You are currently viewing छोटी स्वप्नं, उंच उडाण

छोटी स्वप्नं, उंच उडाण

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री भारती महाजन रायबागकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*छोटी स्वप्नं, उंच उडाण* 

 

ती स्वप्नांच्या रंगांनी तिचं, आकाश सजवित होती

निसर्गाच्या साक्षीने त्या, रंगांना फुलवित होती

 

कोवळी रविकिरणं स्पर्शता मुग्ध, कलिका ये फुलुनी

प्रफुल्लित, विकसित कुसुमं तैसी, पटास शोभवित होती

 

कर्तृत्वाचा, जिद्दीचा हातामध्ये, कुंचला घेऊनी

प्रयत्नांच्या पराकाष्ठेने असिमीत,

आकाश रंगवित होती

 

रंग-रुप-गंधाचा घालुनी, सुंदर, साजिरा मेळ

परिपूर्ण होण्याचा प्रयास करूनी, स्वतःस घडवित होती

 

छोटी स्वप्नं तरीही उंच, उडाण भरण्यासाठी

शोभिवंत, रंगीत पंखांना, सक्षम बनवित होती

 

सागराच्या लगतच विहरती, सामान्य समुद्रपक्षी

‘जोनाथन’ सम अनंत आकाशी, डौलाने मिरवित होती

 

स्वप्नाळू असली तरीही सतत, सतर्कतेचे भान

अंतर्मनाची ताकद वास्तवाची, जाणीव करवित होती

 

(जोनाथन – इतर समुद्रपक्ष्यांपेक्षा वेगळा, धाडसी एक समुद्रपक्षी)

 

@भारती महाजन-रायबागकर

चेन्नई

©®या कवितेचे सर्व हक्क लेखिकेच्या स्वाधीन आहेत

प्रतिक्रिया व्यक्त करा