*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*कौमुदी तू ..उरात तू ..!!*
नाजूक तर्जनीच्या नर्तनाने
मस्तकी धारण तुझी ..प्रभा
भ्रुकुटीच्या मनोहर आकुंचनानं
दिगंत व्यापली तुझी.. आभा
अतरंगी तू..अविरत तू
स्पर्शगंध तू..स्पंदनात तू
कौमुदी तू….उरात तू
निर्मल तू….शीतल तू ..
अंगावरच्या अंशुकाच्या अपहरणानं
सूर्यकिरणांना उमलवसं..तू
ब्रम्हांडाची …कूस उजवलीस
आता ..अवनीचे ऋण.. फेड तू ..
आकाशी …ईश्वराने शंख फुंकले
फुललेल्या पिसा-याने..पुष्पवृष्टी केली
मंगलदिनी ..अवतार घेऊनी वेदीवर
रूपमय तेजोमय प्रतिमा अवतरली
मांगल्यार्थ हळद कुंकू चिमटीत
धरेचे डोळे ..आनंदाश्रूनी भरले
लज्जेने सद्गदित सुसंस्कारित स्पर्शाने
ऐश्वर्याला साजेसे सुवर्णपर्ण दिले
बाबा ठाकूर
