You are currently viewing दीपावली किल्ला संस्कृतीचा भव्य सोहळा – संजीवनी संस्थेच्या किल्ला बांधणी स्पर्धेचा यशस्वी समारोप

दीपावली किल्ला संस्कृतीचा भव्य सोहळा – संजीवनी संस्थेच्या किल्ला बांधणी स्पर्धेचा यशस्वी समारोप

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

संजीवनी सेवाभावी सामाजिक संस्था, गुंदवली, अंधेरी यांच्या वतीने आयोजित दीपावली किल्ला बांधणी स्पर्धा – २०२५ चा जाहीर बक्षीस वितरण समारंभ रविवारी, दि. ३० नोव्हेंबर २०२५ रोजी संपन्न झाला. कार्यक्रम उत्साहात आणि सांस्कृतिक भक्तिभावाने भरलेला होता. दिवाळीच्या सोहळ्यात मिसळलेल्या किल्ला संस्कृतीने परिसरात वेगळीच चेतना निर्माण केली. मुलांच्या कल्पकतेतून आणि तरुणांच्या सर्जनशील प्रयत्नांतून उभे राहिलेले किल्ले पाहताना मराठी वारशाची दिमाखदार छटा प्रत्येकाला भावून गेली.

या स्पर्धेत पाच संघांना पारितोषिके देण्यात आली. त्यापैकी प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या संघांना रोख रक्कम, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. तसेच उत्तेजनार्थ दोन संघांचा सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन विशेष गौरव करण्यात आला. सहभाग महत्वाचा या मूल्याला पुढे नेत सर्व सहभागी संघांना सन्मानपत्र दिले गेले, ज्यामुळे स्पर्धेचा आनंद आणि प्रेरणा अधिक वृद्धिंगत झाली. पारितोषिक वितरणाच्या वेळी प्रेक्षकांच्या टाळ्यांचा कडकडाट आणि विजेत्यांचे आनंदित चेहरे कार्यक्रमाला अधिक रंगत आणत होते.

कार्यक्रमाला संस्थेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यात अध्यक्ष गणेश निकम, उपाध्यक्ष जगदिश जयसिंग कुवळेकर, कार्याध्यक्ष सुनिल लक्ष्मण प्रभू, सचिव आनंदराव जाधव, उपसचिव दिलीप श्रीधर सकपाळ, खजिनदार मोहन नाना दाबेकर, उप-खजिनदार तुकाराम सहदेव सणस, सोशल मिडिया प्रमुख तसेच जनसंपर्क अधिकारी दिपक विठोबा राणे यांचा सक्रिय सहभाग उल्लेखनीय ठरला. महिला कार्यकारी अधिकारी सुवर्णा तुकाराम खिडबिडे आणि कार्यकारी संघटक — सुभाष लक्ष्मण सकपाळ, कंचन संभाजी तेली, राजेंद्र सदाशिव हापटे, निलेश किसन बाकाडे, जितेंद्र पांडुरंग जुनघरे, सतीश यादव आणि अर्चना हरेश पांचाळ यांनी कार्यक्रमाचे आयोजन सुरळीत पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले.

समारंभाला नाटककार तसेच ज्येष्ठ पत्रकार दशरथ राणे, समाजसेवक उद्योजक संतोष रहाटे आणि समाजसेविका तरुणा कुंभार यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला अधिक प्रतिष्ठा लाभली. स्पर्धेचे परीक्षण साहित्यिक पत्रकार गुरुदत्त वाकदेकर यांनी केले. त्यांच्या सूक्ष्म, वस्तुनिष्ठ आणि अभ्यासपूर्ण परीक्षणामुळे विजेत्यांची निवड अत्यंत पारदर्शक आणि दर्जेदार ठरली. मान्यवरांच्या शुभेच्छा आणि मार्गदर्शनाने मुलांमध्ये संस्कृतीविषयक जाणीव अधिक दृढ झाली.

दिवाळीचा उत्सव, किल्ला संस्कृतीचा परंपरागत वारसा, सर्जनशीलतेचा आविष्कार आणि समाजातील एकतेची जाणीव या स्पर्धेत सुंदरपणे अनुभवायला मिळाली. संजीवनी सेवाभावी सामाजिक संस्थेचा हा उपक्रम केवळ स्पर्धा न ठरता, परंपरेचा अभिमान जागवणारा, नव्या पिढीला प्रेरणा देणारा आणि समाजातील सांस्कृतिक ऐक्य अधिक मजबूत करणारा अविस्मरणीय सोहळा ठरला.

प्रतिक्रिया व्यक्त करा