सावंतवाडी नगरपालिकेची निवडणूक पैशांच्या वाटपावरून गाजत आहे. मतदारांची मागणी नसताना देखील चढाओढीच्या राजकारणामुळे सत्तेतील भाजपा आणि शिंदे शिवसेनेने शहरातील सरासरी सर्वच प्रभागात पैशांचे वाटप केल्याचे समजत असून खासकीलवाडा प्रभाग ७ आज पर्यंतचा मतांसाठी पैसे वाटण्याचा विक्रम मोडीत काढत ३००००/- प्रति मतदार हे अत्युच्च शिखर गाठून सर्वात पुढे आहे. त्यामुळे तिथे संजू परब आणि उदय नाईक यांच्यातील लढतीत भाजप शिवसेनेचे नव्हे तर संजू परब आणि विशाल परब यांची प्रतिष्ठा पणाला लागली असून दोघांपैकी कोण वर्चस्व राखतो हे पाहणे औस्तुक्याचे ठरले आहे.
पैसे वाटपाच्या कार्यक्रमात प्रभाग १, प्रभाग ३ आणि प्रभाग ४ मध्ये भाजपच्या उमेदवारांचे पैसे अनेक घरांमध्ये पोच झाले आहेत. परंतु या तिन्ही प्रभागात शिवसेनेच्या शिंदेगटाकडून अनेकांना पैशांची पाकिटे पोच न झाल्याने शिवसेनेच्या मतदारांची नाराजी प्रकर्षाने दिसून येत आहे. अनेकांनी आपल्याला पैसे पोच न झाल्याने उमेदवारांना आणि त्यांच्या प्रतिनिधींना फोन करून नाराजी व्यक्त केल्याचेही सूत्रांकडून समजले आहे. याबाबत काही मतदारांशी बोलल्यावर त्यांच्या बोलक्या प्रतिक्रिया ऐकू आल्या त्या अशा…
दोन्ही पक्षांनी पैसे वाटप केले आहेत. आम्ही पैशांसाठी मतदान करत नाहीत परंतु जर दोन्ही पक्ष पैसे वाटत असतील तर शेजाऱ्यांना पैसे मिळतात ते आम्हाला का मिळत नाहीत…?
आम्हाला कमळाला मत देण्याची इच्छा नाही पण जर सगळीकडे वाटलेले पैसे आम्हाला मिळाले नाहीत तर नोटा ला मत देऊ परंतु आमच्यासाठी आलेली पाकिटे ठकवलेल्या शिवसेनेच्या उमेदवारांना मत देणार नाही.
शिवसेना पक्षाकडून आलेले पैसे उमेदवारांनी आणि पैसे वाटप करणाऱ्या मध्यस्थांनी गडप केलेत. त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील.
आम्ही आमचा हक्क आजपर्यंत बजावत आलो पण आता सरकारच आमच्याकडून दामदुप्पट जीएसटी घेऊन आम्हाला लुटते आहे मग पाच वर्षातून मिळणारे पैसे आम्ही का घेऊ नयेत..?
अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मिळत नसल्याने प्रभाग १/३/४ मधील शिवसेनेच्या सीट धोक्यात असल्याचे खात्रीलायक वृत्त सूत्रांकडून समजत आहे.
