♦लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकजण राज्य परिवहन महामंडळाच्या लालपरीशी थोड्याफार प्रमाणात तरी संबंधित असतोच. कित्येक मुले शाळा कॉलेजला जाण्यासाठी, काहीजण नोकरी उद्योगांमुळे, तर काही गावी, परगावी जाण्यासाठी लालपरीने गेलेला असतोच. त्यामुळे बऱ्याचजणांना तिच्याबद्दल आत्मीयता, आपुलकी असते.परंतु शिक्षण झाल्यावर पोटापाण्याचा जेव्हा प्रश्न उभा राहतो आणि राज्य परिवहन महामंडळाच्या सेवेत एखादी व्यक्ती दाखल होऊन कामावर रुजू होते त्या व्यक्तीसाठी मात्र एसटी म्हणजे जीवनदायिनीच असते. आयुष्यभर एसटी महामंडळात नोकरी केल्याने आणि एसटी मधून दिवसरात्र फिरल्यामुळे लालपरीचे आणि त्या कर्मचाऱ्यांचे एक वेगळे भावनिक नाते तयार होते. आणि जेव्हा त्याच आयुष्यातील आपल्या सोबतीनीला वाटेत अर्ध्यावर सोडून निरोप देण्याची वेळ येते तेव्हा तिच्यावर जिवापाड प्रेम करणाऱ्या कर्मचाऱ्याने तिच्यासमोर नतमस्तक होत भावनांना वाट मोकळी करून दिली, याचा प्रत्यय आला तो वेंगुर्ला बस डेपोमध्ये सेवेतून निवृत्त झालेले वाहक सी.बी.जाधव यांच्या निरोपाच्या वेळी.
♦गेले चार महिने लॉकडाऊनमुळे सर्वच गाड्यांची चाके रस्त्यावर आलेलीच नाहीत, एसटीची सुद्धा परिस्थिती त्याहून वेगळी नाही. राज्यातील लालपरी सुद्धा आपल्या जागेवरच थांबली आहे. अलीकडेच काही प्रमाणात एसटी वाहतूक सुरू झाली आणि त्यातच वेंगुर्ला आगाराचे वाहक सी.बी.जाधव हे सेवानिवृत्त झाले. आपल्या आयुष्यातील प्रदीर्घ काळ ज्या लालपरी सोबत घालवला, जिने पोटापाण्याचा प्रश्न सोडवला, आपल्या पायावर उभे राहण्याचे बळ दिले, संसार सांभाळला, चार पैसे दिले, मानसन्मान दिला तिला निवृत्त होताना अर्ध्यावर सोडून जाताना सी.बी.जाधव भावूक झाले, त्यांचे डोळे पाणावले आणि एसटी समोर गुडग्यावर बसत नतमस्तक होत तिच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करताना ढसाढसा रडून उपस्थितांचे मन हेलावून सोडले. समोर घडलेला हा प्रसंग काळजाला चिरून गेला. आपणास सोबत केलेल्या एसटी ला सोडून जाताना सुद्धा माणूस किती हेलावतो, त्याचं मन त्याच्या कामात किती गुंतलेलं असतं याचा प्रत्यय या घटनेवरून आला.
♦वेंगुर्ला आगारात वाहक म्हणून अनेक वर्षं सेवेत असणारे सी.बी.जाधव हे आपल्या कामाप्रती अत्यंत प्रामाणिक आणि प्रवाशांबद्दल त्यांना आत्मीयता होती. एसटी च्या प्रवाशांशी त्यांचे वागणे खूप चांगले असायचे, त्यामुळे प्रवासी वर्गात त्यांच्याबद्दल आपुलकी आहे. दोन दिवसांपूर्वीच ते वेंगुर्ला आगारातून आपल्या प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त झाले.