*नमस्कार महोत्सवात हसताहसता श्रोते अंतर्मुख*
पिंपरी
नमस्कार फाउंडेशन आयोजित पाच दिवसीय नि:शुल्क ‘नमस्कार महोत्सव २०२५’ मध्ये गुरुवार, दिनांक ०४ डिसेंबर २०२५ रोजी शरद जाधव प्रस्तुत ‘हास्यजत्रा’ या धमाल एकपात्री कार्यक्रमात हसताहसता अंतर्मुख झालेल्या श्रोत्यांच्या नकळत डोळ्यांच्या कडा पाणावल्या. एस. टी. स्टॅण्डवरील गमतीजमती, पांडातात्या या इरसाल राजकारण्याचे अजब कारनामे, सरपंचीण रखमाबाईचा गावरान ठसका, ग्रामीण भागातील तरुणांचा अतिबिकट झालेला लग्नाचा प्रश्न, मुलगी पाहण्याचा कार्यक्रम, महिलांची दागिन्यांचे प्रदर्शन करण्याची अनिवार हौस, निर्मलग्राम योजनेचा फज्जा हे विनोदाच्या माध्यमातून मांडणाऱ्या शरद जाधव यांनी शहरातील शिष्टाचाराचा अतिरेक करणार्यांना खेड्यातील निखळ, निर्मळ माणुसकीचे दर्शन कसे सद्गदित करून टाकते, हे अत्यंत प्रभावीपणे कथन करीत उपस्थितांना गहिवरून टाकले. त्याआधी ऑर्केस्ट्रा मिलेनियम स्टार या संगीतवृंदाने जुन्या नव्या श्रवणीय चित्रपटगीतांचे सुरेल सादरीकरण करीत श्रोत्यांकडून वन्स मोअरसह उत्स्फूर्त दाद मिळवली. विशेषत: “कजरा मोहब्बतवाला…” , “एक नंबर तुझी कंबर…” , “झिंग झिंग झिंगाट…” या उडत्या चालीच्या भन्नाट गाण्यांवर ज्येष्ठ नागरिक आणि महिला श्रोतृवर्गाने आपले वय विसरून मनमुराद नृत्य केले. मनोज सेठिया, सुजाता जोशी, अंजन घोष, प्रज्ञा गौरकर या गायक कलाकारांना मनीष सबनानी (रिदम मशीन), अमन सय्यद (की बोर्ड), हर्षल गनबोटे (ढोलक, तबला) या वादकांनी साथसंगत केली. दरम्यान प्रियंका पांडे या युवतीने मनमोहक लावणीनृत्याने प्रेक्षकांच्या टाळ्या अन् शिट्ट्या वसूल केल्या. सामाजिक कार्यकर्ते सलीम शिकलगार, सरिता साने आणि नमस्कार फाउंडेशनचे अध्यक्ष सुहास जोशी यांनी कलाकारांना सन्मानित केले. प्रियंका आचार्य यांनी सूत्रसंचालन केले आणि आभार मानले.
त्यापूर्वी, बुधवार, दिनांक ०३ डिसेंबर २०२५ रोजी नियोजित महापौर निवासस्थान मैदान, निगडी प्राधिकरण येथे अनुप स्पोर्ट्स फाउंडेशनच्या मदतीने नमस्कार फाउंडेशन आयोजित पाच दिवसीय नि:शुल्क ‘नमस्कार महोत्सव २०२५’चे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी माजी उपमहापौर शैलजा मोरे, सामाजिक कार्यकर्ते सलीम शिकलगार, अतुल भोंडवे, रमेश कस्तुरे, प्रीतमराणी शिंदे, सीमा हिमने, चंद्रशेखर जोशी, अण्णा हिंगे, मुन्ना बेग, सुनीता खुणे, सचिन सोनवणे, मनोज देशमुख, जगन्नाथ वैद्य या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सलीम शिकलगार यांनी, ‘समाजाचे शारीरिक, मानसिक आणि सांस्कृतिक आरोग्य सुदृढ व्हावे या उद्देशाने पिंपरी – चिंचवडसह संपूर्ण महाराष्ट्रात २००३ पासून नमस्कार महोत्सवाचे दरवर्षी नि:शुल्क आयोजन केले जाते. कोविड काळात असाहाय्य, गोरगरीब आणि रुग्ण यांच्यासाठी ‘रोटी बँक’ या उपक्रमाच्या माध्यमातून फाउंडेशनच्या वतीने मोफत भोजन पुरविण्यात आले होते.’ अशी माहिती दिली. त्यानंतर शब्दरंग कला – साहित्य कट्टा या संस्थेतील ज्येष्ठ नागरिक कलाकारांनी ‘इंद्रधनू’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध कलांचे सादरीकरण केले.
– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२

