*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*तुझी माझी प्रीत सजणा…*
तुझी माझी प्रीत सजणा फुल गुलाबाचे
असले रे काटे म्हणूनी दु:ख काय त्याचे?….
काट्यावाचूनी ना फुलतो कधीही तो गुलाब
टोचला जरी का थोडा वाटतो लाजवाब…
सुखदु:खे पांघरावी खूप खूप मजा येते
लपंडाव पाऊस ऊनं इंद्रधनू होते
क्षितिजी तो श्रीरंगाचा पहा रंगारंग खेळ
ऊन सावलीचा अजबच जीवनात मेळ…
फुलते तुज पाहूनी मी नित्य शहारते अंग
स्वप्न मी नित्यच बघते तुझ्यातच दंग
जीवाशिवाची ही जोडी असू दे रे अभंग
सुकोमल मनभावन हा वाटतो तुझा संग…
प्रेमभाव नयनातील ते लाजवंती होते
इतके का सुंदर असते प्रियाशी हे नाते
त्रिभुवनातील उज्वल नात्यास ना नांव
त्याहून रे सुंदर असती तुझे माझे भाव..,
प्रेमावरती या टिकते संसाराची डोल नाव
मनामनातून वसते प्रियकाराचे गांव
हात तुझा माझ्या हाती मला रे पुरेसा
जाणते मी नजरेने नित्य तुझी प्रेम भाषा…
प्रा. सौ. सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)

