*ज्येष्ठ लेखिका कवयित्री गझलकारा सुनंदा पाटील “गझलनंदा” लिखित अप्रतिम पाळणा गीत*
*श्री दत्ताचा पाळणा*
अत्रीनंदन त्रैमुर्ती तुज गाते अंगाई
*अनसुया झोका तुज देई* ॥ धृ॥
पतीव्रतेची घेत कसोटी तीन देव भूवरी
ओळखिले ते अनसूयेने भक्तीने अंतरी
पतीव्रतेच्या त्या तेजाने ईश बालके होई
॥१॥
*अनसुया झोका तुज देई*
तीन देवता पृथ्वीवरती पती शोधण्या आल्या
ओळखिले ना पतीस अपुल्या खजील मनी झाल्या
अनसूयेचे सत्व पाहुनी लागतसे पायी ॥२॥
*अनसुया झोका तुज देई*
ब्रह्मा विष्णू महेश यांनी मातेसी प्रार्थिले
तीन देवही एक होऊनी अत्री गृही राहिले
त्रैमुर्तीचे रूप साजिरे निरखितसे माई ॥३॥
*अनसुया झोका तुज देई*
तीन शिरे अन् सहा करांच्या त्रिगुणात्मक रुपात
अनसूयेने बाळ देखणे ओळखिले निमिषात
वत्सल माता पावन झाली देव म्हणे तिज आई ॥४॥
*अनसुया झोका तुज देई*
गुरूदत्ताचे रुपडे लोभस न्याहळिते माता
जगतासाठी त्रिगुण मूर्ती त्रैलोक्याचा त्राता
पाळण्यातले अमोल वैभव गीत माय गाई
॥५॥
*अनसुया झोका तुज देई*
प्रा .सुनंदा पाटील मुंबई
८४२२०८९६६६
