शिकारीदरम्यान युवकाचा मृत्यू; दोघे संशयित पोलिसांच्या ताब्यात
सावंतवाडी
वेर्ले गावात आज सकाळी सुमारे साडेअकराच्या सुमारास घडलेल्या दुर्दैवी अपघातात सचिन मर्गज (वय ३५, रा. कोलगाव) या तरुणाचा मृत्यू झाला. दोन साथीदारांसह शिकारीसाठी जंगलात गेलेल्या सचिनला चुकून सुटलेली गोळी लागल्याची माहिती आहे.
घटनेची माहिती मिळताच मृत युवकाच्या वडिलांनी सावंतवाडी पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत कोलगाव येथील श्रीपियन आणि त्याच्या एका साथिदाराला ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून घटनेची सविस्तर चौकशी सुरू आहे. गोळी नेमकी कोणत्या परिस्थितीत चालली याचा तपास पोलीस करत आहेत.
घटनास्थळी पंचनामा करण्यात आला असून, सचिनचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सावंतवाडी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. या अनपेक्षित घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून स्थानिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिस तपास सुरूच आहे.

