाण्यासाठी लोकांचे हाल होणार आहेत.त्यामुळे येणाऱ्या १ महिन्यात जलजीवन मिशनची कामे सुरु न झाल्यास जिल्ह्यातील सरपंच, ग्रा. पं. सदस्य व ग्रामस्थांना घेऊन सिंधुदुर्ग जिल्हा परिषदच्या पाणीपुरवठा विभागावर मोर्चा काढण्याचा इशारा माजी आमदार वैभव नाईक यांनी पत्रकारांशी बोलताना दिला आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर हे योजनेसाठी सकारात्मक आहेत.परंतु केंद्र आणि राज्य सरकारने योजनेसाठी पैसेच दिले नाहीत.निधी आणण्यात स्थानिक आमदार कमी पडले आहेत. त्यामुळे परजिल्ह्यातील ठेकेदार कामे अर्धवट सोडून पळून गेले आहेत असे वैभव नाईक यांनी सांगितले.
कुडाळ मालवण तालुक्यातील जलजीवन मिशन योजनेच्या रखडलेल्या कामांबाबत आज माजी आमदार वैभव नाईक यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांची भेट घेतली. जलजीवन अंतर्गत गावागावात नळयोजनेची मंजूर कामे अर्धवट स्थितीत असल्याने जुन्या नळयोजना बंद पडल्यास त्या दुरुस्ती करण्यासाठी आता वेगळा निधी मंजूर होणार नाही.त्यामुळे जलजीवनची अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी सर्व ठेकेदारांची एकत्रित बैठक लावण्याचे वैभव नाईक यांनी यावेळी सुचविले.
यावेळी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुदेश राणे, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता श्री. वाळके, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कुडाळ तालुकाप्रमुख कृष्णा धुरी,तालुका संघटक बबन बोभाटे,युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी,माणगाव सरपंच मनीषा भोसले,पावशी उपसरपंच लक्ष्मीकांत तेली, अवधूत गायचोर, गुरु गडकर,राहुल सावंत आदि उपस्थित होते.

