You are currently viewing डॉ. बाबासाहेब आंबेडकर एक विचारवंत

डॉ. बाबासाहेब आंबेडकर एक विचारवंत

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री राधिका भांडारकर लिखित वैचारिक लेख*

 

*डॉ. बाबासाहेब आंबेडकर एक विचारवंत*

 

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार सामाजिक धार्मिक आणि नैतिक तत्त्वांवर आधारलेले होते. शोषक आणि शोषित हा त्यांच्या विचारांचा केंद्रबिंदू होता. यांना उभारी देणे आणि शोषितांची जोखडातून मुक्तता करणे हाच त्यांच्या विचारांचा मूळ गाभा होता. सर्वांना स्वातंत्र्य समता आणि न्याय मिळावा हीच त्यांची वैचारिक संकल्पना होती.

 

दलित चळवळीला त्यांनी विशेष महत्त्व दिले. त्यांचा जन्म अस्पृश्य कुटुंबात झाला होता. आणि त्या काळात अस्पृश्यतेपायी त्यांना अनेक वेदनादायी दुःखद अनुभवांना सामोरे जावं लागलं होतं. सभोवतालच्या लोकांची प्रचंड अवहेलना पाहून त्यांचे मन द्रवले. विद्रोही बनले . आणि दलितांचा सर्वांगीण विकास करणे हे त्यांचे प्रमुख ध्येय ठरले.

 

त्यावेळच्या पुरोगामी विचारांच्या लोकांनी विधवा विवाह, केशवपन, बालविवाह इत्यादी विषयी समाजात जागृती निर्माण करण्याचे कार्य हाती घेतले होतेच पण बाबासाहेब आंबेडकरांचा दृष्टिकोन हा मूलभूत समस्यांशी निगडित होता. त्यांच्या दृष्टीने सामाजिक विषमता हा अनेक समस्यांचे मूळ कारण होते. नेमस्तांच्या हृदय परिवर्तनावर त्यांचा विश्वास होता पण बाबासाहेबांच्या मते हृदय परिवर्तन हे मर्यादित असते. याबाबत त्यांचे विचार अधिक व्यापक होते.

 

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे देशामधले सर्वश्रेष्ठ अर्थशास्त्रज्ञ होते. . तळागाळातील वर्गाच्या उन्नतीसाठी, सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि धार्मिक पातळीवर त्यांचा संघर्ष होता. ते थोर विचारवंत होते आणि त्यांनी समाजशास्त्रज्ञ, शिक्षणतज्ञ, पत्रकार, विधीज्ञ या सर्वांच्या पलीकडे जाऊन मानवाधिकार्‍यांचा रक्षक, या नात्याने केलेले त्यांचे कार्य अतुलनीय आहे. अस्पृश्य समाजाला संघटित करून सामाजिक समतेचे ध्येय कसे गाठायचे याचेही त्यांनी मार्गदर्शन केले.

 

शेतीमधील खोत पद्धती विरुद्ध त्यांनी यशस्वी लढा दिला. आणि ग्रामीण गरिबांची आर्थिक शोषणातून मुक्तता केली. कामगार विषयक धोरणातही त्यांनी अमुलाग्र सुधारणा घडवून आणल्या. जातिव्यवस्था आणि सामाजिक आजारांचे आर्थिक पैलू त्यांनी उलगडून दाखवले. केवळ उच्च वर्णीयांच्या वर्चस्ववादालाच त्यांनी आव्हान दिले नाही तर आर्थिक विकासाची सुयोग्य मांडणी केली.

 

शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावी शास्र आहे आणि शिक्षणाने माणसाला आपले कर्तव्य आणि हक्कांची जाणीव होते या विचारांवर ते ठाम होते. १९५४ साली चीन संदर्भात तयार केलेल्या पंचशील धोरणावर त्यांनी संसदेत उत्तम टीका केली. पंचशील धोरण बौद्ध धर्माचा अविभाज्य घटक असला तरी, चीन तिबेटी लोकांवर अन्याय करत असतील तर त्यांना पंचशील धोरणाचा अधिकारच नाही हा विचार त्यांनी कणखरपणे मांडला.

 

गौतम बुद्ध, सम्राट अशोक, स्वामी विवेकानंद ही त्यांच्यासाठी अत्यंत आदरणीय व्यक्तिमत्वे होती.

 

ते लोकांना सतत सांगत,

” तुम्ही वाघासारखे बना म्हणजे तुमच्या वाटेला कोणी जाणार नाही.”

” आपल्याला कमीपणा येईल असा पोशाख करू नका.”

” स्वतंत्र विचारसरणीचे, स्वातंत्र्य वृत्तीचे, निर्भय नागरिक व्हा.”

” लोकशाहीचे दोन शत्रू म्हणजे हुकूमशाही आणि माणसा माणसात भेद मानणारी संस्कृती.”

” मी नदीच्या प्रवाहालाच वळवणाऱ्या भक्कम खडकासारखा आहे.”

” देवावर अवलंबून राहू नका. जे करायचे ते मनगटाच्या जोरावर करा.”

असे आणि अशा प्रकारचे निर्भय, आत्मोन्नती विचार डॉक्टर बाबासाहेबांनी समाजावर बिंबवले.

 

त्यांचे ग्रंथ, शोध निबंध, लेख, परीक्षणे, निवेदने यांचा महान संग्रह आहे. ज्यातून त्यांच्या विचारधारेचे अमृत लोकांपर्यंत पोहोचले.

 

डॉक्टर आंबेडकर म्हणजे देशाचे सुपुत्र! देशाचा अभिमान!

अशा या थोर भारतीय घटनेच्या शिल्पकारास आणि विचारवंतास मनापासून वंदन!!

 

*राधिका भांडारकर पुणे*

प्रतिक्रिया व्यक्त करा