You are currently viewing “राज्यात चौफेर विकासाची गती” — महायुती सरकारच्या एक वर्षांचा आढावा
Oplus_16908288

“राज्यात चौफेर विकासाची गती” — महायुती सरकारच्या एक वर्षांचा आढावा

शेतकरी पॅकेजपासून वाडवन पोर्टपर्यंत; सर्व क्षेत्रांत ‘नंबर वन महाराष्ट्र’ करण्याचा संकल्प

रवींद्र चव्हाण यांची पत्रकार परिषदेत माहिती

सावंतवाडी :

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारला एक वर्ष पूर्ण झाले असून, राज्यात दूरदृष्टी ठेवून चौफेर विकास चालू आहे, असे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकार एकत्रितपणे काम करत असल्याने सर्व प्रकल्प व योजनांसाठी निधी कमी पडणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच, २०२९ पर्यंत राज्याला सर्व क्षेत्रांत ‘नंबर वन’ करण्याचा संकल्प मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला असल्याचे त्यांनी सांगितले.

सावंतवाडी येथील भाजपच्या जनसंपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, रणजित देसाई, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष लखमराजे भोसले, युवराज्ञी श्रद्धाराजे भोसले, युवा नेते विशाल परब, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, शहराध्यक्ष सुधीर आडिवरेकर, महिला शहर अध्यक्षा मोहिनी मडगांवकर, प्रसन्ना देसाई, मनोज नाईक, ऍड. अनिल निरवडेकर तसेच पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

शेतकऱ्यांसाठी ३२ हजार कोटींचे पॅकेज

अलीकडील पावसाच्या कहरामुळे शेतीचे झालेले मोठे नुकसान लक्षात घेऊन शेतकऱ्यांना दुर्दशेतून बाहेर काढण्यासाठी राज्य सरकारने ३२ हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे.

मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा

मत्स्यव्यवसायाला कृषीचा दर्जा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सरकारने घेतला असून त्यामुळे मत्स्यव्यवसायिक व मासेमारी क्षेत्राला मोठा दिलासा मिळाला आहे.

शेतकरी सन्मान योजनेतून सक्षमीकरण

शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून ‘शेतकरी सन्मान योजना’ राबवली जात असून त्यांना अधिक सक्षम करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

रेल्वे व वाहतूक सुविधा

मुंबई व उपनगरांमध्ये रेल्वेच्या २३८ नवीन गाड्या खरेदीचा निर्णय घेतला आहे. एसी लोकल, मेट्रो व मोनोरेलचे जाळे विस्तारत असल्याने शहरांमधील वाहतूककोंडीची समस्या कमी होत आहे.

समृद्धी व शक्तिपीठ महामार्ग

समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर शक्तिपीठ महामार्गासाठीही प्रयत्न सुरू असून त्यामुळे पायाभूत सुविधा आणखी मजबूत होणार आहेत.

परदेशी विद्यापीठांशी करार

नवी मुंबई भागात ५ परदेशी विद्यापीठांचे करार झाले असून विद्यार्थ्यांना परदेशात न जाता येथेतच जागतिक दर्जाचे शिक्षण उपलब्ध होणार आहे.

महिला सक्षमीकरण

‘लाडकी बहिण योजना’ सुरूच राहणार असून महिलांच्या उन्नतीसाठी नव्या योजना राबवल्या जात आहेत.

जलसंधारण व सिंचन प्रकल्प

सिंचनाचे अनेक प्रलंबित प्रकल्प मार्गी लावण्यात आले असून ‘जलयुक्त शिवार’ अंतर्गत मोठी कामे झाली आहेत.

ऊर्जा व शिक्षण क्षेत्रातील धोरणे

१०० सौर ग्राम संकल्प : १०० गावांपैकी १५ गावे पूर्णवीजदर कपात : २५ वर्षांतील ऐतिहासिक कपात, सौरऊर्जेमुळे बचत वाढवण्याचे प्रयत्न.

महिलांच्या उत्पादनांसाठी ‘उमेद’चे मॉल

१० जिल्ह्यांमध्ये ‘उमेद’चे मॉल तयार करण्याचे काम सुरू असून महिलांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळणार आहे.

गुंतवणूक आणि रोजगार

देशातील सर्वाधिक गुंतवणूक महाराष्ट्रात होत असून उद्योगधंद्यांत वाढ झाल्याने रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होत आहेत.

शासकीय नोकरभरती

पोलिस भरती अंतर्गत ४५ हजारांहून अधिक युवकांची भरती करण्यात आली आहे. इतर शासकीय विभागांतील भरती प्रक्रियाही सुरू असून प्रलंबित नोकर्‍या उपलब्ध होणार आहेत.

वाडवन पोर्टमुळे १० लाखांहून अधिक रोजगार

आशियातील सर्वात मोठा वाडवन पोर्ट महाराष्ट्राच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार असून या प्रकल्पातून १० लाखांहून अधिक रोजगार निर्माण होणार आहेत.

शेवटी चव्हाण यांनी स्पष्ट केले की, या सर्व उपक्रमांच्या माध्यमातून ‘गतिमान महाराष्ट्र’ निर्माण करण्यासाठी महायुती सरकार प्रयत्नशील आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा