मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :
अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै. आबा पडते राज्यस्तरीय मराठी एकांकिका स्पर्धा २०२५ ची अंतिम फेरी स्वा. सावरकर सभागृह, दादर येथे प्रेक्षकांच्या उत्साही गर्दीत पार पडली. नवोदित कलावंतांच्या सर्जनशीलतेला व्यासपीठ देणाऱ्या या स्पर्धेला परीक्षक म्हणून प्रियदर्शन जाधव, कादंबरी कदम आणि अनिकेत विश्वासराव उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून जयवंत वाडकर ह्यांच्या उपस्थितीमुळे सोहळ्याला अधिक भारदस्त स्वरूप लाभले.
अंतिम फेरीत स्वातंत्र्य सौभाग्य (मुलुंड वाणिज्य महाविद्यालय), पाकिस्तानचं यान (नाट्यांकुर), द गर्दभ गोंधळ (वझे महाविद्यालय), थिम्मक्का (ज्ञानसाधना महाविद्यालय) आणि मढं निघालंय अनुदानाला (कलांश थिएटर) या पाच एकांकिकांचे सादरीकरण झाले. विषयवैविध्य, धारदार संवाद, दिग्दर्शनातील पकड आणि कलाकारांच्या उत्कृष्ठ सादरीकरणामुळे सभागृहात क्षणोक्षणी टाळ्यांचा कडकडाट होत होता.
स्पर्धेचा उत्कर्षबिंदू ठरलेल्या मढं निघालंय अनुदानाला या एकांकिकेने सर्वोत्कृष्ट एकांकिका प्रथम पारितोषिक पटकावले, तर पाकिस्तानचं यान द्वितीय क्रमांकावर निवडले गेले. उल्लेखनीय कलाविष्कारासाठी द गर्दभ गोंधळ आणि थिम्मक्का यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.
वैयक्तिक पुरस्कारांतही तरुण कलावंतांनी दमदार कामगिरी केली. सर्वोत्कृष्ट लेखक: प्रतीक चौधरी (मढं निघालंय अनुदानाला), दिग्दर्शन: महेश कापरेकर व सागर चव्हाण (मढं निघालंय अनुदानाला), नेपथ्य व प्रकाशयोजना: सिद्धेश नांदस्कर (थिम्मक्का), संगीत: सुबेध माकंडकर व चिन्मय सावंत, रंगभूषा: तेजश्री पिलनकर, वेशभूषा: मैथिली मोडे व प्रिया ढगे (पाकिस्तानचं यान).
अभिनय विभागात ओमकार काकडे, प्रसनजीत गायकवाड, राहुल पेडणेकर आणि अपर्णा घाघरे यांचे सादरीकरण विशेष ठरले. सहाय्यक अभिनेत्री म्हणून प्रचिती जामभावकर, सहाय्यक अभिनेता पुरस्कार विजित थिस, तर विनोदी भूमिका साकारल्याबद्दल सेजल जाधव यांना पारितोषिक देण्यात आले.
संपूर्ण स्पर्धेत तरुण कलाकारांनी दाखवलेली ऊर्जा, निपुणता आणि व्यावसायिकता पाहून प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. रंगभूमीच्या नव्या पिढीने आपली प्रयोगशीलता, नाट्याभिनय आणि कलात्मकता यांची प्रगल्भ झलक अंतिम फेरीत सादर केली. दादरच्या सांस्कृतिक परंपरेला साजेसे असे हे दर्जेदार नाट्यपर्व यंदाही उत्साहात आणि तरुण कलावंतांच्या प्रभावी सादरीकरणाने यशस्वीरीत्या पार पडले आणि उपस्थितांवर अविस्मरणीय ठसा उमटवला.
