You are currently viewing गोवा नाईट क्लब मध्ये स्फोट

गोवा नाईट क्लब मध्ये स्फोट

गोवा नाईट क्लब मध्ये स्फोट

मृतदेहांचा खच, खिडक्या, दरवाजे जळून खाक

गोवा

गोव्यातील एका प्रसिद्ध नाईट क्लबमध्ये सिलिंडरचा स्फोट होऊन मोठी दुर्घटना घडली आहे. रात्री उशिरा झालेल्या सिलेंडरचा स्फोटात 25 जणांचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. मृतांमध्ये नाईट क्लबच्या स्वयंपाकघरातील कर्मचाऱ्यांसह काही पर्यटकांचा देखील समावेश आहे. यात तीन महिलांचाही समावेश असल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणी क्लब मालकाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या क्लबमध्ये फक्त बाहेर पडण्याचा आणि प्रवेशसाठी एकच मार्ग होता. प्राथमिक चौकशीत असे दिसून आले की क्लबमध्ये अग्निसुरक्षेचे नियम पाळले गेले नव्हते. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

गेल्या वर्षीच उघडला होता नाईट क्लब

गोव्याची राजधानी पणजीपासून सुमारे 25 किलोमीटर अंतरावर असलेल्या अर्पोरा गावात असलेल्या बर्च बाय रोमियो लेन या लोकप्रिय पार्टी स्थळावर हा अपघात झाला. हा नाईट क्लब 2024 मध्ये सुरू झालात होता. या भीषण घटनेने संपूर्ण गोव्याला हादरून सोडले आहे. घटनेनंतर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी स्वतः घटनास्थळाची पाहणी केली आणि रेस्टॉरंट व्यवस्थापनाची चौकशी केली. पोलिसांनी घटनेची माहिती घेतली आणि घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांचे जबाब नोंदवले. स्वयंपाकघरात स्वयंपाक करताना सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे भीषण आग लागली, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

मृतांना दोन लाख रुपयांची भरपाई

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेवर दु:ख व्यक्त केले आहे. तसेच गोव्यातील दुर्घटनेवर दुःख व्यक्त करताना त्यांनी भरपाईची घोषणा केली आहे. पंतप्रधान मदत निधीतून मृताच्या नातेवाईकांना प्रत्येकी 2 लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपयांची भरपाई जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही या घटनेवर दु:ख व्यक्त केले आहे.

मोठ्या स्फोटानंतर आग लागली

लोकांनी सांगितले की आग एका मोठ्या स्फोटाने सुरू झाली आणि काही मिनिटांतच संपूर्ण नाईटक्लबला वेढून टाकले. स्फोट होताच लोक नाईटक्लबमधून बाहेर पडले. पोलीस आणि अग्निशमन दलाला घटनास्थळी बोलावण्यात आले. ओळख पटल्यानंतर पोलीस तात्काळ पोहोचले आणि अग्निशमन दलाच्या मदतीने आग विझवली. गोवा पोलीस प्रमुख डीजीपी आलोक कुमार आणि अनेक पोलीस ठाण्यांचे पोलीसही घटनास्थळी पोहोचले. आग विझवण्यासाठी लोकांनी अग्निशमन दलाला मदत केली.

तळमजल्यावर होते स्वयंपाकघर

डीजीपी आलोक कुमार यांनी सांगितले की, ही दुर्घटना रात्री 12:04 वाजण्याच्या सुमारास घडली. आग विझवण्यात आली असून सर्व 25 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. मृतदेह शवविच्छेदन तपासणीसाठी शवागारात ठेवण्यात आले आहेत. ही घटना नाईटक्लबच्या तळमजल्यावरील स्वयंपाकघरात घडली. मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि आमदार मायकल लोबो यांनी घटनास्थळी भेट दिली. मुख्यमंत्र्यांनी घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. तिघांचा मृत्यू भाजल्याने झाला तर उर्वरित जणांचा मृत्यू गुदमरल्याने झाल्याची माहिती त्यांनी दिली.

सुरुवातीच्या तपासात निष्काळजीपणा उघड

आमदार लोबो यांनी सांगितले की, अपघातात कोणताही पर्यटक जखमी झाला नाही आणि सर्वजण सुरक्षित आहेत. नाईट क्लबमध्ये सुरक्षा नियम आणि मानकांचे पालन केले जात होते की नाही याची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सुरुवातीच्या तपासात नाईट क्लबमध्ये निष्काळजीपणा उघड झाला आहे. जर सुरक्षेचे उल्लंघन झाल्याचे सिद्ध झाले तर क्लबचे मालक, व्यवस्थापन आणि अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल. दोषी आढळलेल्या कोणालाही सोडले जाणार नाही.

प्रतिक्रिया व्यक्त करा