शांत, सुव्यवस्थित मतदानाबद्दल मतदारांचे आभार; विक्रमी मतदानाने लोकशाही अधिक बळकट
कणकवली :
सिंधुदुर्गातील चारही नगरपरिषद–नगरपंचायतीमध्ये भारतीय जनता पक्षाचाच झेंडा फडकेल, असा ठाम विश्वास पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला. कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि खासदार नारायण राणे यांच्या सहकार्याचा उल्लेख करीत वरिष्ठ नेतृत्वाचे आभार मानले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकांना मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत सरासरी ७०% पेक्षा जास्त मतदानाची नोंद झाली.
कणकवलीत सर्वाधिक ७९%, सावंतवाडीत ६५%, वेंगुर्ल्यात ७१%, तर मालवणमध्ये ७०% च्या आसपास मतदान झाले. शांत आणि सुव्यवस्थित मतदानाबद्दल जिल्हावासीयांचे मनापासून आभार मानताना मंत्री राणे म्हणाले की, “सिंधुदुर्ग पुन्हा एकदा लोकशाहीची प्रतिष्ठा राखणारा जिल्हा म्हणून सिद्ध झाला आहे.”
मतदान प्रक्रियेदरम्यान जिल्हा प्रशासन व पोलिस दलाने उत्तम समन्वय साधून सुरक्षित वातावरण निर्माण केल्याचेही त्यांनी कौतुक केले.
भाजपच्या उमेदवारीबाबत बोलताना ते म्हणाले, “चारही नगरपरिषदांमध्ये ८१ नगरसेवक आणि ४ नगराध्यक्ष पदांचे उमेदवार उभे करण्यामागे संघटनेची ताकद आणि कार्यकर्त्यांची मेहनत आहे.” जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या नेतृत्वाचे विशेष कौतुक त्यांनी केले.
महायुतीतील वातावरणाबाबत बोलताना राणे म्हणाले की, सिंधुदुर्गातील राजकारणाची संस्कृती वेगळी असून निवडणुकीनंतर सर्वजण विकासासाठी एकत्र येतात. आरोप–प्रत्यारोप निवडणुकीपुरतेच मर्यादित राहावेत, असेही त्यांनी नमूद केले.
सिंधुदुर्ग हा अधिकृत पर्यटन जिल्हा असल्याने त्याची प्रतिमा अबाधित ठेवणे अत्यावश्यक असल्याचे सांगून ते म्हणाले की, “निवडणुका संपल्या आहेत. आता पुन्हा पर्यटनवाढ, रोजगारनिर्मिती आणि विकासाच्या दिशेने सर्वांनी एकत्र पुढे जावे.”
शांत मतदानासाठी जिल्हावासीयांनी दाखविलेल्या लोकशाहीशीलतेबद्दल पालकमंत्री नितेश राणे यांनी पुन्हा एकदा सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले.
