You are currently viewing सरकारच्या वर्षपूर्ती निमित्त विशाल परब यांच्या जनसंपर्क कार्यालयात पत्रकार परिषद

सरकारच्या वर्षपूर्ती निमित्त विशाल परब यांच्या जनसंपर्क कार्यालयात पत्रकार परिषद

राजकीय विशेष….

*सरकारच्या वर्षपूर्ती निमित्त विशाल परब यांच्या जनसंपर्क कार्यालयात पत्रकार परिषद*

*विशाल परब यांना भाजपचे पाठबळ*; *राणे समर्थकांची अनुपस्थिती..*

*राणेंचे वर्चस्व कमी करण्यासाठी प्रदेशचे प्रयत्न..?*
*…तरीही जिल्ह्याचे राजकारण राणेंच्या भोवतीच*

सिंधुदुर्ग जिल्हा भगवामय होवो अथवा काँग्रेसचा हात घेऊन राहो.. जिल्ह्याचे राजकारण राणेंच्या भोवतीच घुटमळत राहिले. खास.नारायण राणे या नावाचेच एवढे वलय होते की कार्यकर्त्यांची फौज त्यांच्या भोवताली असायची. राणेंनी आपले कार्यकर्ते देखील तसेच जपले, पोसले, वाढवले…नेतृत्वगुण त्यांच्यात तयार केले. त्यामुळेच जिल्ह्यातील सर्वच सत्तास्थाने राणेंकडे राहिली. राणे शिवसेनेत असताना असो की काँग्रेसमध्ये असताना त्या त्या पक्षाची जिल्ह्यात सत्ता असायची. आज राणे भाजप मध्ये आहेत तर जिल्हा भाजपमय झाला आहे. परंतु भाजपच्या या सत्तेत राणे समर्थक अग्रस्थानी असल्याने शत प्रतिशत भाजप म्हणताना काहींची जीभ अडखळते अन् आवंढा गिळताना मध्येच ठसका लागतो. त्यामुळे राणे समर्थक हे बिरूद काढून टाकण्यासाठी हरेक प्रयत्न केले जात आहेत. म्हणजेच राणेंचे वर्चस्व कमी करून जिल्ह्यात भाजप रुजवायची आहे. पण, ….!

सावंतवाडी शहरात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी विशाल परब यांच्या जनसंपर्क कार्यालयात पत्रकार परिषद घेतली आणि सरकारच्या वर्षपूर्ती, सरकारची कामे यांचा आढावा घेत भविष्यातील संकल्प विषद केले. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेण्यासाठी विशाल परब यांचे कार्यालय निवडले परंतु चार दिवसांपूर्वी नगरपालिका निवडणूक झाली ज्याचा निकाल येणे अजून बाकी आहे, त्या निवडणुकीत ज्या राजघराण्याचा उदोउदो केला आणि राजघराण्याचे राजकारण करून निवडणुकीत त्याचा वापर केला ते पाहता आजची पत्रकार परिषद राजवाड्यात जर पत्रकार परिषद घेतली असती तर भाजपला राजघराण्याबद्दल किती प्रेम आहे याची खरी जाणीव सावंतवाडीकरांना झाली असती. परंतु आजच्या पत्रकार परिषदेत त्याच राजघराण्यातील युवराज कार्यकर्त्यांच्या भूमिकेत बसले होते हे देखील सत्य आहे. त्यामुळे राजघराण्याचा वापर केवळ निवडणुकीसाठीच केला गेला की काय..? असा भाबडा प्रश्न अनेकांना पत्रकार परिषद संपल्यावर पडल्याचे अनेकांच्या मुखातून बोलले गेले….आणि याचे एक कारण म्हणजे…चार दिवसांपूर्वी पर्यंत राजघराण्याचा मानसन्मान होत होता पण, आजच्या पत्रकार परिषदेत राजघराण्याचे नाव देखील घेतले गेले नाही. राजघराण्यापेक्षा विशाल परब यांचीच क्रेझ आजच्या पत्रकार परिषदेत जास्त होती आणि दुसरे कारण म्हणजे…भाजपची “वापरा आणि फेका” ही वृत्ती आहे. राज्यात शिवसेनेचा वापर करून भाजप निर्माण झाली, बस्तान बसवले पण आज शिवसेना कुठे आहे..? राणेंना घेऊन भाजप जिल्ह्यात वाढवली आहे राणे कुठे आहेत..? शिंदे शिवसेनेसोबत राज्यात सत्ता स्थापन झाली आज त्यांच्याशीच टोकाचे वाद आणि ०२ तारीख पर्यंत युती टिकविण्याची भाषा केली जाते हे ही खरंय ना.. फक्त सत्तेसाठी राजघराण्याचा तसाच वापर करून नंतर दूर करणार नाहीत ना…? असाही सूर दबक्या आवाजात आळवला जातोय हे ही नसे थोडके..!

नारायण राणेंचे वर्चस्व कमी करण्यासाठी विशाल परब यांना ताकद दिली जाते. पत्रकार परिषदेसाठी जिल्हाभरातील मूळ भाजपा कार्यकर्ते सावंतवाडीत दाखल होतात. विशाल परब समर्थक सभोवताली असतात. कधी नव्हे ते कार्यकर्ते आम.रवींद्र चव्हाण यांच्या सोबत फोटो घेण्यासाठी गर्दी करतात. परंतु यामध्ये राणे समर्थकांची अनुपस्थिती मात्र प्रकर्षाने जाणवते आणि भाजपमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचे दाखवून देते. विशाल परब यांना दिलेली ताकद सावंतवाडी शहर, तालुक्यात किती प्रभावी ठरली हे चव्हाणांचा छुपा पाठिंबा असतानाही मागील निवडणुकीत त्यांना मिळालेली(घेतलेली..?) मते पाहिली असता दिसून येते. कारण त्यावेळी खास.नारायण राणेंची ताकद, सोबत आणि त्यांचा शब्द दिपक केसरकर यांच्या पाठीशी होता… आणि तिथेच राणेंचे वर्चस्व अधोरेखीत झाले आहे. नक्कीच चव्हाणांच्या पाठिंब्यावर विशाल परब अर्थकारण करतील पण तो विश्वास, जनतेचा आशीर्वाद कमवायला त्यांना नक्कीच वेळ लागेल जो राणेंनी अख्खी हयात खर्च करून कमावला आहे. त्यामुळे राणेंचे वर्चस्व कमी करण्याच्या प्रयत्नात भाजप अस्तित्व पुन्हा जिल्ह्यात शोधावे लागू नये म्हणजे मिळवलं.

आजच्या पत्रकार परिषदेत भाजपमध्ये विशाल परब यांचे नेतृत्व पुन्हा एकदा अधोरेखीत झाले परंतु विशाल परब समर्थक केतन आजगावकर याने विशाल परब यांच्या आलिशान कार्यालयातून पत्रकार परिषद संपताच पत्रकारांना बाहेर पडण्यास सांगितले, अशी तक्रार कणकवलीतील पत्रकारांनी जिल्हाधक्ष प्रभाकर परब यांच्याकडे केली, त्यामुळे पत्रकारांचा वापर सुद्धा कामापुरताच की काय..? असा प्रश्न उपस्थित झाला. केतन आजगावकर यांच्याकडून झालेल्या चुकीबद्दल भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत आणि विशाल परब यांनी दिलगिरी व्यक्त केली. विशाल परब यांनी केतन आजगावकर यांना माफी मागायला लावली त्यावर हतबल होऊन केतन आजगावकर यांनी “सॉरी” बोलत माफी देखील मागितली…
परंतु….,

प्रतिक्रिया व्यक्त करा