You are currently viewing पालक सभा

पालक सभा

*के. रा. कोतकर माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय डोंबिवलीचे प्रा. प्रशांत शिरुडे लिखित लेख*

 

*पालक सभा*

 

प्रकाशाच्या सणाने सगळं जग उजळून निघताच थंडीची गुलाबी चाहूल लागते. सृष्टी धुक्याची शाल पांघरते. अशा हुड-हुडी भरणाऱ्या थंडीत शाळेच्या उत्साहित आणि उल्हासित आनंद पर्वाला सुरुवात होते. हे शैक्षणिक पर्व अभ्यासाबरोबर भविष्याची नांदी देणारे ठरते. कला, खेळ, मनोरंजन, स्नेहसंमेलन भरगच्च हे दुसरे सत्र म्हणजे आनंदाची पर्वणीच. या सगळ्यांचे योग्य नियोजन करण्यासाठी सुसंवाद साधण्यासाठी शिक्षक-पालक सभा सुरू होतात. द्वितीय सत्राची सुरुवात होताच शाळा-शाळांमध्ये पालक सभा लागतात. प्रामुख्याने ‘प्रथम सत्राचा निकाल आणि त्यानंतर होणारे विविध शालेय उपक्रम’ हा या पालक सभेत महत्त्वाचा विषय असतो. खरंतर पालक सभेत विद्यार्थ्यांची काय प्रगती आहे? माझं मूल नेमकं शाळेत काय करतं? हे जाणून घेण्यासाठीच असतात.

या लेखांमध्ये आपण पालक सभांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे हित कसं साधता येईल यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत. मुळात शिक्षक आणि पालक दोघ मिळून या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या म्हणजेच पाल्याच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासंदर्भात चर्चा, संवाद करत असतात. थोडक्यात विद्यार्थ्यांच्या विकासासाठी पालक सभांचे महत्त्व हे अनन्यसाधारण आहे यात शंका नाही. प्रथम सत्रा नंतरची पालक सभा याचा विचार करताना त्याला अनेक कंगोरे आपल्याला दिसून येतात. दिवाळीची सुट्टी संपलेली असते. मुले सुट्टीमध्ये मौज, मजा, पर्यटन, खेळ, मोबाईलगेम यात व्यस्त असतात. तर काही स्वतःच्या इच्छेनुसार, तर कधी पालकांच्या रेट्यामुळे किंवा शाळेने दिलेला सुट्टीतील अभ्यासाचा दट्ट्या यात व्यग्र असतात.

हे निर्विवादपणे सत्य आहे की, विद्यार्थी हा शाळेत आनंदाने आला पाहिजे आणि शाळेतून घरी जाताना त्याचे पाय शाळेत अडखळले पाहिजेत. पण इथे काही प्रश्न मनात आल्याशिवाय राहत नाही त्यामध्ये पहिला प्रश्न असा येतो की मुलांना नेमकं काय आवडतं आणि काय आवडत नाही? सहज विचार केला तर आपल्या लक्षात येतं की मुलांना मोबाईल वर गेम खेळायला प्रचंड आवडतं. याशिवाय थोड्या मोठ्या म्हणजे साधारणतः सातवी ते बारावी चे विद्यार्थी शाळेत बऱ्याच वेळेला शेवटचे दोन तास आपल्याला मैदानावर खेळायला सोडावं ही त्यांची अपेक्षा असते. अपेक्षा पूर्ण नाही झाली तर ते, नको ते उद्योग सुरू करतात. उदा. वर्गात गोंधळ करणे, वेगवेगळे आवाज काढणे, खोड्या काढणे, दंगामस्ती करणे, जागा बदलणे, शिकवताना एकत्र बसून गप्पा मारणे, काही विद्यार्थी तर लेक्चर सोडून न सांगता खेळायला निघून जातात. अशावेळी वर्गावर लेक्चर घेणे हे एक मोठे कौशल्यच. त्यातही त्यांना शाळेत अभ्यासासाठी जादा तासिका घेण्यात येणार आहे हे समजले तर त्यांच्यावर येणाऱ्या संकटाचे स्वरूप अवर्णनीय असते. विद्यार्थी जसा वयाने मोठा होत जातो तसे हे प्रमाण वाढत जाते.

