पूर्ण झालेल्या 13 घरांचा एकाच दिवशी गृहप्रवेश; खासदार नारायण राणे यांच्या हस्ते चावी वितरण
कणकवली :
कलमठ ग्रामपंचायतीच्या प्रधानमंत्री आवास योजना संकुलाचा शुभारंभ मोठ्या उत्साहात सरपंच संदीप मेस्त्री यांच्या हस्ते संपन्न झाला. बेघर आणि भूमिहीन कुटुंबांसाठी उभारण्यात आलेल्या 13 घरांच्या संकुलाचे उद्घाटन हा जिल्ह्यातील पहिलाच असा उपक्रम ठरला आहे. कलमठ गावातील अनेक कुटुंबांकडे स्वतःची जमीन नसल्याने घर बांधणे कठीण होते; मात्र ग्रामपंचायतीने पुढाकार घेत एकत्रित संकुल उभारत त्यांना स्थिर छत मिळवून देण्याचा मार्ग मोकळा केला आहे.
‘कारकीर्दीतिल समाधान देणारे कार्य’ – सरपंच संदीप मेस्त्री
ग्रामपंचायत माध्यमातून राबवलेल्या अनेक उपक्रमांपैकी हा उपक्रम माझ्या मनाला समाधान आणि आनंद देणारा असल्याचे सरपंच मेस्त्री यांनी सांगितले. बेघर व भूमिहीनांना मदतीचा हात म्हणून हा प्रकल्प उभा राहील, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
संकुलाला ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय संकुल’ हे नाव
‘पंडित दिनदयाळ योजना’ अंतर्गत लाभार्थ्यांना जमीन खरेदीसाठी प्रस्ताव पाठवण्यात आला असून शासनाकडून अनुदान मिळवून देण्याचे काम सुरू आहे.
भूमिहीन लाभार्थ्यांसाठी विशेष शिबिर घेऊन तहसील कार्यालय आणि ग्रामपंचायतीच्या सहयोगाने सर्वांना एकाच दिवशी भूमिहीन दाखले उपलब्ध करून देण्यात आले. यामुळे अनुदान आणि पुढील प्रक्रिया वेगाने पार पडण्यास मदत झाली.
लवकरच भव्य गृहप्रवेश सोहळा
सर्व 13 घरांचा गृहप्रवेश एकाच दिवशी करण्यात येणार असून खासदार नारायण राणे व पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते चाव्या प्रदान केल्या जातील, अशी माहिती सरपंच मेस्त्री यांनी दिली.
ग्रामपंचायत अधिकारी प्रविण कुडतरकर, महेश लाड, स्वप्निल चिंदरकर, अनुप वारंग, नितीन पवार, श्रेयस चिंदरकर, मिलिंद चिंदरकर, हेलन कांबळे, खुशाल कोरगावकर, गणेश सावंत, सचिन पोळ यांसह सर्व लाभार्थी उपस्थित होते.

