साताऱ्यात हापूस आंब्याची पहिली पेटी;
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोंडेकर बंधूंना दूरध्वनीवरून गौरव
मालवण :
मालवणमधील प्रगतशील आंबा बागायतदार आबा फोंडेकर आणि उत्तम फोंडेकर यांनी 20 ऑक्टोबर रोजी सातारा मार्केटमध्ये हापूस आंब्याची पहिली पेटी पाठविल्याच्या उल्लेखनीय कार्याची राज्याच्या उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी दखल घेतली. या निमित्ताने शिंदे यांनी फोंडेकर बंधूंना दूरध्वनीद्वारे संपर्क साधत त्यांच्या कार्याचे मनापासून कौतुक केले.
या संवादादरम्यान फोंडेकर बंधू आंबा उत्पादनात वापरत असलेल्या ए. आय. तंत्रज्ञानाची सविस्तर माहिती उपमुख्यमंत्री शिंदे यांनी जाणून घेतली. तसेच त्यांनी फोंडेकर यांना मिळालेल्या विविध पुरस्कारांची आणि घरातील सात सहकाऱ्यांच्या पाठिंब्याचीही प्रशंसा केली.
मालवणच्या निसर्गसौंदर्याबद्दल, तसेच सिंधुदुर्ग किल्ल्याच्या ऐतिहासिक वैभवाबद्दलही शिंदे यांनी गौरवोद्गार काढले. फोंडेकर यांचे अलौकिक कार्य मंत्रिमंडळात चर्चेचा विषय असल्याचेही त्यांनी नमूद केले.
याशिवाय, आपल्या शुभेच्छा पत्रासह आपण फोंडेकर बंधूंच्या कार्याला सलाम करत असल्याचेही उपमुख्यमंत्र्यांनी दूरध्वनीवर सांगितले. त्यानुसार त्यांनी शुभेच्छा पत्र पाठविल्याची माहितीही फोंडेकर यांना दिली.
या कौतुकामुळे मालवणमधील आंबा उद्योगाला मोठी प्रेरणा मिळाल्याची भावना स्थानिक पातळीवर व्यक्त होत आहे.