अशावेळी शिक्षकांनी व पालकांनी काय करावे हा सुद्धा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. कोणत्याही व्यक्तीचे बिघडणे आणि सुधारणे विचारांवर व स्वभावांवर अवलंबून असते. रामाच्या राज्यात कैकयी आणि रावणाच्या राज्यात बिभीषण निर्माण झालेच म्हणजेच विचारांची दिशा बदलली तर परिणाम सुद्धा बदलल्याशिवाय राहणार नाही. ही भूमिका फार महत्त्वाची आहे.

विद्यार्थ्यांमध्ये जर आपल्या पालकांबद्दल आदर नसेल किंवा आदरयुक्त भीती नसेल. तर समस्या आणखीनच बिघडू शकते. सहावी ते बारावी हा संपूर्ण कालखंड वर्तमान परिस्थितीत प्रचंड वेगवान शारीरिक मानसिक परिवर्तनाचा असतो. म्हणूनच त्यांना मानवी जीवनातील वादळी वर्ष किंवा टर्निंग पॉईंट म्हटले जाते. याच वयात विद्यार्थी आपल्या जीवनाचे ध्येय ठरवतो, उद्दिष्टही ठरवतो आणि तशी स्वप्नेही बघायला शिकतो. या कालखंडात त्याला अनेक मित्र मिळतात. तो स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करू पाहतो. करत असलेलं काम उत्कृष्ट आणि लक्षवेधक करण्याचा त्याचा प्रयत्न असतो. अंगीभुत असलेली चिकाटी आणि एखादी गोष्ट प्राप्त करण्यासाठी हवा असलेला चिवटपणा याच कालखंडात विकसित होतो. या कालखंडात स्वतःमधील शारीरिक, मानसिक, बौद्धिक, बदलांचा सुयोग्य उपयोग करत तो यशाची वेगवेगळी शिखरे कशी पदक्रांत करतो? त्यावर त्याचे भवितव्य, भविष्य अवलंबून असते. तू कशासाठी शाळेत जातो? हा प्रश्न पाल्याला वारंवार विचारा. या प्रश्नाच्या योग्य उत्तराने त्याच्या भविष्याबद्दलचे अनेक प्रश्न त्याच्या लक्षात येतील. या कालखंडात होणाऱ्या विविध स्पर्धा शालेय, आंतरशालेय, शालाबाह्य, निबंध, वक्तृत्व, हस्ताक्षर, चित्रकला, विज्ञान प्रदर्शन, नाटक, स्नेहसंमेलन, विविध प्रकारच्या खेळांच्या स्पर्धा यातून तो स्वतःला घडवत नेत असतो. शिक्षकांची व पालकांची भूमिका या ठिकाणी केवळ मार्गदर्शकाची असावी. आपला पाल्य खेळ, शाळा, क्लास, जेवण, अभ्यास, मनोरंजन, विविधस्पर्धा यांचा योग्य मेळ घालतो आहे किंवा नाही ते पाहणे महत्त्वाचे असते.

पालकांची जबाबदारी यासाठी म्हटलं की पालकांना सुद्धा योग्य वेळी मुलाचा कान धरता आला पाहिजे आणि योग्य वेळी त्याचे बोटही सोडता आले पाहिजे. तुमच्या कष्टाची तुमच्या मेहनतीची त्याला जाणीव हवी. तुम्हांला जर वाटत असेल आपल्या पाल्याने शाळेत नीट अभ्यास करावा, शिकविण्याकडे लक्ष द्यावे, तर ते तुम्ही त्याला घरी बोलते करून किंवा दैनंदिनी लिहायला सांगून करून घेऊ शकतात. याशिवाय त्याच्या एखाद्या मित्राला विश्वासात घेऊन आपलं मूल शाळेत नेमकं काय करतं हे जाणून घेऊ शकतात. हा मुलावरचा अविश्वास नव्हे पण आंधळा विश्वासही नको.

