जिल्हाधिकारी यांच्या हस्ते अनाथ प्रमाणपत्राचे वाटप
सिंधुदुर्गनगरी
महिला व बाल विकास विभागामार्फत अनाथ प्रमाणपत्र देण्यासाठी योजना राबविण्यात येत आहे. यायोजनेंतर्गत जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या हस्ते ०५ लाभार्थींना अनाथ प्रमाणपत्र वाटप करण्यात आल्याची माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी बापू भिकू शिणगारे यांनी दिली.
ज्या बालकाचे वय १८ वर्षाच्या आत असताना आई व वडील दोघेही मयत झाल्यास अशा बालकांना अनाथ प्रमाणपत्र देण्यात येते. त्यामुळे नोकरी व शिक्षणासाठी एक टक्का आरक्षण मिळण्यास मदत होते. अशा अनाथ मुलांना राज्य शासनाच्या विविध सवलतींचा लाभ घेता यावा, याकरीता महिला व बालविकास विभागामार्फत संस्थात्मक व संस्थाबाह्य प्रवर्गातून अनाथ प्रमाणपत्र निर्गमित करण्यात येत आहे. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयामार्फत आज अखेर ६१ अनाथ प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.
यावेळी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी विश्वनाथ कांवळी संरक्षण अधिकारी मिलन कांबळे तसेच कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