बाहेर इतकी प्रलोभने उपलब्ध असल्याकारणाने हल्ली मुलं पटकन प्रलोभनाला सुद्धा बळी पडतात परिणामी येणारा समाज हा सुद्धा पटकन प्रलोभनाला बळी पडणारा निर्माण होत आहे. आज सर्व काही त्यांना सहज मिळते आणि याला कारण ते आणून देणारा त्यांचा पालक असतो. या ठिकाणी पालकाची भूमिका ‘मी माझ्या बालपणी आयुष्यात जे मिळवू शकलो नाही त्यापासून माझं मूल वंचित राहता कामा नये’ यामुळे एखादी गोष्ट नव्हे, प्रत्येक गोष्ट संघर्ष करून, कष्ट करून मेहनतीने मिळवणे हे त्याला माहीतच नसते.

त्याच्याशी संवाद साधतांना नक्की विचारा की शाळेत कोणत्या शिक्षकाचे शिकवणे आवडते. पण हे विचारताना तो खरच त्या विषयाचा अभ्यास करतो का? ते पण बघा. एखादा शिक्षक नेटाने मागे लागून तयारी करून घेत असेल तर सर्वसाधारण नियमानुसार मानवी प्रवृत्ती ही मेहनत करायला धजत नाही. तशीच ती अभ्यास करायला सुद्धा तयार नसते. त्यामुळे तो तुम्हांला फसवत तर नाही ना याकडे सुद्धा लक्ष द्या.

आपल्या पाल्या कडून अनावश्यक अपेक्षा ठेवू नका. त्याच्या क्षमता ओळखा. नियमितपणे लक्षात ठेवा कावळ्याने कोकिळे सारखं गाणं शक्य नाही, कोंबड्याने घारी सारखे उडणे शक्य नाही त्याप्रमाणे आपल्या मुलातील गुणवैशिष्ट्ये आवड लक्षात घेऊन अपेक्षा करा.

शांततेच्या काळात जास्त घाम गाळला तर युद्धाच्या काळात कमी रक्त सांडावे लागते हा साधा नियम आपण अनेक वेळेला ऐकलेला असतो. तरी सुद्धा मुले आपला रिकामा वेळ टीव्ही, मोबाईल, नेट, गेम्स, फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब वर वाया घालवताना दिसतात. मुलांचे शिकण्याचे वय असते, ते काय पाहतात, काय अनुभवतात यावर घडन होत असते.

विद्यार्थी शाळेत अभ्यासासाठी येतात पण अभ्यास तेव्हाच सुरू होतो जेव्हा विद्यार्थी प्रश्न विचारायला सुरुवात करतात. खरंतर विद्यार्थ्यांनी इतके प्रश्न विचारली पाहिजेत की शिक्षक समाज निरुत्तर झाला पाहिजे. बऱ्याच वेळेला विद्यार्थी हे शिक्षकांकडून कमी पण आपल्या समवयस्कांकडून जास्त शिकतात. खरंतर शिक्षकाचं, पालकांचं काम हे की सतत विद्यार्थ्याला समस्या देणं आणि समस्येमध्ये ठेवणं. सतत कामात ठेवणं हेच असावं. फार तर तो समस्येचा सामना कशाप्रकारे करतो याच निरीक्षण करावं.

विद्यार्थ्यांची शाळेतील नियमित उपस्थिती, शिस्तपालन, योग्यवर्तन, वेळच्यावेळी अभ्यास पूर्ण करणे या गोष्टी महत्त्वाच्या असतात. खरंतर वर्तमान कालखंडात शिक्षकांवर अनेक बंधने आलेली आहेत. त्यामुळे साहजिकच अनेक मर्यादा येतात. उदा. म्हणून सांगतो सोनार, लोहार, कुंभार, शिल्पकार यासारखी मंडळी आपल्याकडील साहित्याच्या साह्याने उत्तम कलाकृती निर्माण करतात. शिक्षकाकडची अनेक साधने काढून घेतल्यामुळे त्याच्या उत्तम कलाकृती निर्मिती क्षमतेला मर्यादा येताना दिसतात. तरीही तो आहे त्या साधनांनी संघर्ष करत आपलं काम उत्तम रीतीने करण्याचा प्रयत्न करतो.

धन्यवाद.

 

लेखक,

प्रा. श्री. प्रशांत पुंडलिक शिरुडे

के. रा. कोतकर माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय डोंबिवली.

9967817876

prashantshirude1674@gmail.com

प्रतिक्रिया व्यक्त करा